आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची सत्त्वपरीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा येथे हायस्कूलमध्ये हिंदी शिक्षक म्हणून काम करत होतो. 1969 चा प्रसंग. या वर्षी डी. एड. करा, अन्यथा नोकरीवरून कमी करण्यात येईल, अशी नोटीस मुख्याध्यापकांनी दिली. 150 रुपये महिना पगारावर खासगी संस्थेत नोकरी, घरी आम्ही दोघे आणि तीन मुले. ट्रेनिंगला गेल्यावर प्रपंच सांभाळावा कसा? याची चिंता ग्रासत होती. शेवटी डी. एड.ची समकक्ष ‘ज्युनियर हिंदी शिक्षक सनद’ परीक्षेस बसण्याची परवानगी घेण्यासाठी मी उस्मानाबादला जाण्याचे ठरवले. माझे काही मित्र आणि सहका-यांशी चर्चा केली. 5 ते 10 रुपयांची चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाही, असेही काही जणांनी सांगितले.

15 ऑक्टोबर 69 रोजी उस्मानाबादला शिक्षण कार्यालयात पोहोचलो. परीक्षेस बसण्याचा अर्ज एका कारकुनाकडे दिला. अर्ध्या तासांनी मला फर्मावण्यात आले, साहेब आज आलेले नाहीत, उद्या या. दुस-या दिवशी दहा वाजता कार्यालयात पोहोचलो. एक वाजला तरी माझ्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नव्हते. म्हणून संबंधित कारकूनसाहेबांना भेटलो. जेवणाची वेळ झाली, आता 3 वाजता भेटा, असे तो म्हणाले. चहापाण्यासाठी एक रुपया देण्याचा विचार केला. 5 ते 10 रुपये दिल्याशिवाय कोणी काम करत नाही, या विचारानेच मला टेन्शन आले. मला असे पैसे देण्याचा अनुभवही नव्हता आणि पटतही नव्हते. हॉटेलमध्ये जाऊन एक आण्याचा चहा घेतला. काय करावे, सुचेना. शेवटी एका कागदावर विनंतीवजा कविता लिहून त्या कारकुनास दिली. त्यांनी कविता वाचली अन् काय उपरती झाली कोणास ठाऊक? काही वेळाने त्याने जवळ येऊन विचारले, ‘उस्मानाबादला कोणाची ओळख नाही का? रात्र कोठे काढली.’ ‘चहा पिऊन स्टँडवर काढली,’ मी म्हणालो. ‘आपने बहोत तकलीफ उठायी’ असे म्हणत त्यांनी मला परवानगीची ऑर्डरच हातात दिली. माझे डोळे पाणावले. वडील माणूस म्हणून मी त्यांच्या पाया पडण्यासाठी वाकलो, त्याने माझे खांदे धरून उठवत ‘नही मियाँ’ असे म्हणून मिठीच मारली.