आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मद्याच्या व्यसनापायी मुलाने घरातील 11 तोळे सोन्यावरच मारला डल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बारावीत शिक्षण घेत असतानाच कुसंगत लागल्यामुळे दारू-सिगारेटचे व्यसन लागले.  व्यसनापायी मित्रांची २५ हजार रुपयांची उधारी झाली. या मित्रांनी वसुलीसाठी त्यांनी तगादा लावल्याने हैराण झालेल्या  मुलाने मग  स्वत:च्याच घरातील ११ तोळे सोन्याचे दागिने पळवले आणि घरफोडीचा बनाव   केला.  परंतु   चोरी करताना घराचे चॅनेल गेट, कपाट बनावट किल्लीचा वापर झाल्याचे आढळून येताच पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी मुलांवर निगराणी ठेवली. मुलास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एका मैदानातील पाइपमध्ये लपवून ठेवलेले सोने काढून दिले. या मुलास सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवला. बुधवारी   ही कारवाई करण्यात आली.   


साईनगर, एन-६, सिडको  येथे एक मध्यमवर्गीय कुटुंब राहते.  सहा  नोव्हेंबर रोजी जवळच्या नातेवाइकाचे निधन झाल्यामुळे ते सर्व जण अंत्यविधीला गेले. तिकडे बराच वेळ लागल्यामुळे दोन्ही मुले दुपारनंतर घरी आली. हीच संधी साधून बारावीला शिक्षण घेणाऱ्या थोरल्या  मुलाने हातोडीने कपाटाचे लॉक तोडले आणि ११ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे, त्यानंतर त्यानेच आई-वडिलांना फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली. दरम्यान, चोरीची माहिती सिडको पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी करत गुन्हा नोंद करून घेत तपासाची चक्रे फिरवली. अल्पवयीन मुलाने नेहमीप्रमाणे किल्लीने चॅनल गेट, दरवाजाचे कुलूप उघडले. त्यानंतर किल्ली असूनही हातोडीने कपाटाचे कुलूप तोडले आणि 

पुन्हा कपाटाच्या किल्लीने आतील कप्पे उघडून चोरी केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

 

त्यामुळे चोर हा घरातलाच व्यक्ती असायला हवा, असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवली आणि चोर सापडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत पाचोळे, पूनम पाटील, नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, स्वप्निल रत्नपारखी, किशोर गाढे, विशेष पोलिस अधिकारी विजय तुपे, साळोबा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

  
अखेर दिली चोरीची कबुली  
मुलाने व्यसन करण्यासाठी अनेक मित्रांकडून जवळपास २५  हजार रुपये उसने  घेतले होते. त्या मित्रांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. तसेच चोरी झाल्यानंतर पोलिस संशयाने पाहत असल्यामुळे तो तीन दिवस गावीही गेला. तो चौकशीसाठी यायलाही टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आले.त्यामुळे पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने साई मैदानाच्या भिंतीला लागून असलेल्या सिमेंट पाइपमध्ये ठेवलेले ११  तोळे दागिने काढून देत चोरीची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.

 

बनावट किल्ल्यांमुळे  आला पोलिसांना संशय   
चोरट्याला सर्वच लॉकच्या बनावट किल्ल्या कशा उपलब्ध झाल्या? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी घरातील दोन्ही मुलांवर पाळत ठेवली. ज्यांच्या घरी चोरी झाली होती त्यांचा मोठा मुलगा ग्रामीण भागात  बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेतो. तो बाहेर काय करतो? त्याचे मित्र कोण? याविषयी आई-वडिलांना फारशी माहिती नव्हती. पोलिसांनी माहिती काढल्यावर तो तरुण दारू आणि सिगारेटच्या प्रचंड आहारी गेल्याचे समजले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. 

बातम्या आणखी आहेत...