आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चेन्नई : श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गोताबाया राजपक्षे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांनी सोमवारी पदभारही स्वीकारला. गोताबाया श्रीलंकेचे राष्ट्रपती झाल्याने तामिळनाडूतील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. विविध राजकीय पक्षांनी श्रीलंकेतील ईलम तामिळांची सुरक्षा निश्चित करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) तसेच त्यांचा सहकारी पक्ष मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके) आणि अन्नाद्रमुक पक्षाचा सहकारी पक्ष विदुथलाई चिरुथगई काची आणि पट्टली मक्कल काची (पीएमके)ने गोताबाया राष्ट्रपती झाल्याने चिंता व्यक्त केली आहे.
गोताबाया यांनी सोमवारी श्रीलंकेचे सातवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. ते माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे भाऊ आहेत. संरक्षण मंत्री असताना गोताबाया यांनी जातीय युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात मे २००९ मध्ये तामिळांचा नरसंहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
गोताबाया यांच्यावर आरोप लागल्यानंतर तामिळनाडूतील जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात युद्ध गुन्हे आणि मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्याचा खटला दाखल करण्याची मागणी केली होती. संयुक्त राष्ट्र महासभा, तसेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या मंचावर वारंवार करण्यात आली आहे. तामिळनाडूतील लोकांचे उत्तर श्रीलंकेतील लोकांशी जुने संबंध अाहेत.
एमडीएमकेचे महासचिव वायको आणि पीएमकेचे संस्थापक डाॅ. एस. रामदास यांनी श्रीलंकेत वेगळ्या तामिळ ईलमासाठी जनमत घेण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर अन्नाद्रमुकच्या सर्वेसर्वा दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांनीही अनेकदा महिंदा राजपक्षे यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात युद्ध गुन्हे, तामिळींचा नरसंहार, मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा खटला दाखल करण्याची मागणी केली होती.
संसदेची मध्यावधी निवडणूक घ्या : महिंदा राजपक्षे
श्रीलंकेच्या संसदेतील विरोधी पक्षनेते महिंदा राजपक्षे यांनी देशात मध्यावधी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित धार्मिक समारंभानंतर माध्यमांशी बोलताना महिंदा राजपक्षे यांनी सांगितले की, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ एकाच पक्षाचे असणे चांगले असते. यामुळे निवडणूक घेणे अधिक चांगले राहिल. अनेक कॅबिनेट सदस्यांनी आधीच पद सोडले आहे. यामुळे एकाच पक्षाकडे राष्ट्रपती पद आणि मंत्रिमंडळ असावे असे मला वाटते. जनतेच्या निर्णयाचा सन्मान करणे आवश्यक असल्याचेही महिंदा राजपक्षे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.