आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांनी भरले परीक्षा शुल्क

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर तालुका सतत दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. गरिबी वैजापूरकरांच्या पाचवीला पुजलेली. अशा स्थितीत शाळेच्या मुला-मुलींची परीक्षा फीस भरणे गोरगरिबांना जमत नसे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे पालक शाळा सोडून देण्यास सांगत. नगरपालिके च्या वतीने चालवण्यात येणा-या दोन शाळांमधील काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असाच प्रसंग घडला. तेथील दहा गरीब विद्यार्थ्यांकडे सातवी बोर्ड परीक्षेची फीस भरण्याइतके पैसे नव्हते. त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. अत्यंत गरीब परिवारातले ते विद्यार्थी होते, पण कष्टाळू आणि हुशार होते.

भविष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात होती. हे मला माहिती होते. एक शिक्षणाधिकारी या नात्याने मी दोन्ही शाळांतील शिक्षकांना बोलावून घेतले. त्यांना आवाहन केले की, सामाजिक बांधिलकी म्हणून या विद्यार्थ्यांना मदत करावी. वर्गात आपण त्यांना शिकवतो. तेवढ्यापुरतेच संबंध सीमित ठेऊ नये. आपण सर्वांनी मिळून त्यांची फीस भरून टाकू. ही मुले गुणवंत आहेत. त्यांना परीक्षेला बसण्यास साह्य करूया. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत या शाळातील शिक्षकांनी त्या दहा विद्यार्थ्यांची बोर्डाचे परीक्षा शुल्क भरले. आम्ही आमचे एक सामाजिक कर्तव्य म्हणून जबाबदारी पार पाडली. 1993-94 सालचा हा अनुभव कधीही न विसरता येण्याजोगा आहे. या शिक्षकांनीही तत्काळ माझ्या प्रस्तावावर होकार भरला. हा त्यांच्याही मनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल. अन्यथा कोण कुणासाठी इतका विचार करतही नसेल? आज ते विद्यार्थी देश-विदेशात चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या पालकांची दु:खे फार वेगळी असतात. पोटाला खायला पुरेसे मिळत नाही, ती मुले शाळेत जाऊन करतील काय? त्यापेक्षा त्यांना कामाला लावले तर दोन पैसे मिळतील, असा विचार करणारे पालक आहेत. ती मुले शाळेत शिकायला आली हेच मोठे काम आहे.