आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवन्यामध्ये दहा वर्षीय शाळकरी मुलाचा डेंग्यूच्या तापाने मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवना : साफसफाई अभावी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शिवन्यासह परिसरात डेंग्यूसदृश तापाच्या आजाराने अनेक जण अंथरुणाला खिळले आहेत. डेंग्यूच्या आजाराचे निदान झाल्यानंतर एका दहावर्षीय शाळकरी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी (दि. ८)मध्यरात्री दोन वाजता ही घटना घडली. व्हायरल इन्फेक्शन होऊन पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स कमी जास्त होण्याचे प्रमाण असणारे रुग्ण अधिक आहे. अशा रुगांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून, डेंग्यूसदृश ताप असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. गौरव सुभाष गाडेकर असे मृत मुलाचे नाव असून, गेल्या पंधरा दिवसांपासून तो तापाने फणफणत होता. दोन दिवसांपूर्वी त्याला डेंग्यूचा ताप असल्याचे निदान झाले होते, याशिवाय तापामुळे त्याच्या पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. प्रकृती अधिकच अस्वस्थ होत गेल्याने उपचारादरम्यान अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

मोलमजुरी करुन कुटुंबाचा गाडा
गौरव हा इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात एक बहीण, आई वडील असा छोटा परिवार आहे. सुभाष हे भूमिहीन असून, मोलमजुरी करून हे दांपत्य कुटुंबाचा गाडा हाकत होते. पण खांद्याला खांदा लावून चालणारा मुलगा गेल्याने ते दुःखात बुडाले आहेत. त्याच्या जाण्याने परिसरावर शोककळा पसरली असून, आरोग्य विभागाने तपासणी मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

व्हायरल इन्फेक्शन...
व्हायरल इन्फेक्शन होऊन वरील आजार रुगांना जडत आहेत. त्यासाठी पाणी साठवू नये, पिण्याचे पाणी उकळून पिणे, घरासमोर स्वच्छता ठेवणे यासारखे उपाय करता येईल. सध्यातरी तापाच्या आजाराने त्रस्त रुग्ण येत आहेत, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स कमी जास्त असणारी रुग्णांची संख्या मात्र वाढत अाहे. -डॉ. सलमान खान, मेडिकेअर क्लिनिक शिवना
 

बातम्या आणखी आहेत...