आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद, परभणीच्या तापमानात १५ अंशांपर्यंत घसरण; जानेवारीत असेल कडाका!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतोष देशमुख 

औरंगाबाद - बुधवारी मराठवाड्यातील आठपैकी औरंगाबाद व परभणी जिल्ह्याचे किमान तापमान १५ अंश सेल्सियस होते. उर्वरित पाच जिल्ह्यांचे तापमान १६ ते १९ अंश सेल्सियस दरम्यान राहिले. उत्तरेकडून शीत वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढतोय. मात्र, बदलत्या हवामानामुळे थंडीत अडथळे निर्माण होत आहे. परिणामी दिवसभर उन्हाचा चटका तर सायंकाळ ते सकाळपर्यंत थंडी जाण्वते. जानेवारीतच अति कडाक्याची थंडी  जाणवेल असा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून तर ऑक्टोबरमध्ये लहान उन्हाळा व परतीचा पाऊस पडतो.  नोव्हेंबर ते फेब्रुवारी हिवाळा आणि मार्च ते जून उन्हाळा असे ऋतुचक्र मानले जाते. मात्र, वृक्षांची कमालीची घटलेली संख्या, डोंगरऱ्यांचा ऱ्हास, वाहन संख्या, लोकसंख्या आणि सिमेंटच्या जंगलाच्या संख्येत झालेली वाढ, जल, वायू, ध्वनी आणि भूमी प्रदूषणातील अफाट वाढीमुळे हवामानात अनपेक्षित तसेच वेगाने बदल होत आहेत. त्याचा ऋतू चक्रावर परिणाम झाला अाहे. यंदा मान्सून बरोबरच हिवाळाही लांबणीवर पडला आहे. मान्सून काळात महाचक्री वादळाने पाऊस पळवला होता. कयार वादळाने ऑक्टोबर हिट ऐवजी अतिवृष्टी झाली. १, २, ३ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १९ अंशांवर होते. पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. त्यानंतर पावसाची स्थिती बदलली व थंडी संथगतीने दाखल झाली. त्याला आठ  दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या बुलबुल चक्रीवादळाने ब्रेक लावला.  औरंगाबादचे किमान १६ ते १७ अंशांवर असलेले किमान तापमान प्रथमच १८ नोव्हेंबर रोजी १३.६ अंशांवर खाली आले होते. एकाच दिवसांत त्यात ३.१ अंशांनी मोठी वाढ होऊन १९ नोव्हेंबर रोजी १६.२ अंशांवर जाऊन पोहोचले होते. २० नोव्हेंबर रोजी पुन्हा १.२ अंशांनी घसरण होऊन ते १५ अंशांवर स्थिरावले.  परभणी १५, बीड व उस्मानाबाद १९, हिंगोली, लातूर १८ आणि जालना १७ अंश सेल्सियस तापमान होते. कमाल तापमान २९ ते ३१ अंश दरम्यान आहे. आकाशात थंड, बाष्पयुक्त व उष्ण वाऱ्यांचा संगम होऊन ढगांचे आच्छादन पसरते. पृथ्वीवरून परावर्तीत होणारी उष्णता ढगांत अडकून आर्द्रता ५० टक्क्यांवर राहात आहे. त्यामुळे दिवसा उकाडा व रात्री गारवा जाणवतो. आठ दिवस तापमानातील चढउतार जाणवणार असल्याचे हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात ढगांचे सावट व ऊन सावलीचा खेळ असेल. त्यामुळे स्थळनिहाय कमाल व किमान तापमानात मोठी तफावत राहील. थंडी व उकाडा जाणवेल. ढगाळ वातावरण तूर पिकासाठी घातक तर ज्वारीसाठी पोषक ठरते. इतर पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने उपाय करणे फायदेशीर ठरेल. प्रमुख १९ शहरांचे तापमान आलेख (किमान तापमान)


औरंगाबाद     १५

परभणी     १५

नांदेड     १६.५

पुणे     १५.६

जळगाव     १७


नगर : राज्यात सर्वात कमी    १२.६

अमरावती     १४.६

अकोला     १५.२

नागपूर     १५

नाशिक     १४.५


रत्नागिरी     २३.२ 

कोल्हापूर     २१.४

मुंबई     २१.४


ठाणे : सर्वाधिक तापमान    २४

महाबळेश्वर     १६

सातारा     १७

सांगली     २१


सोलापूर     २०.५

बातम्या आणखी आहेत...