आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडाे गावांत वाघ-बिबट्यांची दहशत; ग्रामस्थ भयभीत, राेजगाराच्या शाेधात असलेल्या गावकऱ्यांचा वन क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यांना कारणीभूत

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
अावळगाव येथील खुशी ठाकरे हिच्या स्मरणार्थ बांधलेला चबुतरा. - Divya Marathi
अावळगाव येथील खुशी ठाकरे हिच्या स्मरणार्थ बांधलेला चबुतरा.

नागपूर : गेल्या वर्षीच्या घटना. आवळगावात शिरलेल्या बिबट्याने आठ वर्षे वयाची चिमुकली खुशी ठाकरे हिला उचलून नेले अन् तिच्या नरडीचा घोट घेतला. हे कुटुंब आजही या धक्क्यातून सावरलेलं नाही. शेताच्या कडेला तिच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याला भेट दिल्यावर कुटुंबाच्या भावना अनावर होतात.. अश्रूंचा बांध फुटायला लागतो... गडबोरी गावातील ३६ वर्षीय महानंदा तिचा अवघ्या नऊ महिन्याच्या तान्हुला स्वराजच्या आठवणीनं प्रचंड व्याकूळ होते.. मे महिन्यात रात्री झोपेत असताना झोपडीवजा घरात शिरलेल्या बिबट्याने तिच्या कुशीतून बाळाला उचलून नेलं. रात्रीच्या काळोखातही तिच्यातील आईने जिवाच्या आकांताने बिबट्याचा पाठलाग केला. तोवर बिबट्या बाळाला घेऊन पसार झाला होता.. दुसऱ्या दिवशी बाळाचा मृतदेह सापडला.. या घटनेचा जबरदस्त मानसिक धक्का महानंदाला बसला अाहे.

या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी याच गावातील गयाबाई हटकर या ६५ वर्षीय वृद्धेला बिबट्याने घरात घुसून फरपटत जंगलात नेले. गावातील कुणीच काही करू शकले नाही.. अशा कित्येक थरकाप उडवणाऱ्या घटनांपायी चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांवर वाघ, बिबटे व अस्वली अशा वन्यप्राण्यांच्या दहशतीचा अंमल आहे. अगदी दिवसा कुठल्याही क्षणी झुडपातून एखाद्या वाघ अथवा बिबट्या झडप घेईल... या भीतीनं शेतीवर संकट निर्माण केलंय. चांगले उत्पन्न देणाऱ्या हरभरा, तूर, मूग, उडीदसारख्या पिकांची जागा अाता जेमतेम मिळकतीच्या धानाच्या पिकानं घेतली आहे. परिस्थिती हलाखीची झालीय. सायंकाळ झाली की दहशतीने सारे गावे चिडीचूप होते. वाघ-बिबट्यांच्या डरकाळ्या सुरू होतात. घरातल्या गोठ्यातील जनावरे जिवाच्या आकांताने अस्वस्थ झालेली असतात..

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर वनवृत्त आणि त्यातही ब्रह्मपुरी वन विभागात मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील पराकोटीला पोहोचलेल्या संघर्षाचे हे भेसूर चित्र आहे. आगामी काळात हा संघर्ष विकोपाला जाणार, अशी भीती तज्ञ मंडळींना वाटते.

चार वर्षांत गेले ४० बळी; प्रत्येकी मिळते १५ लाखांपर्यंत मदत

गेल्या तीन ते चार वर्षांत एकट्या ब्रह्मपुरी वन विभागात वाघ, बिबट्या व अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किमान ४० जणांचे मृत्यू झाले अाहेत. जखमींचा आकडा तर तीनशे पार झाला आहे. यावर्षी १० गावकऱ्यांचे वाघ-बिबट्याने जीव घेतलेत. सुमारे १७ ते १८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारला द्यावी लागली आहे. यात पाळीव जनावरांचे बळी आणि शेतीपिकाच्या नुकसानीची भरपाईदेखील समाविष्ट आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला आता १५ लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळते. ती काटेकोरपणे दिलीही जाते. त्यातून कुटुंबाला थोडाफार आधार मिळतो. पण मूळ समस्या कायम राहते. राेज जीव मुठीत धरून जगावे लागत असल्यामुळे अाता गावकऱ्यांमध्ये असंताेष उफाळून अालेला दिसताे. मे महिन्यात तीन गावकऱ्यांचा बळी घेणाऱ्या ई-१ वाघिणीला वन विभागाने बेशुद्ध करून पकडले. तिचे स्थलांतर करण्यात आले. मात्र, अशा प्रयत्नांनाही कायदे आणि नियमांच्या मर्यादा आल्या आहेत.

गावकऱ्यांचा जंगलात हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेले हे वनक्षेत्र विस्कळीत स्वरूपाचे आहे. मध्यम दर्जाच्या वनांसह बरेचसे झुडपी वनांच्या क्षेत्रात तब्बल साडेचारशेवर लहान-मोठ्या गावांचा समावेश आहे. त्यापैकी किमान तीनशे गावे मागील दशकभराहून अधिक कालावधीपासून मानव- वन्यप्राणी संघर्षाने ग्रस्त अाहेत. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या दीडशेवर पोहोचली असून त्यापैकी ब्रह्मपुरी विभागात ही संख्या ५० ते ६० दरम्यान आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त बिबट्यांची संख्या. वन्यप्राण्यांचे अधिवास वाढले नसले तरी संवर्धनाच्या प्रभावी उपायांमुळे वाघ-बिबट्यांची वाढलेली संख्या, त्याच्यात अधिवासासाठी आपसात होणारा संघर्ष हे या संघर्षाचे मूळ आहे. वन्यप्राण्यांचा वावर आता बाहेर वाढू लागला आहे. गोसेखुर्द प्रकल्पांच्या कालव्यांसह रस्ता रुंदीकरणाच्या कामांमुळेही या भागातील अधिवासांचे नुकसान झाले आहे. वनाशेजारील गावांचा वनक्षेत्रातील हस्तक्षेपही या हल्ल्यांना कारणीभूत ठरतो आहे, असे तज्ञांना वाटते. रोजगार उपलब्ध नसल्याने बरेचसे गावकरी जंगलावर अवलंबून आहेत. त्यातून हस्तक्षेप वाढतो आणि संघर्षाच्या घटना वाढतात.

अाणखी एका महिलेचा बळी

शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील मिंडाळा (ता. नागभीड) गावात घडली. सुलोचना चौधरी (वय ५५) असे मृत महिलेचे नाव होते. या घटनेनंतर गावात अाणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले. या महिलेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकांच्या संयमाची किती परीक्षा घ्यायची : अॅड. गाेस्वामी

पर्यावरणाच्या दृष्टीने जंगल, वाघ व इतर वन्यप्राण्यांची साखळी आवश्यक आहेच. त्यावर दुमत नसले तरी त्याच वेळी येथील माणसांनी जगायचं कसं?.. पर्यावरण राखण्यासाठी फार मोठी किंमत चुकवणाऱ्या या ग्रामीण जनतेला आम्ही कुठला दिलासा देतो आहोत?.. शेती उद्ध्वस्त झाली असताना आणि रोजगाराच्या साधनांवर मर्यादा आल्या असताना आम्ही त्यांना काही पर्याय उपलब्ध करतो आहोत?...यापैकी एकही प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने मिळत नाही. लोकांना कुठलाही इतर रोजगार नाही. त्यादृष्टीने विचार करून उपाय करण्याची मानसिकता प्रशासन व सरकारमध्ये नाही. मात्र, लोकांच्या संयमाची किती परीक्षा घ्यायची, याचा विचार येत्या काळात करावाच लागणार आहे..' असे सामाजिक कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी ठामपणे सांगतात.

तज्ञ म्हणतात : परिस्थिती खूप गंभीर, स्थलांतराचा विचार

  • राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे सांगतात, 'मानव-वन्यप्राणी संघर्ष जेवढा ब्रह्मपुरी वन विभागात बघायला मिळतो तेवढा महाराष्ट्रात सोडाच, पण देशात कुठेही नाही. ब्रह्मपुरी वन विभागातील आव्हान पेलणारे उपवनसंरक्षक कुलराजसिंह सांगतात, 'चंद्रपूरच्या वन विभागात राेजच ही आव्हाने असतात. रोज वेगवेगळी संकटे निर्माण होतात. संघर्षाची पातळी कितीतरी जास्त आहे.. त्यावर उपाय शोधण्याचे आमचे प्रयत्न असतात.'

  • प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांच्या मते, 'या भागात परिस्थिती खूप गंभीर आहे. असा संघर्ष इतरत्र कुठेही दिसत नाही. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी वन विभागही तेवढाच गंभीर आहे. या समस्येवर वन विभाग आणि वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून अभ्यास सुरू आहे. काही दीर्घकालीन योजना राबवाव्या लागतील. वाघ-बिबट्यांचे या भागातून काही प्रमाणात स्थलांतरण करता येईल काय? या योजनेवरही आम्ही विचार करीत आहोत.'

ग्रामस्थ म्हणतात : सायंकाळी सातच्या अात घरात परतणेच याेग्य

वाघ रस्त्यावर फिरतात त्यामुळे अामचे मार्ग मात्र बंद हाेतात...!

'आमच्या शिवनी-वासेरा गावच्या मार्गावर चार-पाच वाघ फिरत असतात. त्यामुळे मार्ग बंद होतात. कधी वन विभागाची जीप मग अडकलेल्या गावकऱ्यांना सोडायला येते. गावातील मुले सुरक्षित नाहीत. वाघ असला तरी शाळांचे मार्गही बंद होतात..' असे शिवनीचे राजेश्वर बोरकर सांगतात. दोन महिन्यांपूर्वी शिवनी येथील तुळशीराम पाकेवार (५५) हे गुरे चरायला गेले असता वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. 'माझ्या मुलाला रोजमजुरीवर नोकरी देण्याचे आश्वासन वन विभागाच्या लोकांनी दिले होते. आजही काहीच झाले नाही,' अशी त्यांची विधवा पत्नी शोभा पाकेवार यांची तक्रार आहे.

बस थांब्यावरही फिरताे वाघ 

'गावच्या बस थांब्यावरसुद्धा काल-परवा वाघ दिसला होता. पूर्वी रात्री दहा वाजतादेखील मी गावात िफरायचो. आता ते दिवस राहिलेले नाहीत,' असे हरदा गावातील सचिन नागदेवते सांगतात. 'वाघ हा सरकारी प्राणी आहे. वाघाविरुद्ध बोलताही येत नाही. जंगली डुकरे तर वन विभागाची 'दत्तकपुत्र'च आहेत. आमच्या नुकसानीचं सोयरसुतक वन विभागाला नाही,' अशी संतप्त प्रतिक्रिया हरदा या गावातील लाेकांमधून व्यक्त हाेत अाहेत.

वाघबळींचे स्मृती चबुतरे

एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा वाघ-बिबट्याने बळी घेतल्यावर गावकऱ्यांनी अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ चबुतरे उभारल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळते. या चबुतऱ्यावर मृत व्यक्तीचे नाव, तारखेसह बसवलेली वाघाची छाेटी मूर्ती या घटनांची साक्ष देतात.

मुलांना गावाबाहेर एसटीपर्यंत नेऊन साेडावे लागते..!

केवळ १७५ लोकसंख्येच्या धानोरा गावाच्या आसपास रोजच वाघांच्या डरकाळ्या ऐकायला मिळतात. त्यामुळे सायंकाळी सातनंतर लोक घरातच थांबणे पसंत करतात, असा अनुभव गावकरी सांगतात. 'पूर्वी आम्ही रात्री-बेरात्रीदेखील सिंदेवाहीला तालुक्याला जायचो. आज ती परिस्थिती नाही. गावात एसटी येत नाही. शाळकरी मुलांना गावाबाहेर थांबणाऱ्या एसटीपर्यंत सोडण्याची काळजी घ्यावी लागते,' असे पोलिस पाटील अरुण नागदेवे यांनी सांगितले.

माणसांचं महत्त्वच राहिलेलं नाही

'शेतीला जंगली डुकरांचा खूपच त्रास आहे. त्यांच्या मागे वाघ-बिबटे गावात येतात. पूर्वी आम्ही हरभरा, हळद, गहू, तुरीसारखी पिके घ्यायचो. आता त्याचा विचारही करू शकत नाही. आमची शेती पार उद‌्ध्वस्त झालीय. पूर्वी वाघ कमी होते, आता खूप वाढले. आता माणसाचे महत्त्व नाही, वाघांचे महत्त्व वाढले आहे.' - मुरलीधर चिचमलकर (६८), रा. गडबोरी (गावकरी)

दीर्घकालीन उपाय करावेच लागतील

'मानव-वन्यप्राणी संघर्षाचं स्वरूप इतरही असलं तरी यापेक्षा गंभीर कुठेही नाही. त्यावरील उपाय अत्यंत कठीण असले तरी अशक्य नाहीच. वन्यप्राण्यांचा कॉरिडॉर म्हणून व्यवस्थापन करावे लागले. काही गावे एकत्र वसविता येतील काय, अशा दीर्घकालीन उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. त्यासाठी अतिशय कमिटेड प्रयत्न करावे लागतील.' - किशोर रिठे, सदस्य, वन्यजीव मंडळ