आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Alliance's Formula Finally Succeeds ..? Sources Say BJP Is Contesting 144 Seats And Shiv Sena Will Contest 126 Seats

दिल्लीत ठरलं : भाजप १४४, शिवसेना १२६ जागा लढवणार; मित्रपक्षांना १८ जागा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजप-शिवसेना युतीवर तसेच जागावाटपावर शिक्कामाेर्तब करण्यात आले. भाजप १४४, शिवसेना १२६, तर इतर घटक पक्षांना १८ जागा देण्यावर या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, भाजपत माेठ्या प्रमाणावर इनकमिंग झाल्याने यापैकी काही दिग्गज नेत्यांना उमेदवारी देण्याचा निर्णयही पक्षाने घेतला. त्यासाठी भाजपच्या काही विद्यमान आमदारांची तिकिटेही कापली जाऊ शकतात. निवडणुकीपूर्वी पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात खराब कामगिरी असलेल्या आमदारांचीही तिकिटे कापली जाऊ शकतात. अशा १० ते १५ आमदारांच्या जागी नवे चेहरे देण्याचा निर्णयही पक्षाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटपाची घाेषणा करतील.
 

युतीत १२ जागांची अदलाबदल हाेणार
नवी दिल्लीत गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेली भाजप काेअर कमिटीच्या बैठकीत सुमारे ८ तास खल झाला. त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित झाली.  शिवसेना आणि भाजपच्या जुन्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरही या वेळी चर्चा करण्यात आली. मात्र २०१४ मध्ये वेगळे लढल्याने आता काही जागांवर तिढा निर्माण झाला होता. ताेही सोडवण्यात आला. २००९ मध्ये एकमेकांकडे असलेल्या १० ते १२ जागांची अदलाबदली करण्यास शहांनी संमती दिली. मुख्यमंत्र्यांनी आधी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही संमती घेतली हाेती.
 

उपमुख्यमंत्रिपद सेनेला? शहांचाही हिरवा कंदील
लाेकसभा निवडणुकीच्या वेळी युती करताना विधानसभेतही पदांचे फिफ्टी-फिफ्टी वाटप ठरले हाेते. त्यानुसार मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेले तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळावे, यासाठी उद्धव ठाकरे आग्रही हाेती. त्यांची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी अमित शहांच्या कानी घातली. अखेर चर्चेअंती शहांनी शिवसेनेला हे पद देण्यास संमती दर्शवल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात ही माळ पडू शकते, अशी चर्चा आहे. 
 

रविकांत तुपकर, पडळकर भाजप प्रवेशाच्या वाटेवर
राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला. ते लवकरच भाजपत प्रवेश करतील व त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिलेले धनगर समाजाचे नेते पडळकरही लवकरच भाजपत जाणार आहेत. त्यांनाही विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे.