ज्येष्ठा गौरी / दुष्काळ, मंदीच्या छायेत ज्येष्ठा गौरींचे आगमन; निम्म्या किमतीत मुखवट्यांची विक्री

उत्कृष्ट फिनिशिंगमुळे अमरावती पॅटर्नच्या मुखवट्यांना मोठी मागणी

Sep 05,2019 08:17:00 AM IST

बीड - दुष्काळामुळे बीडमध्ये ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या पूर्वसंध्येला महालक्ष्मी मुखवटे विक्री सेंटरवर अर्ध्याच किमतीत मुखवटे विक्री केल्याचे दिसून आले. अमरावती पॅटर्नच्या महालक्ष्मीच्या मुखवट्याचे डोळे व फिनिशिंग चांगली असल्याने ग्राहकांनी अशाच मुखवट्यांना पसंती दिली.


भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी - गौरी बसवतात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत महालक्ष्मीचे मुखवटे दुष्काळामुळे अर्ध्याच किमतीत दुकानदारांनी विक्री केले. शहरात पंधरा सेंटरवर विक्रेत्यांना दुष्काळामुळे बाजारात ग्राहकच नसल्याने यंदा निम्म्याच किमतीत मुखवटे विक्री करावे लागले. बीडचे महालक्ष्मी सेंटरचालक नगर, बार्शी व अमरावतीतूून महालक्ष्मीचे मुखवटे खरेदी करतात.


यंदा दुष्काळी परिस्थितीचा मोठा परिणाम खरेदी-विक्री व्यवहारावर झाला. अमरावती पॅटर्नचे मुखवटे मागील वर्षी १९०० रुपयांना मिळत होते. दुष्काळामुळे केवळ एक हजार रुपयांना ते मिळत आहेत.महालक्ष्मी मुखवटे सेंटरवर सातशे रुपयांपासून चार हजार रुपयापर्यंतचे मुखवटे विक्रीस आले आहेत.

सांभाळण्यापेक्षा माल विकलेला बरा
यंदा तीन महिन्यांपासून पाऊस पडला नसल्याने दुष्काळाचे सावट या व्यवसायावर दिसून आले. आम्हाला महालक्ष्मी मुखवट्यांची किंमत निम्म्यावर आणावी लागली. कारण हा माल विक्री झाला नाही तर तो वर्षात खराब होतो. त्यासाठी आम्ही मुखवटे सांभाळण्यापेक्षा निम्म्याच किमतीत विक्री केले. यंदा दुकानाचे भाडेसुद्धा निघाले नाही.
- गजानन कदम, जिजाऊ महालक्ष्मी विक्री सेंटर

X