अपघात / चालकाला डुलकी; पिकअपवर ट्रॅक्टर आदळून पाच वारकरी ठार

सांगोला येथे अपघात; मृत, जखमी वारकरी कर्नाटकचे रहिवासी

दिव्य मराठी वेब टीम

Nov 09,2019 09:04:33 AM IST

सांगोला - चालकाला डुलकी लागल्याने महिंद्रा पिकअपवर ट्रॅक्टर आदळल्याने कार्तिक वारीसाठी पंढरपूरकडे जाणारे पाच वारकरी ठार झाले. अन्य पाच वारकरी गंभीर जखमी झाले. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास सांगोला येथे पंढरपूर रस्त्यावरील मांजरीजवळ हा अपघात झाला.


कार्तिक वारीनिमित्त मंडाेली (ता. बेळगाव) येथून दहा वारकरी महिंद्रा पिकअपमधून (केए २२ बी - ५८१५) गुरुवारी रात्री पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास सांगोला येथे चहा घेऊन ते पंढरपूरकडे निघाले. मांजरीजवळ शब्बीर मुलाणी यांच्या घरासमोर विटा भरून सांगाेल्याकडे निघालेला ट्रॅक्टर (एमएच १३ एएन-०९९२) चुकीच्या दिशेने जाऊन पिकअपवर धडकला. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्यांमध्ये विटा होत्या. अपघातानंतर चालकाशेजारी बसलेले परशुराम दळवी जागे झाले. चालक यल्लप्पा देवाप्पा पाटील (रा. हंगरगा, ता. बेळगाव) हा जखमी अवस्थेत रोडच्या कडेला बसला होता. तेथेच त्याचा मृत्यू झाला. कृष्णा कणबरकर, लक्ष्मण ऊर्फ टेलर परशुराम आंबेवाडीकर, महादेव कणबरकर, अरुण मुतेकर हे जागीच ठार झाले. गणपत दळवी, गुड्डू तरळे, मात्रू साळवी, वैजू कणबरकर, दिलीप शेरेकर (सर्व रा. मंडाेली, ता. बेळगाव) हे जखमी झाले. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परशुराम दळवी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस, नागरिकांनी केले मदतकार्य

पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर हे पंढरपूर वारी बंदोबस्तावरून सांगाेल्याकडे परत येताना ही दुर्घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सांगोल्याचे सहायक पोलिस निरीक्षक नलवडे, अप्पासाहेब पवार, पोलिस नाईक बनसोडे, जाधव यांना बोलावून घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत व जखमींना बाहेर काढले. शुक्रवारी एकादशी असल्याने पंढरपूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी होती. अपघातामुळे ही वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरू केली.

X
COMMENT