Editorial / चाय पे (कलुषित) चर्चा ! (अग्रलेख)

‘रेड लेबल’ या ब्रँड नेमने वितरित होणाऱ्या चहाच्या जाहिरातीवर हिंदूविरोधी असल्याचा आक्षेप घेत ट्रोलिंग सुरू झालेे आहे

Sep 03,2019 08:28:00 AM IST

बुद्धीची देवता असणाऱ्या श्रीगणेशाचे आगमन म्हणजे मंगलपर्वाचा प्रारंभच. गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पांचे नानाविध आकार आणि असंख्य रूपे आपल्या संस्कृतीतल्या सर्वसमावेशकतेचीच प्रचिती देतात. एवढे वेगवेगळे आकार-प्रकार आपल्यात सामावून घेत विविधतेतल्या एकतेचा मूर्तिमंत प्रत्यय देणारा अन्य कुठलाही देव जगाच्या पाठीवर नसावा. पण, अलीकडे एवढा सर्वसमावेशक विचार झेपणे जरा अवघड होत चालले आहे. सोशल मीडिया नामक आभासी जगात तर जणू त्याचे वावडेच आहे. त्यामुळेच कदाचित कुठल्याही निमित्ताने वादाचे तरंग उठवल्याशिवाय तेथील ट्रोलर्सना चैन पडत नसावी. यंदा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चहाच्या एका जाहिरातीवर पडलेली ‘ट्रोल’ धाड याच पठडीतली म्हणावी लागेल.


‘रेड लेबल’ या ब्रँड नेमने वितरित होणाऱ्या चहाच्या जाहिरातीवर हिंदूविरोधी असल्याचा आक्षेप घेत ट्रोलिंग सुरू झालेे आहे. वास्तविक ही जाहिरात गेल्या वर्षी प्रसारित झाली होती. एका तरुणाला दुकानातली गणपतीची मूर्ती चांगलीच आवडते. तेवढ्यात मूर्तिकार मुस्लिम असल्याची जाणीव होऊन हा तरुण तिथून काढता पाय घ्यायला लागतो. परंतु, तत्पूर्वीच दुकानदाराने दिलेली चहाची ऑर्डर येते आणि चहा पिताना आपण मूर्तिकलेच्या माध्यमातून ईश्वरसेवाच करत असल्याचे दुकानदार सांगतो. त्यानंतर तरुणाचे मतपरिवर्तन होते आणि तो मूर्ती पसंत करतो, अशी या जाहिरातीची संकल्पना आहे. ती पसंत नसेल तर त्याविषयी मत मांडण्याचा अधिकार सर्वांना खचितच आहे आणि अशा व्यक्त होण्याच्या अधिकाराचे आम्ही पाठीराखेही आहोत. तथापि, विरोधात व्यक्त होताना अपशब्द वापरणे, आकांडतांडव करणे मात्र योग्य नाही. विशेषकरून अशा संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना तर असहिष्णुता दाखवताच कामा नये. मतभेद मांडताना, वाद घालताना संवाद पुढे नेता आला पाहिजे. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ म्हणजेच योग्य ते भान ठेवून वाद केल्याने ज्ञानप्राप्ती होते, असे आपली संस्कृती सांगते. पण, हे समजून घेण्याची मानसिकता नसल्याने सोशल मीडियातले बहुतांश मुशाफिर आणि ट्रोल्स प्रत्येक घटनेकडे केवळ ‘ब्लॅॅक अँड व्हाइट’ एवढ्याच नजरेने पाहतात. त्यातून परमतसहिष्णुता संपुष्टात येऊन वातावरण अधिकाधिक टोकदार बनत जाते. अशाच टोकदारपणातून मग दाभोलकर, पानसरेंसारख्या विवेकवाद्यांच्या वेगळा विचार मांडला म्हणून निर्घृण हत्या होतात. वास्तविक सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी करताना त्याकडे लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम म्हणून लोकमान्यांसारख्या दूरदर्शी विचारवंताने पाहिले होते. पण, कालौघात संवादाची माध्यमे बदलत गेली. अलीकडे तर तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यात प्रचंड वेग आला, आधुनिकता आली. मात्र, दुसरीकडे वापरकर्त्यांचे तारतम्य सुटल्याने संवादाऐवजी विसंवाद आणि वितंडवादच वाढत चालला आहे. त्यातून अशा कलुषित ‘चाय पे चर्चा’ सुरू होतात. म्हणून, यंदाच्या मंगलपर्वापासून सर्व प्रकारच्या ट्रोलर्सना सद॰बुद्धी लाभो, ही या निमित्ताने बुद्धिदात्याच्या चरणी प्रार्थना!

X