आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक केलेला देवडीकर मूळ साेलापूरचा, मतदान कार्डवर पत्ता मात्र औरंगाबादचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादेत ऋषिकेश देवडीकर या घरात राहायचा. - Divya Marathi
औरंगाबादेत ऋषिकेश देवडीकर या घरात राहायचा.

औरंगाबाद : कर्नाटकच्या पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने गुरुवारी रात्री उशिरा ऋषिकेश भास्कर देवडीकर (४२) या संशयिताला अटक केली. या हत्या प्रकरणात मास्टरमाइंड समजला जाणारा ऋषिकेश दहा वर्षांपासून अाैरंगाबादेत वास्तव्यास हाेता. स्वत:ला ताे सनातन संस्थेचा प्रचारक सांगत होता. विशेष म्हणजे लंकेश यांच्या हत्येनंतर दोन ते तीन महिन्यांनंतर त्याने औरंगाबाद सोडले. तेथून काही दिवस गोवा व नंतर झारखंडमध्ये स्थायिक झाला. एप्रिल महिन्यात त्याच्या आई-वडिलांनीही मुंबई गाठले, तर पत्नी मुलीसह मूळ गावी गेल्या हाेत्या.

यापूर्वीही गाेविंद पानसरे व नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबादच्या सचिन अंदुरे, शरद कळसकर व जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना अटक झाली हाेती. त्यापाठाेपाठ अाता लंकेश यांच्या प्रकरणातही अाैरंगाबादचे धागेदाेरे मिळाल्याने येथील कट्टरवाद्यांच्या कारवायांवर गुप्तचर यंत्रणा व पाेलिसांची करडी नजर अाहे.

५ सप्टेंबर २०१७ रोजी लंकेश यांची कर्नाटकात तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यात आतापर्यंत १२ हून अधिक संशयितांना अटक केली आहे. अाराेपपत्रात १८ जणांचा उल्लेख अाहे, त्यापैकी ऋषिकेशच्या शोधात पथक दीड वर्षापासून होते. मोबाइल लोकेशन व तांत्रिक तपासाच्या आधारे गुरुवारी रात्री मध्य प्रदेशातील धनबादमधील कतरास येथील पेट्रोल पंपावरून त्याला अटक झाली.

सुरुवातीचे काही दिवस ऋषिकेश अाैरंगाबादेत ज्योतीनगर, एन-१ परिसरात पत्नी, मुलगी व आई-वडिलांसह राहिला. त्यानंतर तो एन-९ परिसरात रेणुकामाता मंदिरच्या मागील परिसरात यशवंत शुक्ला यांच्या घरात २७ मार्च २०१६ पासून राहू लागला. तेथे त्याने पतंजलीच्या साहित्याची एजन्सी चालवायला घेतली होती. मात्र, दुकानात त्याचे वडीलच बसत होते. ऋषिकेश स्वत:ला सनातनचा प्रचारक म्हणवून घेत.

ताे धार्मिक विषयांवर व्याख्यानही देत असे. यात त्याने अनेकदा सनातनशी संबंधित महिला प्रवचनकारांनादेखील आमंत्रित केल्याचे स्थानिक लाेकांनी सांगितले. त्याचा लहान भाऊ ज्योतीनगरमध्ये राहत होता. आता तो मुंबईला स्थायिक झाला आहे.

फेसबुकवर जहाल पोस्ट

ऋषिकेशच्या फेसबुकवर दोन प्रोफाइल असून दोन्ही प्रोफाइलवर जहाल हिंदू विचारांच्या पोस्ट आढळून येतात. यात अनेक ठिकाणी त्याने सनातन संस्थांच्या निगडित पोस्ट शेअर केलेल्या आहेत.

कपाळाला टिळा, खादीचा कुर्ता अशी साधी राहणी 

ऋषिकेश अत्यंत धार्मिक हाेता. एन-९ मध्ये स्थायिक झाल्यानंतर दिवाळीला त्याने सनातन संस्था असा उल्लेख असलेला कंदील लावल्यानंतर आम्हाला तो संस्थेशी संलग्न असल्याचे स्थानिकांनी सांगितले. कपाळाला टिळा व कायम खादीचा पायजमा-कुर्ता व साधी चप्पल ताे परिधान करत हाेता. वडील त्याच्या पतंजलीच्या एजन्सीचे काम पाहायचे, तर आई ,पत्नी कापडी पिशव्या शिवून अार्थिक हातभार लावत हाेते.

२०११ चे मतदान कार्ड

ऋषिकेशच्या परिचयाच्या लोकांनी त्याच्यासाठी शुक्ला यांना भाड्याने घर देण्यासाठी विचारणा केली. परिसरातीलच ओळखीच्या लोकांच्या परिचयातील असल्याने शुक्ला यांनी त्यास होकार कळवला. परंतु घर भाड्याने देताना त्यांनी रीतसर त्याच्यासोबत बाँडवर करार केला. ऋषिकेश स्वत:ला मूळ सोलापूरचा सांगत होता. मात्र, त्याच्याकडे गुरुजन हाउसिंग सोसायटी, ज्योतीनगर, शहानूरमियां दर्गा या पत्त्याचे एप्रिल २०११ मध्ये तयार झालेले मतदान कार्ड होते. त्यामुळे तो बऱ्याच वर्षांपासून शहरात स्थायिक होता हे स्पष्ट झाले.
 

बातम्या आणखी आहेत...