आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Accident Was So Severe That The Hand Of The Passenger Fell From His Shoulder; 3 Killed, 15 Wounded In Kej Maharashtra

अपघात इतका भीषण की प्रवाशाचा हात खांद्यापासून निखळला; 3 ठार, 15 जखमी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
कोंबड्यांची वाहतूक करणारे वाहन बसवर धडकल्यानंतर पिंजऱ्याच्या अँगलमुळे बस अशी चिरली गेली. - Divya Marathi
कोंबड्यांची वाहतूक करणारे वाहन बसवर धडकल्यानंतर पिंजऱ्याच्या अँगलमुळे बस अशी चिरली गेली.

केज : केज-अंबाजाेगाई मार्गावर मंगळवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कोंबड्यांची वाहतूक करणारे पिकअप वाहन यांच्यात झालेल्या अपघातात या अपघातात विजयालक्ष्मी देशमुख ( वय ६०, रा. बालाजी मंदिराजवळ, मुखेड जि. नांदेड ) व अनिल कौलकर ( वय ५०, रा. मुरूम ता. उमरगा जि. उस्मानाबाद ) यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. कोंबड्यांच्या पिंजऱ्याचे अँगल बसमधील प्रवाशांना चिरत गेल्याने अपघाताची तीव्रता वाढली. या अपघातात एका प्रवाशाचा हात खांद्यातून निखळला.

केजहून मुखेडकडे निघालेली बस आणि पिकअपचा मंगळवारी दुपारी १.१५ वाजता चंदनसावरगाव गावापासून दीड किमी अंतरावरील पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. पिकअप वाहन बसवर चालकाच्या बाजूने आदळले. कोंबड्यांच्या पिंजऱ्याचा अँगल बसमध्ये घुसल्याने बसमधील एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू होऊन १५ प्रवासी जखमी झाले. बस चालक माधव कुंभार (वय ४५, रा. जांब बु. ता.मुखेड) व वाहक देवानंद शिंदे (वय ४५, रा. गुंटर ता. कंधार) हे दोघेही सुखरूप आहेत.

चालकाच्या साइडचे १५ प्रवाशी गंभीर जखमी : सदरील बसमधील साइडला बसलेले १३ प्रवासी गंभीर जखमी झाले. नागरिकांनी बसमधील जखमींना बाहेर काढून दुसऱ्या बसमधून अंबाजोगाईला हलवले. या अपघातात बालाजी मारोती घोडगे ( वय ५०, रा. जांब ता.मुखेड ) यांचा उजवा हात निखळून पडला. दत्ता रघुनाथ मोरे ( वय ३५, रा. लातूर ), विकास दास ( वय ४० रा. कोलकाता), डॉ. विष्णुपंत गायकवाड ( ३०, रा. हाळी हरंगूळ), डॉ. संतोष ज्ञानोबा गुणाले ( ३०, रा. उदगीर), शीतल सुनील मायकर (२५), अशोक बबन जाधव ( रा. ४०, खडकवडे ), अलफिया अझर सिद्दीकी ( २१, रा. अंबाजोगाई ), शिवनाथ गायकवाड ( वय ३५, रा. गेवराई ), मीना अशोक जाधव ( ४०, रा. पाटोदा ), सरुबाई राजगीरवाड ( ६०, चेरा ता. जळकोट, जि. लातूर ), देवानंद दत्तात्रय शिंदे ( वाहक )( ४५, रा. गुंटूर, नांदेड ) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जेसीबीच्या मदतीने मृतदेह काढले

अपघाताची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि आनंद झोटे, जमादार भागवत कांदे, बालासाहेब ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमध्ये अडकलेले मृतदेह जेसीबीच्या मदतीने काढून उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाईला पाठवले. तसेच बसमध्ये तुटलेला घोडगे यांचा हात घेऊन रुग्णालय गाठले.

स्वारातीच्या सर्व विभाग प्रमुखांनी यंत्रणा सज्ज ठेवली

सदरील अपघातातील जखमी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ.राकेश जाधव, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ.सतीश गिरे भोईनवाड, डॉ. दीपक लामतुरे, डॉ. हर्षल एरकाडे, डॉ. राजेश कचरे या विभाग प्रमुखांनी आपली यंत्रणा सतर्क केली होती.

मुंदडा यांची तत्परता

बसच्या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष दिलीप सांगळे, बळीराम चोपने, रवी गरुड यांनी स्वाराती रुग्णालय गाठून जखमी अंबाजोगाईत येईपर्यंत सर्व आरोग्य सुविधेसह डॉक्टरांचा ताफा तयार ठेवला.

तहसीलदार मदतीला

केजचे तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मारुती मुंडे , सपोनि संतोष मिसळे, फौजदार श्रीराम काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

विजयालक्ष्मी यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन

अपघातात मृत झालेल्या मुखेड येथील विजयालक्ष्मी देशमुख यांच्या पतीचे मागील काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या घरी एकट्याच राहत असल्याने त्यांना दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या भावाने १५ दिवसांपूर्वी औरंगाबादला नेले होते. मंगळवारी सकाळी विजयालक्ष्मी यांना मावस बहिणीसोबत मुखेड गाडीत बसवून दिले होते. विजयालक्ष्मी ह्या खिडकीकडून तर त्यांची मावस बहीण या शेजारी बसल्या होत्या.