Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Teacher Anuradha Kajale success to climbing Mount Kilimanjar

सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेने आफ्रिकेतील सर्वोच्च किलीमंजारो शिखर केले सर; १९,३४१ फुटांवर फडकावला तिरंगा

प्रतिनिधी | Update - Dec 07, 2018, 08:34 AM IST

शिक्षिका अनुराधा काजळे यांनी यापूर्वी स्वर्गारोहिणी व कळसूबाई शिखरावरही केली चढाई

  • Teacher Anuradha Kajale success to climbing Mount Kilimanjar

    सोलापूर - कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका अनुराधा काजळे यांनी दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च असणारे किलीमांजारो शिखर सर केले. हे शिखर सर करणाऱ्या त्या सोलापुरातील पहिला महिला ठरल्या. तब्बल एक वर्ष सराव करून अनुराधा काजळे यांनी ही मोहीम यशस्वी केली. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता किलीमांजारो शिखराच्या गिलमन्स पॉइंट याठिकाणी भारताचा तिरंगा फडकवला.

    आफ्रिकेतील टांझानिया देशात हे शिखर आहे. उंची १९३४१ फूट आहे. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी याच शिखरावर भारताचे राष्ट्रगीत वाजवले होते. सोलापूरमधील २५० गिर्यारोहक व ट्रेकर्स आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत. गेल्या तीन वर्षात तब्बल १२ लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माउंट किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर केले आहे. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबई येथून या मोहिमेस प्रारंभ झाला. शिखर सर केल्यानंतर ३६० एक्सप्लोरर टीममार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आनंद बनसोडे, अक्षया बनसोडे, रोहित शेंडे, सागर जानराव, उमेश डुमणे, कैलास जानराव आदी उपस्थित होते.

    प्रतिकूल व कठीण वातावरणात जिद्द आली कामी : अनुराधा

    अनुराधा काजळे या कवयित्री असून त्यांचे 'मनीचे गुज' हे पुस्तक प्रकाशित आहे. यापूर्वी स्वर्गारोहिणी व कळसूबाई यासह विविध शिखर सर केले आहेत. त्या म्हणाल्या, पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास होता. तोही आफ्रिकेत. त्यामुळे भीतीही होतीच. पण एव्हरेस्टवीर बनसोडे याच्या मार्गदर्शनाच्या जोरावरच यश मिळविले. कठीण व प्रतिकूल वातावरणात जिद्दीने अंतिम चढाई पूर्ण करू शकले, याचा मला आनंद आहे.

Trending