आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त मनोरंजनासाठी नव्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका हायस्कूलमधली हॅना बेकर नावाची सतरा वर्षांची मुलगी आत्महत्या करते आणि त्या हायस्कूलमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात वादळ निर्माण होतं. आपली हसती-खेळती, आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी, स्वप्नं बघणारी मुलगी गेली म्हणून आईबाबांना धक्का बसतो. हायस्कूलमध्ये या विषयावर आपापसांत बोलायचं नाही, गैरसमज वाढवायचे नाहीत असा संदेश देणारी कौन्सिलिंग सेशन्स होऊ लागतात. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या हॅनाच्या आईला असं समजतं की, हॅनाला हायस्कूलमध्ये काही त्रास होत होता पण मॅनेजमेंटने त्याकडे कानाडोळा केला. आई हायस्कूलच्या विरोधात "यांच्यामुळे माझी मुलगी गेली" अशी कोर्टात केस करते. दुसरीकडे क्ले जेन्सन नावाचा हॅनाचा जवळचा मित्र, जो तिच्या प्रेमात असतो, त्याला या प्रकरणामुळे प्रचंड धक्का बसलेला असतो. ती असं काही करेल हे त्याच्या ध्यानीमनीही नसतं. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असलेल्या क्लेला एके दिवशी एक पार्सल मिळतं. त्यात काही कॅसेट्स असतात. त्या कॅसेट्सवर, एकापासून क्रमांक आणि साइड्स A आणि B असं नेलपॉलिशने पेंट केलेलं असतं. क्ले एक नंबरची कॅसेट, साइड A वर लावून ऐकतो आणि हादरतो. त्यात हॅनाचा आवाज असतो. आत्महत्या करण्यापूर्वी हॅनाने स्वतःच्या आवाजात या कॅसेट्स रेकॉर्ड केलेल्या असतात. तिच्या मृत्यूची १३ कारणे या कॅसेट्सवर असतात आणि म्हणून मालिकेचं नाव थर्टीन रीझन्स व्हाय. म्हणजे हॅनाने आत्महत्या तिरीमिरीत केलेली नसते. तिच्या समोरचे, तिला अपेक्षित सारे पर्याय संपल्यावर तिने तो निर्णय घेतलेला असतो आणि ती गेल्यावर तिची स्टोरी सगळ्यांना कळावी म्हणून तिने तिची बाजू, तिची स्टोरी रेकॉर्ड केलेली असते. हायस्कूलमध्ये झालेल्या bullying, sexual violenceमुळे हॅनाने आत्महत्या केलेली असते. एकीकडे तिच्या आत्महत्येने खचलेला क्ले या कॅसेटच्या प्रकाराने गोंधळून जातो. लागलीच त्याच्या लक्षात येतं की, या कॅसेट्सच्या प्रती जे हॅनाच्या आत्महत्येच्या निर्णयाला कारणीभूत आहेत त्या सगळ्यांकडे पोहोचलेल्या आहेत. म्हणजे हॅनानेच जाण्यापूर्वी ती व्यवस्था करून ठेवलेली आहे. १३ कारणांमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. क्ले जसजसा एकेक कॅसेट ऐकतो तसतशी त्याला त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळत जाते. हा आहे या सिरीजचा प्लॉट. जे अॅशर नावाच्या लेखकाने लिहिलेल्या थर्टीन रीझन्स व्हाय या कादंबरीवर आधारित ही सिरीज आहे. या सिरीजचे दोन सीझन्स येऊन गेलेत, दोन्ही नेटफ्लिक्सवर आहेत. तिसरा  येणार आहे.


पहिला सीझन क्लेच्या नजरेतून पाहायला मिळतो. हॅनावर प्रेम असल्यामुळे प्रत्येक कॅसेट ऐकताना त्याला खूप यातना होत असतात त्यामुळे त्या कॅसेट्स सलग ऐकणं त्याला जमत नाही. प्रत्येक कॅसेट ऐकताना, नमूद केलेली व्यक्ती, ठिकाणं त्याच्या डोळ्यासमोर येतात. त्या प्रसंगातून होरपळत असलेली हॅना त्याला दिसते. आणि आपण काही करू शकलो नाही याचा त्याला त्रास होत राहतो. 
ही सिरीज का पाहावी?


सतराअठरा वर्षांची मुलं, हायस्कूल, ड्रग्ज, bullying, sexual violence, आत्महत्या याभोवती फिरणारी ही सिरीज नक्कीच करमणूक या शीर्षकाखाली येत नाही. सध्याच्या जगात तरुण पिढी कुठे, कशी चुकू शकते, त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे पाहून अस्वस्थ व्हायला होतं. मला स्वतःला ही सिरीज पाहताना हॅना बेकरही खूप चुकली आहे असं वाटत होतं. (हे चुकणं, आत्महत्येच्या संदर्भात नाही तर वेगळ्या संदर्भात आहे, आत्महत्येचं समर्थन होऊच शकत नाही). पण नंतर थोडा विचार केला आणि बालपण आठवलं. एक वय असतं ज्यात आईवडील, भावंडं, नातेवाईक, शिक्षक या सगळ्यांपेक्षाही मित्रमैत्रिणी महत्त्वाचे आणि ´भारी´ वाटत असतात. आपण एखाद्या ग्रुपमध्ये असलो तर त्या ग्रुपमध्ये स्वीकारलेलो आहोत, हे वाटणं खूप महत्त्वाचं वाटत असतं. आपल्याला आतून तसं वाटत नसलं तरीही सतत भासवत राहावंसं वाटतं. आता मागे वळून पाहताना त्या गोष्टीचं हसू येतं. पण तेरा ते अठरा या उमलत्या वयात ती भावना खूप मोलाची असते. अजूनही आठवतंय, शाळेत सातवीत असताना वर्गात एक नवीन मुलगी आली होती. तिच्या वडिलांची बदली झाली होती आणि तिने आमच्या शाळेत प्रवेश घेतला. तोपर्यंत वर्गात मुलामुलींचे ग्रुप्स झालेले होते. कोणीही त्या मुलीला आपल्या ग्रुपमध्ये घेतलं नाही. शेवटी ती आणखीन एका नवीन आलेल्या मुलीबरोबर बसायची ते शाळा संपेपर्यंत असंच चाललं. आता आठवून वाईट वाटतं. आतले आणि बाहेरचे असा प्रकार असायचा तेव्हा. आपापल्या ग्रुपचा केवढा तो माज असायचा. त्याच्यापायी एखाद्या नवीन मुलीला आपल्यात सामावून घ्यावे असा विचारही आला नाही मनात. तिला तेव्हा काय वाटलं असेल? 


आमच्या शाळेबद्दलच्या ज्या गोड भावना आहेत तशा तिच्या असतील का? नक्कीच नाही. हॅनाची कथाही थोडीफार तशीच आहे. तिच्या आईवडिलांना आर्थिक चणचणीमुळे नवीन जागी जावं लागतं. पर्यायाने हॅनाला नवीन हायस्कूलमध्ये जावं लागतं. तिथे मुलांच्या आधीपासूनच्या ओळखी, मैत्री आहेत. हॅना मित्रमैत्रिणी, प्रेम मिळवायला, त्यांच्याकडून स्वीकारलं जायला धडपडते पण पदरी निराशा येते. मागे एकदा एक मैत्रीण म्हणाली होती की, तिच्या दहावीतल्या भावाला डिप्रेशन आलंय, कारण त्याच्याकडचा मोबाइल फोन वर्गातल्या मुलांकडच्या फोनपेक्षा कमी किमतीचा, कमी स्मार्ट आहे म्हणून. ऐकून हसू आलं, राग आला, आधी "काय करायचाय काय मोबाइल फोन दहावीतल्या मुलाला? आमच्या वेळी कुठे होती ही नाटकं?" असा विचार मनात आला. एक पाऊल मागे जाऊन कळतं की "प्रत्येक पुढची पिढी आपल्यापेक्षा नशीबवान आहे कारण त्यांना सगळं सगळं उपलब्ध आहे आणि तरीही त्यांना डिप्रेशन येतं म्हणजे काय" हा विचार किती फोल आहे. कारण प्रत्येक पिढीच्या समस्यादेखील वेगवेगळ्या आहेत. मागच्या पिढीला जे मिळालं नाही ते exposure आजच्या पिढीला मिळतं या नाण्याच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू आहेत. पॉझिटिव्ह बाजू त्यांना आधीच्या पिढीपेक्षा अधिक स्मार्ट बनवते तर निगेटिव्ह बाजू अधिक व्हल्नरेबल बनवते. काय बरोबर काय चूक हे समजण्याची त्यांची कुवत असेलच असं नाही, ज्यांची नसते ते ह्या एक्सपोझरलाही बळी पडतात. 


जर्मन भाषेत एक म्हण आहे Qual der Whal (Qual म्हणजे त्रास, टॉर्चर आणि Whal म्हणजे चॉइस) म्हणजे भरपूर चॉइस असल्याचा त्रास होणे. कारण काय निवडायचं हेच कळत नाही, काय बरं काय वाईट उमजत नाही. आणि हा आताच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. त्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी, तावून सुलाखून निघण्यासाठी आईवडील, आप्तेष्ट, त्यांच्याबरोबरचा मनमोकळा संवाद, चांगले मित्रमैत्रिणी सगळ्यांची गरज आहे. दुर्दैवाने हॅनाला हे मिळत नाही आणि तिची ससेहोलपट सुरू होते. सतराअठरा वर्षांची मुलंही किती manipulative, क्रूर, विखारी असू शकतात, घरच्यांशी सोयीने खरंखोटं बोलू शकतात याची एक झलक या सिरीजमधून पाहायला मिळते. "आपलं मूल हे असं करूच शकणार नाही" असा आईवडिलांचा आत्मविश्वास कधी कधी नडू शकतो तर कधी कधी आपल्या मुलावर दाखवलेला अविश्वास त्याला खोल गर्तेत ढकलू शकतो. सध्याच्या काळात फक्त मुलांसाठीच आव्हाने आहेत असं नाही तर पालकत्वही तारेवरची कसरत आहे. अशा अनेक पैलूंवर फोकस करणारी ही सिरीज आहे म्हणून पाहायला आवडली. पहिल्या सीझनमध्ये हॅनाच्या तोंडची गोष्ट आहे तर दुसऱ्या सीझनमध्ये न्यायालयात चालणारा खटला दाखवलाय त्यामुळे कॅसेट्समध्ये असलेल्या मुलांची स्टेटमेंट्स आहेत, त्यांच्या वाटची गोष्ट आहे. ‘वास्तविक’ असं या सिरीजबद्दल म्हणता येईल. आत्महत्येचं कुठल्याही प्रकारे समर्थन किंवा उदात्तीकरण नाही. 


प्रत्येक एपिसोडनंतर एक मेसेज झळकतो "जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर मदत मिळवण्यासाठी इथे संपर्क करा’ आणि एक लिंक आणि नंबर दिला जातो. अमेरिकेतल्या एका हायस्कूलमध्ये दाखवण्यात आलेली ही स्टोरी आहे. तिथे सतराअठरा वर्षांची मुलं सेक्शुअली अॅक्टिव्ह असतात आणि ते त्यांच्या पालकांनाही माहीत असतं, काही पालक तर आपल्या मुलांबरोबर त्याची चर्चाही करतात. त्या वयात हॉर्मोन्समुळे या सगळ्या भावना उद्दीपित होतात असा प्रॅक्टिकल विचार केल्यामुळे पालकांना त्यात काही गैर वाटत नाही. भारतात अजूनही त्या मानाने संकुचित विचार आहेत. हार्मोन्स हे संस्कृतीच्या दबावाखाली येतात. त्यामुळे त्या वयातली किती मुलं सेक्शुअली अॅक्टिव्ह असतात याचा आकडा मिळणं कठीण. आईवडिलांसोबत उघड चर्चा करणं तर दूरच राहिलं. पण म्हणून भारतीय संदर्भात ही सिरीज अस्थानी ठरते, असं नाही. सोळासतरा वर्षांच्या मुलामुलीत सेक्स हा मुद्दा इतका मोठा नसेलही. पण कॉलेजमध्ये चालणारं रॅगिंग, अभ्यासाचा, करिअरचा मुलांवर येणार एकंदर ताण, डिप्रेशन येणारी कारणे अनेक आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळी, मन वेगळं, विचार करायची, प्रसंगांना तोंड द्यायची ताकद वेगळी आणि म्हणून कोणाच्याही मनात काय चाललंय हे ओळखणं कठीण. आत्महत्या केलेल्यांच्या आसपासच्या अनेकांना माहीतही नसतं की ती व्यक्ती निराशेच्या इतक्या खोल गर्तेत होती. त्यात सोळासतरा वर्षं हे अगदीच कोवळं वय. आणि म्हणून त्यांना जपणं तितकंच महत्त्वाचं आणि कठीण. या पार्श्वभूमीवर ही सिरीज कुठेतरी खोलवर परिणाम करते. आधी म्हटल्याप्रमाणे यात सेक्शुअल व्हायोलन्स, ड्रग अब्युज अश्या बऱ्याच अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी दाखवल्या आहेत. ते लक्षात घेऊन ही सिरीज पाहावी.


तेजल राऊत, हॅनोव्हर, जर्मनी
tejalkraut@gmail.com

बातम्या आणखी आहेत...