आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - सर्वच व्यावसायिक शाखांच्या प्रवेशासाठी ७ जून रोजी सुरू करण्यात आलेले सार पोर्टल अवघ्या २० दिवसांत बंद पडले. त्यानंतर सीईटी सेलद्वारे प्रवेशप्रक्रियेला पुन्हा नव्याने सुरुवात झाली. सीईटी सेलमध्येही कधी सर्व्हर डाउनचा फटका तर वारंवार नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. व्यावसायिकच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा अभूतपूर्व गोंधळ झाला असताना दुसरीकडे एमबीएच्या प्रवेशप्रक्रियेला थेट न्यायालयातच आव्हान दिले गेले. राज्यभरातील ३४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असून दोन महिने उलटूनही प्रवेशाला अद्याप सुरुवात झालेली नाही. जुलैअखेरपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना यंदा आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रवेशप्रक्रिया होत असल्याने सुमारे दोन ते तीन महिने उशिरा नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांच्या प्रवेशसंख्येवर होणार असून संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकच कोलमडले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना
अत्यंत कमी वेळ मिळेल. त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणार आहे.
गाडी लेट धावणार तब्बल दाेन महिने
> परीक्षा : प्रवेशप्रक्रियेला एक ते दोन महिन्यांचा विलंब झाल्याने परीक्षांच्या वेळापत्रकावर हाेणार परिणाम
२० दिवसांत पाेर्टल बंद
> अभ्यासक्रम : दोन सेमिस्टर पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळेल. त्यामुळे अभ्यासक्रमही शिकवणे होणार नाही
३४ हजार एमबीएचे विद्यार्थी प्रतीक्षेत
> संधी : बऱ्याच कॉलेजांत इंटर्नशिप सुरू झाली असून उशिरा प्रवेश घेणाऱ्यांना संधी मिळणार नाही
२८ ऑगस्टला न्यायालयाचा निर्णय
न्यायालयीन प्रक्रियेत अडकले यंदाचे एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश
जुलै महिन्यात एमबीएची प्रवेशप्रक्रिया होणे अपेक्षित असताना आॅगस्ट महिन्यातही प्रवेशप्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जरी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली तरी ती पूर्ण होण्याला किमान एक महिना लागेल. त्यामुळे यंदा तब्बल दोन महिने प्रवेशप्रक्रिया रखडली असून, त्याचा परिणाम अभ्यासक्रम व परीक्षांवर होणार आहे. यापूर्वी पहिल्या कॅप राउंडची प्रक्रिया रद्द ठरविल्यानंतर व दोन वेळा कॅप राउंडची तारीख जाहीर केल्यानंतरही ऐनवेळी ही प्रक्रियाच रद्द करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने यंदा एमबीएच्या प्रवेशप्रक्रियेला दोन महिने विलंब झाला आहे. दरम्यान, दि. १४ ऑगस्ट रोजी पहिल्या कॅप राउंडची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता होती. परंतु, प्रवेशप्रक्रियेविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने आता प्रवेशप्रक्रिया पुन्हा रखडली आहे. येत्या २८ आॅगस्टला न्यायालयाचा निर्णय होणार असल्याने राज्यभरातील विद्यार्थी व पालकांसह शिक्षण संस्थांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. या सर्व प्रक्रियेचा थेट फटका एमबीएच्या प्रवेशप्रक्रियेवर होणार असून यंदा प्रवेशाची संख्याही घटण्याची शक्यता आहे.
राज्यात पॉलिटेक्निकच्या ४० ते ५० टक्के जागा राहणार रिक्त
दहावीनंतर पाॅलिटेक्निकच्या प्रवेशाकडे यंदा विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असून, तब्बल ४० ते ५० टक्के जागा रिक्त राहणार आहेत. केवळ नाशिक विभागात २४ हजार जागांपैकी केवळ ११ ते १२ हजार जागांवरच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे. कोल्हापूर, सांगली, कोकण यांसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा फटका सर्वच व्यावसायिक शाखांच्या प्रवेशप्रक्रियेला बसला. अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अडचणी आल्या. त्यामुळे दहावी व बारावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही २६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावी-बारावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम अशा तीनही पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. जे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकलेले नाही, त्यांना या संधीचा फायदा घेता येईल.
इंजिनिअरिंग, फार्मसी प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित
५२ प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रमांतील महत्त्वाचे शिक्षणक्रम असलेल्या इंजिनिअरिंग, फार्मसी या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशालाही सार पोर्टलचा मोठा फटका बसला. प्रवेशाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर सीईटी सेलतर्फे प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. सर्व्हर डाउनचा फटका या प्रक्रियेत बसला. तसेेच वारंवार नियोजित वेळापत्रकात बदल झाल्याने विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. तसेच तिसऱ्या कॅप राउंडच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची गरज असताना ती न दिल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले.
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशालाही झाला विलंब
नाशिकसह राज्यभरातील चार ते पाच प्रमुख शहरांत अकरावीची आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. मराठा आरक्षणामुळे यंदा या प्रक्रियेला सुरुवातीलाच विलंब झाला. त्यानंतर प्रवेशाची दुसरी व तिसरी फेरी होत असताना नाशिक, पुणे, मुंबई या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने प्रवेशप्रक्रिया होऊ शकली नाही. त्यानंतर पुन्हा कोल्हापूर, सांगली तसेच राज्यभरातील इतर जिल्ह्यांत पूरपरिस्थितीमुळे प्रवेशप्रक्रिया वेळेत झाली नाही. १५ ते २० दिवस ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाही त्यांच्यासाठी प्रवेशासाठी प्रथम संधी असेल.
सार पोर्टल बंद झाल्याने प्रवेशाला विलंब
यंदा सर्वच व्यावसायिक शाखांच्या प्रवेशासाठी सार पोर्टल सुरू करण्यात आले होते. मात्र, ते तांत्रिक कारणांमुळे चालू शकले नाही. त्यामुळे पुन्हा सीईटी सेलकडे प्रवेशप्रक्रियेची कार्यवाही देण्यात आली. यात २० ते २५ दिवस गेले. त्यानंतर वेगवेगळ्या आपत्ती निर्माण झाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सर्वच शाखांच्या प्रवेशाला यंदा विलंब झाला.
- डॉ. राजेंद्र भांबर, प्राचार्य, एमजीव्ही फार्मसी कॉलेज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.