आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकाव्यांचा तामिळी त्रिवेणी संगम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ती समजून घेण्यासाठी संस्कृत साहित्यासह इतर साहित्याचा अभ्यास करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यापैकीच एक तामिळ साहित्य, जे भारताच्या सर्वता प्राचीन साहित्यापैकी एक समजले जाते.  

 

रामायण आणि महाभारत या भारतीय उपखंडाच्या दोन महाकाव्यांबद्दल आणि राम -कृष्ण या नायकांबद्दलच आपण वारंवार बोलत असतो. परंतु दक्षिण भारतातील किती महाकाव्यांबद्दल उत्तर भारतीयांना माहिती आहे? दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतात तब्बल पाच महाकाव्ये लिहिली गेली... या महाकाव्यांमधून एक वेगळ्या प्रकारचे भाव आणि रंग पाहायला मिळतात. बौद्ध धर्म, जैन धर्म आणि हिंदू धर्म कसे दोन हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतात पोहोचले आणि दक्षिणेकडच्या लोक धर्मात मिसळून एक नवीन संस्कृती कशी निर्माण झाली, याचे दाखले ही दक्षिणेकडची महाकाव्ये देतात. दक्षिण भारताची परंपरा नेमकी कशी आहे हे आपल्याला या महाकाव्यातून दिसतं.


दक्षिणेकडील सगळ्यात प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे शिल्लपदिकारम... एका पैंजणाची कथा! दक्षिण भारतात पैंजण हे सौभाग्याचं लेणं समजलं जातं. कण्णगी नावाच्या एका पतिव्रतेची कहाणी म्हणजे शिल्लपदिकारम हे महाकाव्य. कण्णगी आणि तिचा पती कोवलम हे दोघेही तसे धनाढ्य व्यापारांची मुलं, त्यामुळे या दोघा पती-पत्नीकडे अमाप पैसा होता. कोवलमचे प्रेम मात्र माधवी नावाच्या एका गणिकेवर होतं. तो त्या गणिकेवर इतकं प्रेम करायचा की त्याने त्याची सारी संपत्ती माधवीवर लुटून टाकली. जोपर्यंत समोरचा प्रेमी आपल्यावर पैसे उधळतो तोपर्यंतच गणिका त्याच्याशी संग करते, एकदा का पैसे संपले की गणिकेचा त्या प्रियकराशी असलेला संबंधही संपुष्टात. माधवीनेही अगदी तसेच केले. तिने कोवलमला घरातून हाकलून लावले. निराश कोवलाम पुन्हा एकदा आपल्या पत्नीकडे परतला आणि दोघांनी मदुराई या वेगळ्या शहरात नवे आयुष्य सुरू करण्याचे ठरवले.

 

नव्या आयुष्याची सुरुवात करायची, पण खिशात एक दमडीही नाही. म्हणून कोवलामने त्याच्या पत्नीचे कण्णगीचे पैंजण विकायचे ठरवले. कोवलामसारख्या एका फाटक्या माणसाकडे इतके भारी पैंजण बघून सोनाराला संशय आला. राजवाड्यातूनच हे पैंजण चोरले असा समज करून सोनाराने शिपायांना सांगून कोवलामला पकडले आणि राजाच्या पुढ्यात उभे केले. कोवलामचे काहीही न ऐकता राजानेही त्याला दोषी मानून त्याचे शिर धडावेगळे केले. कण्णागीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती प्रचंड संतापली. राणीचे पैंजण हे मोत्यांनी जडलेले होते तर तिचे हिरे आणि रत्नांनी. माझा पती निर्दोष आहे हे कण्णगीने राजाला पटवून दिले. मात्र, ती तेवढ्यावरच थांबली नाही. क्रोधित झालेल्या कण्णगीने देवीचे रुप धारण केले आणि आपल्या शापाने तिने राजा आणि राजाच्या सगळ्या राज्याला भस्म करून टाकले. स्त्री शक्तीची ताकद यानिमित्ताने पुराणात पहिल्यांदाच आपल्याला या महाकाव्यात पाहायला मिळते.


तामिळ भाषेतील आणखी एक महाकाव्य म्हणजे मणिमेखलै... शिल्लपदिकारम या महाकाव्यात आपण पाहिले की कोवलम आणि माधवी गणिका यांच्यात प्रेमाचे संबंध होते. त्यांना मणिमेखलै ही मुलगी होती जिला गणिकेऐवजी भिक्खुणी बनायचे होते. परंतु त्या नगरीच्या राजासह अनेक पुरुष तिला तसे करण्यापासून रोखत होते, कारण सगळे मणिमेखलैवर प्रेम करायचे. शेवटी तिची भिक्खुणी बनण्याची इच्छा समुद्र देवी म्हणून ओळखली जाणाऱ्या बौद्ध देवीने पूर्ण केली.  या महाकाव्यात त्यामुळे भिक्खुणीबद्दल माहिती मिळते.


कुंडलकेशी नावाचे तामीळमधलेच तिसरे महाकाव्यही प्रसिद्ध आहे. एका धनाढ्य व्यापाराची कन्या कुंडलकेशी एका चोराला तुरुंगात जाण्यापासून वाचवते आणि त्याच्यावर प्रेम करून लग्नदेखील करते. काही दिवसांनी चोर पुन्हा आपल्या मूळ प्रवृत्तीवर येतो आणि आपल्या पत्नीचे कुंडलकेशीचे धन चोरण्याचा आणि तिला माारण्याचा प्रयत्न करतो. कुंडलकेशीही तितकीच शुर असते, ती आपल्या चोर पतीलाच मारून टाकते. त्यानंतर ती भिक्खुणीचे आयुष्य जगायला सुरुवात करते. अगोदर ती बौद्ध भिक्खुणी बनते आणि मग जैन भिक्खुणी...


या तिन्ही महाकाव्यांतून काय दिसून येतं तर पुराणकाळात स्त्रियांसाठी पतिव्रता, गणिका किंवा भिक्खुणी असे केवळ तीनच पर्याय उपलब्ध होते. या सगळ्या महाकाव्यात स्त्रियांची भूमिका महत्त्वाची असल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ती समजून घेण्यासाठी संस्कृत साहित्यासह इतर साहित्याचा अभ्यास करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यापैकीच एक  तामिळ साहित्य, जे भारताच्या सर्वता प्राचीन साहित्यापैकी एक समजले जाते. 


देवदत्त पटनायक
divyamarathirasik@gmail.com

बातम्या आणखी आहेत...