आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेरर फंडिंग : पाकला सज्जड दम, फेब्रुवारीत काळ्या यादीत नाव!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद : दहशतवादी कारवायांसाठी होणारा निधीचा पुरवठा रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांत अपयशी ठरलेल्या पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) ग्रे लिस्टमध्ये टाकल्यानंतर आता पाकला यासाठी फेब्रुवारी २०२० पर्यंतची मुदत देऊ करण्यात आली आहे. या मुदतीत पाकने दहशतवाद्यांना दिला जाणारा निधी थांबवला नाही तर पाकचे नाव काळ्या यादीत नोंदले जाईल.

पॅरिसमध्ये एफएटीएफच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. तूर्त पाकला काळ्या यादीत टाकण्याचे एफएटीएफने टाळले असले तरी ही पाकसाठी केवळ एक संधी आहे. अगोदरच ग्रे लिस्टमध्ये अाल्यामुळे अडचणीत आलेल्या पाकिस्तानच्या अडचणी फेब्रुवारीत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बैठकीत पाकची फजिती... 
मंगळवारी एफएटीएफच्या झालेल्या बैठकीत पाकिस्तानच्या आर्थिक विषयाचे मंत्री हमाद अजहर यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय शिष्टमंडळ हजर होते. यात पाकच्या वतीने असे नमूद करण्यात आले की, दहशतवाद्यांना पुरवल्या जाणाऱ्या निधीबाबत २७ पैकी २० मुद्द्यांवर सकारात्मक काम झाले आहे. मात्र, पाकच्या या खुलाशावर एफएटीएफने नाराजी व्यक्त केली.

पाकला दिलेली १५ महिन्यांची मुदत संपली
जून २०१८ मध्ये एफएटीएफने पाकिस्तनला ग्रे लिस्टमध्ये टाकले होते. २७ मुद्द्यांच्या आधारे १५ महिन्यांत या मुद्द्यावर सकारात्मक काम करण्यास सांगण्यात आले होते. एफएटीएफच्या आशिया-प्रशांत विभागविषयक गटाने पाकचे याकामी अपयश मान्य केले होते. हाफिज सईदसह इतर दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात पाकला अपयश आल्याचा ठपका या वेळी ठेवण्यात आला होता.

सलग ग्रे लिस्टमध्ये...
एफएटीएफने पाकला सतत ग्रे लिस्टमध्ये ठेवले आहे. अशा देशांना कर्जपुरवठा ही मोठी जोखीम मानली जाते. आंतरराष्ट्रीय कर्जपुरवठादार संस्थांनीही पाकला द्यावयाच्या कर्जात कपात केली आहे. यामुळे पाकची आर्थिक स्थिती नाजूक आहे.

या देशांनी वाचवले...
एफएटीएफच्या बैठकीत पाकच्या बाजूने चीन, तुर्की आणि मलेशिया या देशांनी पाठबळ दिले. या तीन देशांच्या पाठिंब्यामुळेच पाक बचावला आणि ग्रे लिस्टमध्ये राहिला. अन्यथा मंगळवारीच तो ब्लॅक लिस्टमध्ये गेला असता.

काळ्या यादीत नाव निश्चित
एफएटीएफने हा निर्णय जाहीर केल्यामुळे एक प्रकारे फेब्रुवारीत पाकचे नाव काळ्या यादीत येणार यावर शिक्कामोर्तबच केले आहे. काळ्या यादीत नाव आले तर पाकची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था उद््ध्वस्त होईल.
 

बातम्या आणखी आहेत...