आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाअनुदान शाळांना संपूर्ण अनुदान देण्यासाठी शिक्षकांचा काळा दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या राज्यातील कायम विनाअनुदान तत्त्वाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शेकडो शिक्षकांनी गुरुवारी काळा दिवस साजरा केला. विनाअनुदान तत्त्वावरील शाळांना संपूर्ण अनुदान द्यावे, अशी या शिक्षकांची प्रमुख मागणी आहे. आझाद मैदानावर ५ आॅगस्टपासून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे शिक्षक उपोषणाला बसले आहेत. त्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने काळे पोषाख परिधान करून काळा शिक्षक दिन साजरा केला व आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले.

विनाअनुदान तत्त्वावरील शाळांना संपूर्ण अनुदान द्यावे. तसेच दोनदा शिक्षकांवर लाठीहल्ला केलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी या शिक्षकांची मागणी आहे. २८ आॅगस्ट रोजी राज्य सरकारने कायम विनाअनुदान तत्त्वावरील शाळांना २० टक्के पुढच्या टप्प्याचे अनुदान जाहीर केले. मात्र, २०१६ मध्ये आम्हाला २० टक्के अनुदान जाहीर केले होते. त्यानंतर दोन वर्षे अनुदानाचे पुढचे टप्पे दिलेले नाहती. त्यामुळे आम्ही प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदानास पात्र आहोत, असे या शिक्षकांचे म्हणणे आहे.  महिनाभरापासून शिक्षकांचे मुंबईत आंदोलन सुरू असले तरी अजून तरी सरकारचा प्रतिनिधी म्हणून मंत्री किंवा इतर कुणीही शिक्षकांची साधी भेट घेण्यासाठी आले नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्यामुळे आता मागण्या मान्य न  झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या  वेळी शिक्षकांनी दिला.
 

मागण्या मान्य होईपर्यंत आंदाेलन सुरूच राहणार
राज्यातील हजारो शाळांत शिक्षकांनी काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध केल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. १९ सप्टेंबर २०१६ चा शासन निर्णय रद्द करत प्रचलित नियमानुसार शाळांना अनुदानाचे सूत्र जोपर्यंत लागू करण्यात येत नाही तोपर्यंत शिक्षकांचे मुंबईसह राज्यभरातील आंदोलन सुरूच राहील, असे कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.