आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांत तक्रार करणाऱ्या ग्राहकाची दाढी, कटिंग नाहीच; केवळ प्रसिद्धीसाठी ठाकूर यांचा खटाटाेप असल्याचा आराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - सलूनचालकाने न विचारताच मिशा भादरल्याचे नागपूर जिल्ह्यातील प्रकरण शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट हे प्रकरण चिघळते आहे. या प्रकरणात ग्राहकाच्या तक्रारीवरून सलूनचालकावर गुन्हा दाखल झाल्याने संतापलेल्या नाभिक संघटनेने या वादात उडी घेत तक्रारकर्ता ग्राहक किरण ठाकूर याच्यावर बहिष्कार घालण्याचा, त्याच्या दाढी-मिशा न भादरण्याचा निर्णय जाहीर घेतला आहे. 

 

नागपूर ग्रामीणमध्ये कन्हान येथे मागील आठवड्यात ही घटना घडली होती. दाढी करण्यासाठी कन्हान येथील फ्रेंड्स जेन्ट्स पार्लरमध्ये पोहोचलेल्या शहर युवा दणका  संघटनेचे अध्यक्ष किरण ठाकूर यांची मिशीही भादरण्यात आल्याचा प्रकार घडला. न विचारता हा प्रकार केल्यामुळे संतापलेल्या किरण आणि पार्लरचा मालक सुनील लक्षणे यांच्यात मोठा वाद झाला हाेता. सलूनचालकाने धमकी दिल्याचे सांगत किरण यांनी त्यांच्याविराेधात थेट पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. न विचारता मिशी कापल्यामुळे आपल्याला काेणी आेळखायला तयार नसून माझ्या प्रतिमेलाही धक्का लागला आहे, असा दावा तक्रारकर्ता ठाकूर याने पाेलिसांकडे केला हाेता. 

या तक्रारीवरून पोलिसांनी लक्षणे यांच्याविरुद्ध भादंविच्या ५०७ कलमान्वये धमकी दिल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यावर हे प्रकरण शमणार असे वाटत असतानाच स्थानिक नाभिक संघटना नाभिक एकता मंचाने या वादात उडी घेतली. या संघटनेने किरण ठाकूर यांच्यावर बहिष्कार घालून त्यांना कुठलीही सेवा न देण्याची घोषणा केली आहे. पार्लरचे संचालक लक्षणे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा व तथ्यहीन असून मिशी भादरण्यापूर्वी त्यांनी किरण ठाकूर यांना विचारणाही केली होती, असा संघटनेचे अध्यक्ष शरद वटकर यांचा दावा आहे. मिशी भादरण्यात आल्यावर ठाकूर घरी गेले होते. त्यानंतर पुन्हा पार्लरमध्ये येऊन ठाकूर यांनी गोंधळ घातला. केवळ प्रसिद्धीसाठी हा प्रकार सुरू असल्याचा दावाही वटकर यांनी केला. 

 

आज कन्हान गावात नाभिक संघटना निदर्शने करणार
यासंदर्भात पोलिसांकडे आम्हीही तक्रार केली आहे. नाभिक संघटनेच्या सर्व तालुका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच ठाकूर यांच्यावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे, असे नाभिक संघटना नाभिक एकता मंचाचे अध्यक्ष किरण वटकर म्हणाले. आता प्रकरण एवढ्यावर मर्यादित राहिलेले नाही. नाभिक एकता मंचाच्या वतीने सोमवारी कन्हान गावात येथे निदर्शने केली जाणार आहेत. त्यामुळे मिशी भादरल्याचे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या प्रकरणाने पोलिसांचीही चिंता वाढवली आहे. दरम्यान, या विषयावर आता मला काहीच बाेलायचे नाही, अशी भूमिका ठाकूर यांनी घेतली आहे.