आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजार रुपये काढून दिले अन् 75 हजार रुपये पळवले; महसूल विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला गंडवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगाेली : हिंगोली शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला एटीएममधून दहा हजार रुपये काढून मोजण्यासाठी दिले अन् बनावट एटीएम कार्ड देऊन दुसऱ्या दिवशी त्याच्या बँक खात्यातून ७५ हजार रुपये पळवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.११) गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जिजामाता नगरात महसूल विभागाचे सेेवानिवृत्त कर्मचारी हुकुमचंद वाळले हे शुक्रवारी (ता.१०) सकाळी साडे अकरा वाजता भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी गर्दी असल्याचा गैरफायदा घेत एका भामट्याने वाळले यांना पैसे काढून देतो असे म्हणत त्यांच्या जवळील एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर वाळले यांनी दहा हजार रुपये काढून द्या असे सांगितल्यानंतर भामट्याने पाच-पाच हजार रुपये दोन वेळेस काढून त्यांना माेजण्यासाठी दिले. सदर पैसे मोजण्याच्या नादात वाळले यांचे एटीएमकडे लक्ष गेले नाही. त्यानंतर भामट्याने त्यांना बनावट एटीएम कार्ड देऊन त्यांचे एटीएम कार्ड स्वतः जवळ ठेवले. मात्र भामट्याने दिलेल्या एटीएम कार्डची पाहणी न करताच वाळले घरी गेले. शनिवारी (ता.११) त्या भामट्याने वाळले यांचे एटीएम कार्ड वापरून ७५ हजार रुपये काढले. बँक खात्यातून पैसे काढल्याचा संदेश माेबाइलवर आल्यानंतर ते घाबरून गेले. त्यांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून शहर पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक साईनाथ अनमोड पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, दोन दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज पाहता आले नाही. आता सोमवारी (ता.१३) फुटेज पाहून आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...