आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Accused Slept In A Blood soaked Cloth After Murder, Police Raided At The Place In The Morning At 3 AM In Hingoli

आरोपी खून करून रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी झोपला, बासंबा पोलिसांचे पहाटे तीन वाजता छापासत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील पारडा येथे भानामती करण्याच्या कारणावरून एकाचा तिघांनी खून केला. एका अाराेपीस ताे पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पकडले तर दुसरा चक्क रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी घरी झोपला होता. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. तर तिसरा अाराेपी पसार हाेण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी शुक्रवारी (ता.१३) बासंबा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शंकर साधू अलझेंडे (वय ५५) हे मागील काही दिवसांपासून घरी एकटेच होते. त्यांचे कुटुंबीय कामाच्या शोधात बाहेरगावी गेले आहे. गुरुवारी (ता.१२) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावातील नागनाथ किरण गोविंदपुरे, संतोष तोडकर व अन्य एकाने अलझेंडे यांना घरातून बाहेर बोलावून त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. लोखंडी रॉडने डोक्यात वार केले तर त्यांच्या छातीवर, पोटावर लाथा मारल्या. त्यामुळे त्यांच्या किडनीला दुखापत होऊन पोटातच रक्तस्त्राव झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती बासंबा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. अलझेंडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पहाटे तीन वाजता पोलिसांचे पथक पुन्हा पारडा गावात गेले. या वेळी पोलिसांनी नागनाथ गोविंदपुरे याच्या घरातून त्यास ताब्यात घेतले. तो बॅग भरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होता. तर संतोष तोडकर हा रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी घरात झोपला होता त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर बाळू उर्फ सिद्धेश्वर तोडकर हा मात्र फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात संतोष अलझेंडे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पत्नीवर भानामती केल्याचा संशय

या प्रकरणातील नागनाथ गोविंदपुरे याच्या पत्नीची प्रकृती मागील काही दिवसांपासून खराब होती. औषधोपचार करूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या शंकर अलझेंडे याने भानामती केली असावी असा त्याला संशय होता. त्यामुळे तिघांनी मारहाण करून त्यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.