आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लक्ष्य’ ऑलिम्पिकचे! (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१८ हे सरते वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले. क्रिकेटच्या पलीकडे पाहिले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या युवा खेळाडूंनी निर्विवाद यश मिळवले आहे. खेळांचा राजा म्हटल्या जाणाऱ्या अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे यश अचंबित करणारे होते. जकार्ता आशियाई स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारताने १९ पदके मिळवली, हा उच्चांक होता. यात ८ सुवर्ण, ८ रौप्य व ३ कांस्यपदके होती. ही रौप्यपदके सौदी, ओमान यासारख्या आखाती देशांनी आपल्या संघात आफ्रिकेतील सर्वोत्तम खेळाडू खेळवले नसते तर ती सुवर्णांत परिवर्तित होऊ शकली असती. आपल्या खेळाडूंचे यश त्यांच्या मेहनतीतून आले. दारिद्रयाशी, परिस्थितीशी संघर्ष करत हे खेळाडू उत्तम कामगिरी करू शकले.  ओरिसातल्या शेतकरी कुटुंबातील हिमा दासने युरोपमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २० वर्षांखालील ४०० मी. धावण्याच्या स्पर्धेत विश्वविक्रम केला. तिचे सुवर्णपदक हे अभिमानास्पद होते. या कामगिरीने ती जगातल्या दिग्गज महिला धावपटूंच्या बरोबरीत आली. याच हिमा  दासने जकार्तामध्ये सीनियर खेळाडूंचे आव्हान असताना रौप्य मिळवले. भालाफेकपटू नीरज चोप्रा याने जकार्ता आशिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याआधी राष्ट्रकुल स्पर्धेतही तो विजेता होता. गोळाफेक करणारा तेजिंदरपालसिंग तूर हादेखील भारताच्या संभाव्य भावी ऑलिम्पिक पदक विजेत्यांपैकी एक आहे. मनजितसिंगने जकार्तात ८०० मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

 

अरपिंदरसिंगने पुरुषांच्या तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. स्वप्ना बर्मनने महिलांच्या हेप्टाथलॉन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. स्वप्ना स्पर्धेआधी दात दुखापतीमुळे बेजार झाली होती. पण जबड्याला बँडेज बांधून तिने स्पर्धेत उतरत सुवर्ण घेतले. स्वप्नाचे वडील रिक्षा खेचतात. त्यांनी कष्ट करून आपल्या मुलीला घडवले. तेजिंदर तूर याने कर्करोगाने आपले वडील आजारी असतानाही दुःख बाजूला सारून गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावले. द्युती चंदवर अनेक आरोप झाले, पण तिने महिलांच्या १०० व २०० मी. स्पर्धेत  दोन रौप्यपदके पटकावली. सुधा सिंग, नीला वरकील, राजीव आरोकिया, पीयू चित्रा, सीमा पुनिया अॅथलिटनीदेखील भारताच्या पदक तालिकेत भर घातली. भारताची बॅडमिंटन सम्राट सानिया नेहवाल निवृत्तीकडे झुकत असताना तिची जागा पीव्ही सिंधू हिने घेतली आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळवले. त्यानंतर तिची घोडदौड सुरूच आहे. राजकारणाचा फटका बसूनही भारतीय मुष्टियोद््ध्यांनी चमक दाखवली. जकार्तात लाइट फ्लायवेट गटात अमित पांगल याने सुवर्णपदक, तर विकास यादवने ७५ किलो वजनी गटात कांस्य मिळवले. हॉकी भारतीयांच्या अस्मितेला स्पर्श करणारा. भारतीय पुरुषांनी या स्पर्धेत कांस्य पटकावले. त्या तुलनेत महिलांनी रौप्य पटकावून बाजी मारली. कबड्डीत मात्र यंदा भारताने सुवर्णपदकावरच आपला हक्क गमावला. त्यांना कांस्यवर समाधान मानावे लागले. महिलांनी रौप्य मिळवले, मात्र उल्लेखनीय गोष्ट अशी की अंतिम फेरीत भारतीय महिलांना हरवणाऱ्या इराणच्या संघाची प्रशिक्षक भारतीय महिला होती. कुराश, रोइंग, यॉटिंग, सेपक टँकरॉ, नेमबाजी या स्पर्धादेखील भारतीय स्पर्धकांनी गाजवल्या.  स्क्वॅश, टेबल टेनिस, टेनिस, कुस्ती आणि वुशू स्पर्धेत भारतीयांनी पदके मिळवली. साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावल्यापासून महिलांच्या कुस्ती स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण झाला होता. पण विनेश फोगटला रिओमध्ये यश मिळाले नव्हते. त्याचा वचपा तिने जकार्तात फ्रीस्टाइल स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावून काढला. पुरुषांच्या फ्रीस्टाइल स्पर्धेत बजरंग पुनिया याने सुवर्णपदक, तर दिव्या काकरन हिने महिलांच्या फ्रीस्टाइल गटात कांस्यपदक पटकावले.  


लिएंडर पेस, महेश भूपती यांच्यासारखे दिग्गज टेनिसपटू निवृत्त होत असताना रोहन बोपन्ना, दीविज शरण, अंकिता रैना, प्रजेश गुणेश्वरन यांनी भारताचा दबदबा टेनिस स्पर्धेतही कायम ठेवला. तिरंदाजी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत दीपिका कुमारीने कांस्य पटकावले, तर जकार्तात महिलांनी दोन कांस्यपदके पटकावली. नेमबाजी हा भारतीय स्पर्धकांचा हुकमी एक्का. भारताने जकार्तात नेमबाजीत दोन सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्यपदके पटकावली. सौरभ चौधरीला १० मी. पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण, राही सरनोबतला २५ मी. पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. दीपक कुमार, लक्ष्य शेवरान, संजीव राजपूत, शार्दूल विहान यांनी रौप्य मिळवले, तर रविकुमार, अपूर्वी चंडेला, अभिषेक वर्मा, हिना सिद्धू यांनी कांस्यपदके पटकावली. या एकूण कामगिरीवरून भारतीय खेळाडूंनी आपला दर्जा ऑलिम्पिक पातळीवर आणल्याचे सिद्ध झाले आहे. आपल्या खेळाडूंना परदेशात प्रशिक्षण मिळत आहे, सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे. एक काळ होता की, ऑलिम्पिक दिवास्वप्न होते, ते आता सत्यात उतरत आहे. हे वर्ष त्या दृष्टीने संस्मरणीय आहे.

बातम्या आणखी आहेत...