Technology / तंत्रज्ञान, कौशल्य प्रशिक्षण देऊन सामाजिक संस्थांच्या कामांना दिली गती

तीन अभियंत्यांच्या पुढाकारातून स्थापन ‘वोवेल्स ऑफ द पीपल्स असोसिएशन’ने जपले सामाजिक भान 
 

अनंत वैद्य

May 06,2019 10:05:00 AM IST

बीड-ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग व इतर सामाजिक कार्यकर्ते, संस्थांशी तीन अभियंत्यांचा संपर्क आला अन‌् आपणही समाज विकासासाठी योगदान दिले पाहिजे, ही जाणीव झाली. त्यातून तिघांनी ‘वोपा’ ही संस्था स्थापन करत शिक्षण व सामाजिक संस्थांना, त्यांच्या मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याचे कार्य हाती घेतले. यातून या संस्थांच्या कामकाजात गतिमानता येत असून पर्यायाने समाज विकास व लोकशिक्षणाचे कार्य अधिक प्रभावी होत आहे.


आकाश भोर, प्रफुल्ल शशिकांत व ऋतुजा जेवे या तीन अभियंत्यांनी सामाजिक जाणिवेतून जून २०१८ मध्ये ‘वोवेल्स ऑफ द पीपल्स असोसिएशन’ (वोपा) ही ‘एनजीओ’ स्थापली. सामाजिक कार्यात झाेकून दिलेल्या अनेक संस्था, व्यक्ती आहेत. उपलब्ध तंत्रज्ञान व कौशल्यांचा वापर करत या साऱ्यांचे कार्य गतिमान व रचनात्मक पध्दतीने झाले तर समाज विकसित होण्याच्या प्रक्रियेस गती मिळू शकते. या हेतूने ‘वोपा’ने प्रशिक्षण देण्याचे काम हाती केले. याद्वारे शिक्षण पध्दतीत होत असलेले बदल, ज्ञानरचनावाद, कृतियुक्त अध्ययन आदी उपक्रमांचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले. सामाजिक क्षेत्रात नव्यानेच आलेल्या युवकांना, संस्थांना रचनात्मक पद्धतीने काम करण्याची धडे दिले. ‘वोपा’ने मुख्यत्वे विकासापासून दुर्लक्षित असलेल्या मराठवाड्यात कार्य करण्याचे ठरवलेले आहे. त्यानुसार काम सुरू आहे. सोनदरा गुरुकुल, स्नेहालय आदींसह इतर काही संस्थांसोबत ‘वोपा’ने वर्षभरात काम केले आहे. या ठिकाणच्या शिक्षकांनी प्रशिक्षणानंतर दैनंदिन कामकाज अधिक गतिमान व मूल्य केंद्रित झाल्याची प्रतिक्रिया दिली, हीच आपल्या कामाची पावती असल्याचे ‘वोपा’चे संचालक आकाश भोर यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, आनंद करंदीकर, सुदाम भोंडवे, प्रमोद मुझूमदार, शिक्षणतज्ज्ञ हेमा होलमाडे आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनातून ‘वोपा’ची ही वाटचाल शाश्वत समाज विकासासाठी योगदान देणारी ठरत आहे.

अनुभवही आला कामाला : आकाश भोर व प्रफुल्ल शशिकांत या दोघांनी डॉ.अभय बंग यांच्या ‘सर्च गडचिरोली’ व ‘कुमार निर्माण’ या उपक्रमांत कार्य केले होते. यासह ऋतुजा जेवे ही ‘मुख्यमंत्री फेलो’ राहिलेली आहे. यादरम्यान आलेल्या अनुभवांचा वापर करत त्यांनी मराठवाड्यात काम करण्याचे ठरवले.

मराठवाड्याला फायदा व्हावा
माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अद्ययावत पद्धती, शास्त्रीय अभ्यास पद्धती व मूल्याधिष्ठित कार्यशैलीचा अवलंब सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या कामात झाल्यास संबंधित भागाचा विकास होतो. विकासाचा अनुशेष असलेल्या मराठवाड्याला फायदा व्हावा, यासाठी याच भागात काम करणार असल्याचे ‘वोपा’चे संचालक भोर यांनी सांगितले.

X