आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्यम‌् उदासीनता... कुणी उपचार करता का उपचार..! मराठवाड्यातील ग्रामीण जनतेला आरोग्य यंत्रणेच्या उदासीनतेचा करावा लागतो आहे सामना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: दुष्काळात होरपळत असलेल्या ग्रामीण जनतेला आता आराेग्य यंत्रणांच्या उदासीनतेचाही सामना करावा लागताे आहे. जालना, बीड, उस्मानाबाद येथील ८ प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या पाहणीत भयावह स्थिती समाेर आली आहे. 'दिव्य मराठी'ने ७ जानेवारीला बीडच्या माेहखेड, राजेगाव, टाकळसिंगी. जालनाच्या रांजणी, आष्टी, माहाेरा. उस्मानाबादच्या भूम व परंडात ही पाहणी केली.  

 
बीड : खासगी व्यक्तीकडून गाेवरची लस 
जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मोहखेड या गावात आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या खासगी व्यक्तीकडून मुलांना गोवर रूबेला सारख्या लस देण्याचा गंभीर प्रकार आम्हाला दिसून आला. केज तालुक्यातील राजेगाव येथे डॉक्टरच वेळेवर येत नसल्याने रुग्ण वाट पाहून निघून जात आहेत. आष्टी तालुक्यातील टाकळसिंग आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध असल्या तरी डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णसेवा ही कागदावरच राहत असल्याचे नागरिक रामराव जगताप यांनी सांगितले. त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. 

 

जालना : फार्मासिस्टच करताे उपचार 
घनसावंगी तालुक्यातील रांजणी आणि परतूर तालुक्यातील आष्टी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर हाेते. त्यामुळे फार्मासिस्टच रुग्णांवर उपचार करून त्यांना औषधी लिहून देताना दिसून आले. जाफराबाद तालुक्यातील माहोरा आरोग्य केंद्रात मात्र वैद्यकीय अधिकारी वेळेत हजर हाेते. जालनात सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३१ रिक्त आहेत. यांचा भार इतर अधिकाऱ्यांवर असल्याने त्यांच्यावर कामाचा वाढता ताण आहे. 

 

उस्मानाबाद : रुग्ण साेडून डाॅक्टर परीक्षेत 
भूम तालुक्यातील आंबी आणि परंडा तालुक्यातील शेळगाव या दोन्ही आरोग्य केंद्रात सोमवारी वैद्यकीय अधिकारी रजा घेऊन पीजीच्या परीक्षेसाठी गेले होते, अशी माहिती जिल्हा अाराेग्य अधिकारी हणमंत वडगावे यांनी दिली. त्यामुळे दोन्ही ठिकाणची जबाबदारी आरोग्य सेविका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सांभाळली. आंबीत फार्मासिस्टपासून आरोग्य केंद्रातील कर्मचारी आजार विचारून रुग्णांना औषधे देत होते. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी दिवसभर आरोग्य केंद्राकडे फिरकले नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...