Home | Business | Auto | tata motors sales down

टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 26 वर्षांतील सर्वाधिक घसरण  

वृत्तसंस्था | Update - Feb 09, 2019, 10:11 AM IST

एका वर्षात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये झाली 60 टक्के घसरण  

  • tata motors sales down

    नवी दिल्ली - टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी अडीच दशकांतील सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीचे शेअर २९.५ टक्क्यांनी घसरून १२९ रुपयांवर आले आहेत. मुंबई शेअर बाजारात २२.४१ टक्क्यांच्या घसरणीसह १४१.९० रुपयांवर आले आहेत. ही टाटा मोटर्सच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी घसरण आहे. या आधी दोन फेब्रुवारी १९९३ रोजी शेअरमध्ये ४०.५० टक्क्यांची घसरण झाली होती. सायंकाळी मुंबई शेअर बाजारात १७.२८ टक्क्यांच्या घसरणीसह शेअर १५१.३० रुपयांवर बंद झाले. वर्षभरात या शेअरमध्ये ६० टक्क्यांची घसरण झाली आहे.


    गुरुवारी कंपनीने जग्वार लँडरोव्हर (जेएलआर)च्या संपत्तीचे मूल्य कमी झाल्यामुळे (अॅसेट इंपेअरमेंट) २६,९६० कोटींचा तोटा झाला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पुढील काळातही संपत्तीचे मूल्य कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. चीनच्या बाजाराची स्थिती अत्यंत खराब असल्याचे मत अॅडलवाइज सिक्युरिटीजने व्यक्त केले होते.


    मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजने स्टॉकला डाउन ग्रेड करून न्यूट्रल केले आहे. त्यासाठी १६६ रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. डॉयचे बँकेने त्यासाठी १७५ रुपये, जेपी मॉर्गनने १७० रुपये अाणि बीएनपी परिबाने १५० रुपयांचे टार्गेट दिलेले आहे.

Trending