आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Technical Training Of Kho Kho Within 20 Days ; Bhutan Is The Sixth Team Participate In SAF

खाे-खाेचे २० दिवसांत तंत्रशुद्ध प्रशिक्षण; सॅफमध्ये खाे देणारा भूतान हा सहावा संघ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ पाठक 

औरंगाबाद - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असली की जगात काेणतीही गाेष्ट आत्मसात करता येते. यासाठी काेणत्याही प्रकारच्या भाषा आणि ठिकाणाचा अडसर नसताे. इच्छा असली की, यासाठीचे मार्ग सहज सापडतात, याचाच प्रत्यय भूतानच्या युवा खाे-खाे  संघांनी दाखवून दिला. येथील ५० पेक्षा अधिक युवा  खेळाडूंनी भारतामधील खाे- खाे हा खेळ तंत्रशुद्धपणे आत्मसात केला.  

अवघ्या २० दिवसांत तंत्रशुद्धपणे खाे-खाेचे प्रशिक्षण घेऊन भूतानचे युवा खेळाडू आता तरबेज झाले. यातूनच भुतानचा संघ आता आगामी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅफ) खाे  देणार आहे. अशा प्रकारे तिरंदाजी आणि फुटबाॅलपाठाेपाठ आता भुतानचा संघ यंदाच्या सॅफमध्ये खाे-खाे खेळ प्रकारात नशीब आजमावणार आहे. यातूनच आता खाे-खाे खेळ प्रकारात सॅफमध्ये सहभागी हाेणारा भूतान हा सहावा संघ ठरला आहे. खाेे-खाे खेळ प्रकारात  भारतासह श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि आता भूतान टीमचा समावेश असेल. 

पहिल्याच आठवड्यात १ ते १० डिसेंबरदरम्यान नेपाळ येथे सॅफ स्पर्धेचेे आयाेजन करण्यात आले. आता या स्पर्धेत भुतानचे महिला आणि पुरुषांचा खाे-खाे संघ सहभागी हाेणार आहे. भूतानच्या या दाेन्ही संघांनी भारताच्या अनुप चक्रवर्ती यांच्याकडून याचे काेचिंग घेतले. यासाठी १० ते २९ सप्टेंबरपर्यंतचे प्रशिक्षण शिबिर आयाेजित करण्यात आले हाेते. यामध्ये १५ दिवस प्रशिक्षण देण्यात आले आणि  त्यानंतर पाच दिवस दाेन्ही गटातील सहा संघांची स्पर्धा झाली.
 
 
 
यूट्यूब, व्हिडिओवरून घेतले अचूक प्रशिक्षण
शालेय स्तरावरील या सहभागी नवीन खेळाच्या सरावासाठी शाळांनी माेठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यामुळे याठिकाणी काेच अनुप चक्रवर्ती यांनी प्रशिक्षण  शिबिरात सहभागी झालेल्या युवा खेळाडूंना यु ट्युब, व्हिडिओ आणि इतर चलचित्रांच्या माध्यमातून खाे-खाे खेळ प्रकाराचे बारकावे समजुन सांगितले. व्हिडिओमुळे हे काेचिंग अधिक प्रभावी ठरल्याचे ते म्हणाले. 

आर्मीसह काॅलेज आणि शाळकरी विद्यार्थ्यांना गाेडी
शालेय स्तरावर समाविष्ट हाेणाऱ्या  या नवीन खेळाला आत्मसात करण्यासाठी आर्मीसह काॅलेज आणि शाळेतील अनेक युवा खेळाडू सहभागी झाले. ही पंसती मिळाल्याने आयाेजित प्रशिक्षण शिबिरामध्ये सहापेक्षा अधिक काॅलेज आणि शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले हाेते.तसेच आर्मी दलातीलही काही सैनिक यात सहभागी झाले हाेते. त्यामुळे गुणवंत खेळाडू तयार झाले आहेत.
 

भुतानचा प्रवेश निश्चित: त्यागी
भुतानच्या युवा खेळाडूंना  प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे या संघाने  दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी हाेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील  खाे-खाे प्रकारात सहभागी हाेणारा भुतान हा सहावा संघ ठरणार आहे. दाेन्ही गटात भुतानचे संघ खेळणार आहे, हेच  माेठे यश आहे.
 - महेंद्र सिंग  त्यागी, सचिव, अखिल खाे-खाे महासंघ,दिल्ली

माती व मॅटवर कसून सराव
भुतानच्या युवा खेळाडूंना अवघ्या दाेन ते तीन दिवसात खाे-खाे या नवीन खेळाची गाेडी लागली. त्यामुळे प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेले दाेन्ही गटाचे ५० खेळाडू माती आणि मॅटवर खाे-खाेचा कसून सराव करू लागले. हा संध्याकाळच्या वेळी नित्याच्या हाेणाऱ्या सरावानेच सर्वांचे लक्ष वेधले. यातूनच अनेक खेळाडू या खेळाकडे वळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे माती आणि मॅटवरच्या खाे-खाेच्या प्रशिक्षण सरावाला अधिक प्रसिद्धी आणि महत्त्व प्राप्त झाले.

सिक्कीमच्या सचिवाकडून खास प्रशिक्षण मिळाले
केंद्रीय क्रीडा  मंत्रालयाने आता भुतानमध्येही खाे-खाेचा प्रसार आणि प्रचार वेगाने व्हावा, यासाठी अखिल भारतीय महासंघाच्या सहकार्याने पुढाकार घेतला. या प्रशिक्षणासाठी  सिक्कीम फेडरेशनचे सचिव अनुप चक्रवर्ती यांच्यावर जबाबदारी  साेपवली.  त्यांनी २० दिवस भुतान येथे स्थानिक खेळाडूंना याचे प्रशिक्षण दिले.