आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATM कार्डद्वारे चोरट्यांनी काढलेली दीड लाखाची रक्कम खातेदारास परत करण्याचे 2 बँकांना आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रेल्वे प्रवासात चोरीस गेलेल्या दोन बँकांच्या एटीएम कार्डमधून चोरट्यांनी परस्पर एक लाख ४४ हजार रुपये काढले. या प्रकरणात केवळ बँकांना कळवूनही कार्ड त्वरित बंद केले नाही. बँकेच्या सेवेत त्रुटी आढळल्याने ग्राहकाची रक्कम तसेच नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी ५ हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले अाहेत.
केवळ नाव व बँकेची शाखा सांगितल्यावर ग्राहकाच्या चोरी गेलेल्या एटीएम कार्डची सेवा खंडित करण्याची प्रणाली बँकेने विकसित करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने नोंदवले. आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातील ४४ हजार रुपये आणि अॅक्सिस बँकेतील ९५ हजार रुपये ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले आणि संध्या बारलिंगे यांनी दिले.

 

रेल्वे प्रशासनावर ताशेरे : रेल्वेच्या वातानुकूलित कक्षात अटेंडन्स असतो. अशा ठिकाणाहून प्रवाशांच्या वस्तू चोरीला जाणे म्हणजे सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचे लक्षण आहे. रेल्वे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवाशांकडून रक्कम घेते आणि सुरक्षा मात्र पुरवत नाही. रेल्वेने यात्रेकरूंच्या सुरक्षेची संपूर्ण हमी घेतलेली असते. मात्र यातून रेल्वेची उदासीनता आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसंबंधीचा निष्काळजीपणा लक्षात येतो.तक्रारदारास या घटनेमुळे अस्थमाचा त्रास जाणवू लागलेला असताना वातानुकूलित कक्षात वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. तक्रारदाराने रेल्वेस प्रतिवादी केले नसल्याचा खुलासा मंचाने केला.

 

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तक्रार : रिझर्व्ह बँकेच्या 'झिरो लायबिलीटी' मार्गदर्शक तत्त्वानुसार चोवीस तासांच्या आत तक्रारदाराने संबंधित बँक व्यवस्थापकास कळवणे आवश्यक आहे. त्यानुसार रिझर्व्ह बँकेच्या 'झीरो लायबिलिटी' करिता तक्रारदार पात्र आहे.खात्यातून रक्कम काढल्याची प्रथम तक्रार बँक व्यवस्थापकांकडे करण्यात आली होती.तसेच तक्रारदाराने एटीएमचा पिन कोठेही सार्वजनिक केलेला नसताना त्याच्या खात्यातून एटीएमद्वारे रक्कम काढण्यात आली. त्यामुळे 'झीरो लायबिलिटी'नुसार ग्राहक पैसे परत मिळण्यास पात्र ठरतो. तक्रारदाराच्या निष्काळजीपणामुळे रक्कम काढण्यात आली नाही, हे यावरून सिद्ध होते, असे निरीक्षण ग्राहक मंचाने नोंदवले.


चोरीस गेलेली रक्कम परत मिळावी यासाठी तक्रारदाराने दोन्ही बँकांकडे सतत पाठपुरावा केला. आयसीआयसीआय बँकेने रक्कम जमा करतो म्हणून सांगितले आणि रक्कम मात्र जमा केली नाही तर अॅक्सिस बँकेने ९५ हजार जमा करून खाते ब्लॉक करून ठेवले. त्यामुळे व्यवहार करता येत नव्हते. काही दिवसांनंतर बँकेने रक्कम परस्पर काढून घेतली. अनेक वेळा विनंती करूनही रक्कम मिळाली नसल्याने शर्मा यांनी अॅड. सुनील चावरे पाटील यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होऊन दोन्ही बँकांना संबंधिताची रक्कम तीस दिवसांच्या आत आणि २७ मार्च २०१८ पासून ९ टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले. दोन्ही बँकांना प्रत्येकी पाच हजार रुपये नुकसान भरपाई व दोन हजार रुपये खर्चापोटी तक्रारदारास देण्याचे आदेश दिले.

 

वातानुकूलित शयनयानमधून पर्स चोरीस
कर्नल रामेश्वर शर्मा वत्यांची पत्नी अंजना १७ सप्टेंबर २०१७ रोजी सचखंड एक्स्प्रेसने प्रथमश्रेणी वातानुकूलित कक्षातून प्रवास करीत होते. अंजना यांची पर्स १८ सप्टेंबर १७ रोजी पहाटे २.४५ वाजता भोपाळदरम्यान चोरीस गेली. पर्समध्ये आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे एटीएम कार्ड, रोख पंधरा हजार रुपये, दोन मोबाइल फोन व इतर वस्तू होत्या. शर्मा दांपत्याने त्वरित रेल्वेचा अलार्म वाजवून मदत मागितली. खांडवा (मध्य प्रदेश) रेल्वेस्थानकादरम्यान शर्मा यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. सकाळी ५.४५ वाजता दोन्ही एटीएम कार्ड ब्लॉक करण्यात आले. परंतु तत्पूर्वी चोरट्यांनी अॅक्सिस बँकेच्या खात्यातून देवास येथून एक लाख तर आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ४४ हजार रुपये मध्य प्रदेशच्या सोनकच्छ गावातून काढले होते.

 

ग्राहकांनी ही घ्यावी खबरदारी
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचे नंबर आपल्या डायरीत नोंदवून ठेवावेत.बँक अथवा कार्डच्या मागे दिलेले ग्राहक सेवा क्रमांकही डायरीत नोंदवून ठेवावेत.कार्ड गहाळ अथवा चोरी झाल्यास २४ तासांच्या आत ग्राहक सेवा अथवा संबंधित बँक शाखेस कळवावे.गोपनीय पिनकोड कुणासमोरही उघड करू नये.

 

योग्य न्यायनिवाडा
आम्ही बर्फ आणि अतिरेक्यांशी लढताना कमावलेली रक्कम न्यायदेवतेच्या आदेशामुळे परत मिळत असल्याचा आनंद आहे. अद्याप रक्कम जमा झालेली नसली तरी ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिलेल्या निवाड्यामुळे आम्ही आनंदित आहोत. बॅँकांनी आमच्याशी केलेला व्यवहार चुकीचा आहे. ग्राहक म्हणून बँकांनी असा व्यवहार करावा, अशी अपेक्षा नव्हती. मथुरेत श्रीकृष्णाचे दर्शन घेत असताना न्यायदेवतेने कौल दिला. कर्नल रामेश्वर शर्मा, बँक ग्राहकाचे पती

बातम्या आणखी आहेत...