आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसाराचा ‘कणा’ जपा,

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 तन्मयी चांदेकर

प्रत्येक स्त्री तिच्या कुटुंबाचा, संसाराचा कणा असते. मग भले ती अर्थार्जन करणारी असो वा नसो. पूर्णवेळ गृहिणी तर शब्दश: कुटुंबाचा कणाच असतात. मात्र, याची जाणीव कुटुुंबामधल्या सदस्यांना असते का? इतरांचं जाऊ द्या, किमान ती नवऱ्याला तरी असावी. 


घड्याळ अन् सूर्यालाही लाजवेल असं २४ बाय ७ काम करणारी गृहिणी रिकामी…? जिच्यामुळे पुरुष दिवसभर बिनघोर नोकरी करतात त्या ‘गृहिणी’ रिकाम्या...? 

गृहिणी म्हणजे सारं गृह जिच्या ऋणात असतं अशी ती, असं काहीसं शाब्दिक मोठेपण देणारी व्याख्या मध्यंतरी वाचली होती. पण असं असतं?  दुर्दैवाने नाही. घर सांभाळणाऱ्या महिलांना, ‘तू काय रिकामीच’, ‘तुला काय कळतंय?’ ‘काय काम असतं दिवसभर’ हे उपहासाचे शब्द ऐकवले जातात. नोकरी करणारा नवरा, मुलं, कुटुंबातल्या इतर सदस्यांच्या मागण्या पूर्ण करता करता सूर्य उगवतो कधी आणि मावळतो कधी हेच या ‘गृहिणी’ नावाच्या प्राण्याला कळत नाही. पण आपलाच संसार म्हणून ती राबते. समान अधिकाराची भाषा वारंवार कानी पडते. तिला अधिकार दिले जातात. पण पुरुषी मानसिकता मात्र बदललेली नाही. 

स्त्रियांचा एक वर्ग असा आहे, ज्यातल्या स्त्रिया महत्त्वाकांक्षी, उच्चशिक्षित असतात. लग्नानंतरही करिअर सुरू ठेवतात. सर्व सांभाळून नोकरीची मोठी कसरत करतात. पण घरी पैसे आणते या विचाराने का होईना तिला घरात महत्त्व दिले जाते.

 
 
दुसऱ्या वर्गात येतात त्या कमी शिकलेल्या व संसारात रमणाऱ्या स्त्रिया. त्या नवरा व मुलांच्या सुखासाठी शिक्षण, करिअरला तिलांजली देतात. मात्र त्यांचा पदोपदी अपमान होतो. पण त्याकडे दुर्लक्ष्य करत त्या नेटाने संसार चालवतात. 

तिसऱ्या वर्गातील स्त्रियांची खरी पंचाईत होते. त्या उच्चशिक्षित असतात. घरी कामही करतात. पण संसारासाठी करिअर सोडून स्वखुशीने कुटुंबाकडेच लक्ष देतात. घरंच आपलं करिअर अशा त्यांची धारणा होते. व्यवस्थापनाचा कुठलाच कोर्स न करताही त्या उत्तम घर सांभाळतात. पण त्यांनाही ‘घरीच असते ती’ ऐकणं चुकत नाहीच. कुठल्याही वर्गातल्या महिलांचा विचार केला तरी पुरुषांच्या कैकपटीने अधिक काम स्त्रिया करतात. केवळ घरी असल्याने त्यांच्या कामाचा दर्जा नाही किंवा त्या काहीच काम करत नाहीत असे संबोधणे मूर्खपणाचेच. पण अशा सततच्या टोमण्यांमुळे स्त्रियांचा आत्मविश्वास कमी होतो. आपण निष्क्रिय आहोत अशी भावना वाढते. ती निराशेच्या गर्तेत जाते. या अवस्थेतल्या स्त्रियांना मग ‘काही केलं तरी आनंदी नसतेच ही’ अशी लाखोली मिळते... 

पुरुषांनी आठवडाभर करून पाहावा संसार. सांभाळावीत खट्याळ मुलं. करावं घरातील ज्येष्ठांचं औषधपाणी. आणाव्यात बाजारातून रोज भाज्या. घासावीत कधी भांडी. सकाळी उठण्यापूर्वी करावं सकाळच्या स्वयंपाकाचं प्लॅनिंग. रात्री बायकोला जवळ घेतल्यावर, ‘काय हे, अंगाला भाजीचा वास येतोय’ असं नवऱ्यानंही ऐकावं कधीतरी... 

नुसत्या शपथा, मेळावे घेऊन नाही थांबणार स्त्रियांमागचं दुष्टचक्र. त्यासाठी मोहीम सुरू करूयात, # गृहिणी...काय म्हणताय...? पुरुषांनो, विचार करा. कणा ताठ झाला, संपावर गेला तर...

(१) भज्यांचा पहिला घाणा तेल नीट तापलेलं नसल्याने बिघडला. त्यावर तो चेष्टेत तिला म्हणाला, ‘एवढी डॉक्टर असूनही तेल तापलं की नाही कळत नाही अजून.’ वाक्यं खुपलं मनात तिच्या. स्वखुशीने सोडली तिनं प्रॅक्टिस. मुलं, घर आणि नवऱ्याला सांभाळण्यासाठी. आज महिन्याला लाखभर रुपये तरी येत राहिले असते घरात.  मग झाली असती का हिंमत हे ऐकवण्याची...

(२) थकल्यामुळे तिचा डोळा लागला. डोकं दुखतं म्हणून तो ऑफिसमधून नेमका लवकर घरी आला. मुलांनी केलेला पसारा पाहून संतापला. चिडून तो बोलला, नोकरी न करणाऱ्या मुलीशी लग्न यासाठी केलं की ती घर तरी छान सांभाळेल. तुला तेही जमेना. काय उपयोग... डोकं शांत झाल्यावर तो तिच्या जवळ आला. पण त्याचं वाक्य तिच्या मनात रुतलेलं. काट्यासारखं. 

लेखिकेचा संपर्क : ९८२२८४७९९०

बातम्या आणखी आहेत...