Thackeray Movie Review: / Thackeray Movie Review: साक्षात बाळासाहेब ठाकरे असल्याची जाणीव करुन देतो ‘नवाजुद्दीन’, दमदार अभिनयाने जिंकली सर्वांची मने

Jan 25,2019 04:03:00 PM IST
स्टार रेटिंग 3 स्टार
कलावंत नावाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव, सुधीर मिश्रा
दिग्दर्शन अभिजित पानसे
निर्मिती संजय राऊत
श्रेणी वास्तव पट
संगीत रोहन-रोहन, पार्श्वसंगीत-अमर मोहिले

कमजोर पटकथेवरही गारुड करणारा ‘नवाजुद्दीन’

पिंपळाच्या झाडाखालून कॅमेरा हळुहळू वर जातो. लखनौचे विमानतळ दिसू लागते. कडेकोट बंदोबस्त आणि लोकांची गर्दी याठिकाणी जमलेली असते. तिथे सुरु असलेल्या चर्चेवरुन हे स्पष्ट होते की, बाळासाहेब ठाकरेंना बाबरी मश्जिद प्रकरणी लखनौ कोर्टात सादर होण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेली आहे. कुणी त्यांच्या बाजूने तर कुणी विरुद्ध बोलणाऱ्यांच्या चर्चा रंगतात. अन विमानतळा बाहेर पडणारी एका पाठमोरी आकृती मागे कॅमेरा कोर्टापर्यंत चालत राहतो. १५ मिनीटांच्या वेगवेगळ्या हालचालींनंतर कोर्टात दिसतो तो रुद्राक्षमाळ असलेला हात. अशी आहे, आज प्रदर्शित झालेल्या ठाकरे चित्रपटाची सुरुवात.

उत्कंठा ताणुन ठेवणारी सुरुवात असली तरीही चित्रपटात फार ताकद नाही, हे हळूहळू जाणवते. पटकथा कमजोर असल्याने प्रेक्षक चित्रपटाशी बांधून राहत नाही. तमाम मराठी हृदयावर राज्य करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ चित्रपट म्हणून प्रेक्षकांची निराशा करणारा असला तरीही नवाजुद्दीनच्या रुपात बाळासाहेब ठाकरे मात्र गारुड करुन जातात. कमजोर आणि पकड नसलेली पटकथा, खिळवून ठेवण्यात अपयशी दिग्दर्शन असल्याने चित्रपट प्रेक्षकांना पचणारा नाही.

चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम म्हटले जाते. विशेषत: जेव्हा चित्रपटाचे पटकथालेखन आणि दिग्दर्शन एकाच व्यक्तीने केले असते, तेव्हा अपेक्षा आणखीच वाढतात. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची जरब दिल्लीपर्यंत होती. मराठी माणसासाठी बाळासाहेबांचे असलेले भव्यपण चित्रपटात दिसत नाही. चित्रपट म्हणजे उत्तम कथाकथनातुन त्या व्यक्तीचा अंतरंग सर्वांपुढे खुला करुन सांगणे आहे. या चित्रपटात कथानक, पटकथेवर खूप काम होणे गरजेचे होते. बाळासाहेबांची प्रतिमा महाराष्ट्रीयन माणसासाठी लार्जर दॅन लाईफ आहे,तिचे भव्यपण यात दिसत नाही. महाराष्ट्राचा वाघ म्हणून त्यांना देशभरात लोक ओळखायचे, त्यांची दहशतही तशीच होती. पण, चित्रपटात ती दाखवण्यात अपयश आल्याचे जाणवते. अशा सर्व उणीवा चित्रपटात असल्या, तरीही नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब हुबेहुब साकारले आहेत. एक क्षणभरही तो नवाजुद्दीन वाटत नाही. साक्षात बाळासाहेब असल्याचा विश्वास प्रेक्षकांत निर्माण होतो. एवढेच नाही तर चित्रपटातील इतर व्यक्तीरेखाही वास्तवाशी अचूक साधर्म्य साधणाऱ्या आहेत.

बाळासाहेबांचा हा बायोपिक चित्रपटापेक्षा माहितीपट असल्याचे जाणवते. प्रेक्षागृहाबाहेर येणाऱ्या प्रेक्षकाला त्यांच्या जीवनातील घटनांना स्पर्श करणारा हा धावता आढावा असल्याचीच जाणीव होईल. फ्री प्रेस जर्नल पासून बाळासाहेबांचा राजकारणापर्यंतचा प्रवास यात अधोरेखित केला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दिग्दर्शकाने हे स्पष्ट केले आहे, की त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनाच यामध्ये घेण्यात आल्या आहेत. बाळासाहेबांना तीन तासांत बसवणे खरे तर अवघडच काम आहे, यात दुमत नाही. पण, चित्रपटातील घटनाक्रम अतिशय विस्कळीत वाटतात. औरंगाबादचा विचार करता, शिवसेनाच्या जडणघडणीत या शहराचा सिंहाचा आहे. पण, औरंगाबाद शहर, येथील सभा किंवा याठिकाणच्या नेत्यांचा नामोल्लेखही चित्रपटात नाही. चित्रपटाचे संकलनही फारसे चांगले झालेले नाही. चित्रपट अर्धवट संपतो अशीच भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते.

बाळासाहेंबाचा चित्रपट म्हणजे संवादाला विशेष महत्त्व आहे. कारण, प्रत्यक्ष जीवनातही बाळासाहेबांचे बोलणे अवघ्या महाराष्ट्राला खिळवून ठेवणारे होते. थेट आणि धारदार बोलणे हेच त्यांचे बलस्थान होते. ते चित्रपटात काहीसे बोथट वाटते. पण, अनेक उणीवा असल्या तरीही चित्रपटात जुने घर, त्यातील वस्तू आणि कृष्णधवलपासून रंगीत झालेला चित्रपट हा प्रयोग लक्षणीय आहे. बाबरी खटल्यात न्यायाधीशाने ठोठावलेला दंडक आणि त्याच क्षणी बाबरीवरील हल्यात घण वापरला जातो, असे प्रसंग दिग्दर्शकाने कल्पकतेने केल्याचेही दिसते.


कथा : (३/५)

फ्री प्रेस र्जनलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करणारे बाळासाहेब मराठी माणसांच्या हक्काच्या मुंबईत होणारी गळचेपी पाहून अस्वस्थ होतात. व्यंगचिंत्रांतून राजकारण्यांवर सडकून टिका करतात. पण, स्वत:वर नियंत्रण ठेवून काम करा, अशा सूचना येतात तेव्हा ते नोकरीला लाथ मारुन मार्मिक काढतात. मग, शिवसेनेची स्थापना करतात. बेळगाव आंदोलन, भिवंडी दंगल,आ. कृष्णा देसाई खून असे सर्व धावते प्रसंग दिसतात. शिवसेनेवरील बंदी टाळण्यासाठी इंदिरा गांधींची भेट घेत आणीबाणीला पाठींबा देण्याची तडजोड सर्वच यामध्ये दिसतात.

दिग्दर्शन : (३/५)

अभिजीत पानसे यांनी चित्रपटातील मुख्य कलावंताची निवड तर अचूक केलीच पण सहकलावंतांच्या निवडीही जाणीवपुर्वक अचूक केल्या आहेत. मीनाताई ठाकरेंच्या भुमिकेतील अमृता राव मात्र कमकुवत वाटते. मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, वसंतराव नाईक सर्वांच्याच पात्रांची निवड छान झाली. कृष्णधवल ते रंगीत चित्रपट ही संकल्पना छान जमली आहे. त्यामुळे बाळासाहेबांसोबत असल्याची भावना प्रेक्षकांत निर्माण करण्यात यश आले आहे. दिग्दर्शन आणखी प्रभावी व्हायला हवे होते.

अभिनय : (३.५/५)

नवाजुद्दीनचा नैसर्गिक अभिनय इतक्या काही ताकदीचा आहे, की तो कोणत्याही भुमिकेत इतरांना खाऊन जातो. त्यात तो बाळासाहेब असताना खाऊन न गेला तर नवलच. बायोपिकमध्ये काम करताना वास्तव्य व्यक्तीवर गारुड करणे हेच नटाचे कौशल्य असते. ते त्याने अचूक साधले आहे. यापुढे बाळासाहेब म्हणले तर नवाजुद्दीनच डोळ्यापुढे येईल हे कौशल्य त्याने अभिनयातून साधले आहे. इतर कलावंतांच्या भूमिकाही चांगल्याच झाल्या. विशेषत: वसंतराव नाईक, मोरारजी देसाई, शरद पवार, छगन भुजबळ, अनंत दिघे यांची पात्र उत्तम सजली.

संगीत : (२/५)

चित्रपटात गाण्यांना तसा फारसा वाव नव्हताच. पण, पार्श्वसंगीताने यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली यात शंका नाही.


X