आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतर सेवानिवृत्तीची परवानगी घेण्यासाठी शिक्षिकेने व्हिलचेअरवरुन गाठले मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • तीन महिन्यांपासून धूळखात पडून असलेली फाईल पाचच मिनीटात सीईओंकडे सादर करण्यात आली

औरंगाबाद- सातारा खंडोबा येथील शाळेवर कार्यरत असलेल्या ज्योती संगेकर या शिक्षिकेचा अपघात झाला होता. तीन महिन्यांपुर्वी त्यांनी सन्मानपुर्व निवृत्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. व्हिआरएससाठी त्यांचा तीन महिन्यांपासून शिक्षिकेकडून पाठपुरावा सुरू होता. परंतू, शिक्षण विभागाकडून कुठलीच दखल घेण्यात येत नव्हती, अखेर मंगळवारी  या शिक्षिकेने व्हिलचेअरवरच जिल्हापरीषदेत दाखल झाल्या, त्यांना पाहून सीईओ डॉ. मंगेश गोंदावले तातडीने दालनातून बाहेर आले. सीईओंनी या प्रकरणात दखल घेताच तीन महिन्यांपासून धूळखात पडून असलेली फाईल पाचच मिनीटात सीईओंकडे सादर करण्यात आली.

सातारा येथील जि.प. प्रा. शाळेवर ज्योती संगेकर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. परंतू, तीन महिन्यांपूर्वी त्यांचा शाळेत अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाला तसेच पाठीच्या मनक्यांना मार लागला. त्यामुळे त्या अंथरुणाला खिळून होत्या. शाळेवर जाता येत नसल्यामुळे त्यांनी 29 नोव्हेंबरला व्हिआरएससाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता.


वारंवार पाठपुरावा करुनदेखील शिक्षण विभागाकडून त्यांच्या या प्रस्तावाची दखल घेण्यात येत नव्हती. अखेर मंगळवारी संगेकर या व्हीलचेअरवर जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागात दाखल झाल्या. तेंव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांनी जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी या शिक्षिकेला व्हिलचेअरवर येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी पाहिले. त्यावेळी त्यांनी स्वतः तातडीने दालनाच्या बाहेर येत त्यांची विचारणा केली. यावेळी पिडीत शिक्षिकेने सर्व प्रकार सीईओंच्या कानावर घातला. त्यानंतर पाच मिनिटात या शिक्षिकेची फाईल सीईओंच्या दालनात पाठवण्यात आली.

अनेकवेळा शिक्षण विभागाकडून तातडीच्या फाईल सामान्य प्रशासन विभागकडे पाठवण्यास दिरंगाई केली जाते. महिला शिक्षिकेची फाईल मागील तीन महिन्यांपासून विनाकारण दाबून ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक सेनेची आहे. या महिला शिक्षिकेच्या फाईलची तातडीने दखल घेतल्यामुळे सीईओचे मनापासून अभिनंदन - विठ्ठल बदर  सचिव, शिक्षक सेना