आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ वाघिणीला मारण्याच्या आदेशावर केले शिक्कामोर्तब; वन विभागाची भूमिका ठरवली योग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा वन क्षेत्रातील ‘टी-१’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला शेवटचा उपाय म्हणून गोळ्या घालून ठार मारण्याच्या वन विभाग प्रमुखांच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारे अपिलही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले असल्याने धोकादायक वाघिणीला ठार मारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


‘उपद्रवी वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे शक्य न झाल्यास गोळ्या घालून ठार मारण्यात यावे’, असा आदेश वन विभागाचे प्रमुख प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. वाघिणीला ठार मारण्याचा आदेश रद्द करण्यात यावा अथवा त्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका नागपुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने वन विभागाची भूमिका योग्य ठरवत आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. 


मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने देखील वन विभागाची भूमिका योग्य ठरवत याचिका फेटाळून लावली. वाघिणीला शक्यतोवर पकडण्याचे प्रयत्न व्हावेत. ते शक्य न झाल्यास अखेरचा पर्याय म्हणून तिला ठार मारण्याचा पर्याय निवडण्यात यावा, असे न्या. मदन लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या पीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. वाघिणीने आजवर बारा जणांचे बळी घेतल्याचा मुद्दा वन विभागाच्या वतीने प्रकर्षाने मांडला गेला. वन क्षेत्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे तिला जिवंत पकडण्यात अडचणी येत असल्याचेही वन विभागाने नमूद केले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वन विभागात पुन्हा एकदा वाघिणीचा शोध घेण्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वाघिणीला  शक्यतोवर  डार्ट च्या माध्यमातून बेशुद्ध करण्याचे प्रयत्नच सुरुवातीला केले जातील, असा दावाही वन विभागाकडून करण्यात येत आहे. ते शक्य न झाल्यास शेवटचा उपाय म्हणून तज्ज्ञ शूटरची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी हैदराबाद येथील नवाब शफतअली खान या तज्ज्ञ शूटरची मदत घेतली जाणार आहे. 


या शूटरला यवतमाळमध्ये बोलावण्यात आले आहे.  मात्र, सध्या वाघिणीचे नेमके वास्तव्य शोधण्यात अडचणी येत आहे. राळेगाव आणि कळंब तालुक्यात वन विभागाच्या पथकांकडून वाघिणीचा शोध सुरु आहे. त्यासाठी परिसरातील गावकऱ्यांची मदत घेतली जात आहे. पेंच, नवेगाव-नागझिरा, ब्रह्मपुरी तसेच अमरावती येथूनही वन विभागाचे गस्ती जवान वाघिणीच्या शोधकार्यात लावण्यात आले असल्याचे  सांगण्यात आले. हल्लेखोर वाघिणीने आतापर्यंत बारा जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. तिला पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरत असताना मनुष्यबळींच्या घटनांमुळे वन विभागावर जनक्षोभाचा दबाव वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.   

बातम्या आणखी आहेत...