आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष : दहावीत इंग्रजीत केवळ ३४ गुण, आता २४ राज्यांतून सेट उत्तीर्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मंगळवारी धानय्या कौटगी यांच्या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवर. - Divya Marathi
नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मंगळवारी धानय्या कौटगी यांच्या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवर.

सोलापूर - घरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शालेय जीवनात दोन वेळ पोटभर जेवणाची भ्रांत होती. अशा कौटुंबिक स्थितीत शिक्षण घेतलेल्या धानय्या गुरुलिंगय्या कौटगी यांना दहावीमध्ये इंग्रजी विषयात केवळ ३४ मार्क मिळाले. बारावीत फक्त ३६ टक्के गुण मिळाले. त्यांचे शिक्षण कर्नाटक सीमेवरील तोळणूर (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) या ठिकाणी झाले. इतके कमी गुण कसे घेतले म्हणून अनेक शिक्षकांची व मित्रांची बोलणी त्यांना खावी लागली. कर्जबाजारी वडिलांनी तर शिक्षणच सोडण्याचा सल्ला दिला. प्रसंगी मनात वाईट विचारही येऊन गेले. अशा स्थितीत ‘भविष्यात मी शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षक तर होईनच, शिवाय महाविद्यालयीन शिक्षक घडवणाराही शिक्षकही होईन,’ असे धानय्या कौटगी यांनी स्वप्न पाहिले होते.

काठावर दहावी-बारावी झालेल्या धानय्या यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून बीए, बीएड आणि एमएड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. आधी कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी अक्कलकोट येथील मंगरुळे प्रशालेत माध्यमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली. आज ते इंग्रजी आणि भूगोल विषयाचे विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांचे शिक्षक होण्याचे पाहिलेले स्वप्न धानय्या याना अस्वस्थ करीत होते. त्यासाठी त्यांनी देशभरातील २४ राज्यांतून सेट परीक्षा दिली. सर्व ठिकाणी ते उत्तीर्ण झाले. शिवाय तीन वेळा नेट परीक्षादेखील उत्तीर्ण झाल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. इंग्रजी, वुमेन स्टडी, भाषाशास्त्र, लोकसाहित्य आणि शिक्षणशास्त्र या चार विषयांमध्ये सन २०१३ पासून आजवर त्यांनी नेट आणि सेट परीक्षेत यश संपादित केले आहे. आजवर त्यांनी देशभरातील अनेक विद्यापीठांत पन्नासहून अधिक कार्यशाळा घेतल्या. नेट आणि सेट परीक्षार्थींना पहिल्या काॅमन पेपरसाठी स्वखर्चाने ते मार्गदर्शन करीत आहेत. 
 

शिक्षणासाठी शेती विकली, कर्जबाजारी व्हावे लागले
माझे शिक्षण खूप हलाखीत झाले. त्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले, चार एकर शेतीवरही पाणी साेडले. आज मी शिक्षकाची नोकरी सांभाळत स्वखर्चाने नेट-सेट परीक्षार्थींना पहिल्या कॉमन पेपरसाठी मार्गदर्शन करतो. 
- धानय्या गुरुलिंगय्या कौटगी, माध्यमिक शिक्षक, मंगरुळे प्रशाला, अक्कलकोट
 

या सेट-नेट परीक्षेत यश  
केरळ (चार वेळा), तामिळनाडू, आंध्र प्रदेश (दोन वेळा), कर्नाटक (पाच वेळा), तेलंगण (दोन वेळा), महाराष्ट्र आणि गोवा (दोन वेळा), गुजरात (दोन वेळा) राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत (सात राज्ये). महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून टीईटी परीक्षेत यश. सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मध्येही यश मिळाले. यूजीसी (गुलबर्गा विद्यापीठ), सीबीएससी (सोलापूर विद्यापीठ), ऑनलाइन एक्झाम नॅशनल टेस्टिंग एजन्सी (राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण) अशा तीन नेटच्या इंग्रजी परीक्षेत यश.
 
 

बातम्या आणखी आहेत...