आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचल का परचम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातल्या लहान-मोठ्या गावा-शहरांतल्या आम्ही मुली रात्र जागवून अभ्यास करतो आणि मध्यरात्री बिनधास्त विद्यापीठातल्या रस्त्यांवर फिरतो, तेव्हा रोज हे विद्यापीठ आणि इथलं हे मुक्त वातावरण उभं करणाऱ्या सगळ्या प्राध्यापकांबद्दल कृतज्ञतेने मन भरून येतं. कुणी म्हणेल यातून काय झालं मोठंसं?

 

परीक्षेआधीचा ‘कत्ल-ए-आम’चा आठवडा चालला होता. हातातलं पुस्तक संपवून नोट्सची वही मी बॅगेत ठेवली आणि लायब्ररीतून निघाले, तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते. कानात इयरफोन घालून गुणगुणत हॉस्टेलच्या रस्त्याला लागले. वळणावरच्या पिवळ्या दिव्याखाली तावातावाने चर्चा करणाऱ्या दोन मुलांना पाहून विद्यापीठात आल्यावरच्या पहिल्या दिवसांमधली माझी अवस्था आठवली आणि एकदम हसू आलं. रात्री अडीच काय, भर दुपारीही एकांड्या रस्त्यावर कुणी पुरुष दिसला, तर सावध होण्याचं ॲप तेव्हा माझ्या डोक्यात सुरू होत होतं आणि आज या लांब लांब रस्त्याला माझ्या चालीत भिडतेय मी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रात्रभर खुल्या असणाऱ्या या लायब्ररीने मला आणि माझ्या मैत्रीणींना अशी भर रात्रीच्या या वाऱ्याशी ओळख करून दिली आणि किती काय काय मिळालं!


देशभरातल्या लहान-मोठ्या गावा-शहरांतल्या आम्ही मुली रात्र जागवून अभ्यास करतो आणि मध्यरात्री बिनधास्त विद्यापीठातल्या रस्त्यांवर फिरतो, तेव्हा रोज हे विद्यापीठ आणि इथलं हे मुक्त वातावरण उभं करणाऱ्या सगळ्या प्राध्यापकांबद्दल कृतज्ञतेने मन भरून येतं. कुणी म्हणेल यातून काय झालं मोठंसं? पण आम्हाला मिळालेले हे पंख पाहायचे तर पाहणाऱ्याला आधी इथली मुलगी म्हणून एक मोठा प्रवास करून पाहावा लागेल. ‘जेएनयू’ हा तर अपवाद झाला, पण देशभरात उच्चशिक्षण घेणाऱ्या लहान लहान गावच्या सगळ्या मुली कमीअधिक प्रमाणात जेव्हा स्वातंत्र्याची चव चाखतात, तेव्हा देशासाठीची नवी पहाट दाराशी उभी असते. दीडशे वर्षांपूर्वी लोकांच्या नजरा चुकवत चोरपावलांनी मुक्ता साळवे सावित्रीबाईंच्या शाळेत शिरली खरी, पण शिक्षणाने तिच्या पायांना असं बळ दिलं, की गावच्या सगळ्या गर्दीच्या डोळ्यात पाहात तिने ताठपणे उभं राहून ‘महारामांगांची परिस्थिती’ ऐकवली.


आज तालुक्याच्या गावी आणि शहरातल्या हॉस्टेलमधून शिकणाऱ्या अशा कितीतरी अनाम मुक्ता आपला रस्ता ताठपणे, पार करण्यासाठी अशी सामग्री गोळा करत आहेत. खांद्यावरची ओढणी घट्ट सावरत त्या कॉलेजला निघतात आणि झटपट रस्ता पार करू बघतात. या ओढणीने शहराचं लायसन्स दिलं आहे, त्यांना. रस्त्यावरच्या सगळ्या नजरांना भिडताना त्या ओढणी सावरत, स्वतःला झाकत वेगात चालत राहतात. कधी ओढणीला भेदून या नजरा टोचतात, पण कॉलेजला तर पोचायचं असतं. त्या चालत राहतात. एरवी, आपल्या गावातही या नजरा अशाच तयार असतात, आपलं पाऊल बाहेर पडायची वाट पाहत, पण कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही ओढणी तिच्या ओच्यात स्वातंत्र्य! घेऊन येते चालण्याचं. कॉलेज संपेपर्यंत पुरते ही ओढणी आणि तिच्यातलं मूठभर स्वातंत्र्य. घरून लग्नाची वॉर्निंग बेल वाजेपर्यंत का होईना, चालत राहता येतं. ओढणीभर स्वप्नं विणून ठेवता येतात, उद्यासाठी.


दुर्दैवाने, बहुतेकींना अर्ध्यावरच या रस्त्याचा निरोप घ्यावा लागतो. गेल्या काही वर्षांत परिस्थिती आणखी बिघडली आहे. ‘आयएमएफ’ची आकडेवारी म्हणते की, भारतात २००७ ते २०१४ या वर्षांत उच्चशिक्षणातलं स्त्रियांचं प्रमाण ३९ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांपर्यंत वाढलंय खरं, पण १९९९ ते २०१४ या वर्षांत नोकरदार स्त्रियांचं प्रमाण मात्र ३४ टक्क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत घसरलं आहे. ‘सीएसडीएस’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणातून असं पुढे आलंय की ४१ टक्के तरूणांना वाटतं, की लग्नानंतर स्त्रियांनी नोकरी सोडली पाहिजे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ३३ टक्के स्त्रियांना हे मान्य आहे. निम्म्याहून जास्त तरूणांना असं वाटतं की, बायकोनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. हळूहळू का होईना, स्त्रियांचं उच्चशिक्षणातलं प्रमाण वाढतंय, पण हे ओढणीभर जे काय स्वातंत्र्य मिळतं आहे, ते लग्नापर्यंतच आहे, हे बहुतेक मुलींनी मान्य केलं आहे. जीव लावून मुली अभ्यास करतात, रिकाम्या वेळात सिनेमा पाहतात, पण दिवसाकाठी कितीतरी उपास करतात आणि चांगल्या नवऱ्यासाठी व्रतं ठेवतात. आजकाल अनेक घरांमध्ये उच्चशिक्षित सून हवी असते. जाहिरातींमध्ये उच्चशिक्षण ही लग्नासाठीची पात्रता बनते. तिने नोकरी करून पैसेही कमवावे वाटल्यास, पण पोराबाळांकडे घराकडे दुर्लक्ष करू नये, म्हणून कमावत्या बाईच्या डोक्यावर दुहेरी ओझं येऊन पडतं. घराबाहेरच्या कामात तिनं एकवेळ नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावावा, पण घरातल्या कामाचा वाटा उचलायची नवऱ्यावर वेळ आली तर तिच्यासारखी नालायक तीच! नवरात्रीचे नऊ दिवस उपास केल्यानंतर दहाव्या दिवशी कँटीनमध्ये जेवताना, एक मैत्रीण म्हणाली तसं, ‘हम तो बंधों में ही आजाद हैं!’


खरं तर ज्यांनी शिक्षणाच्या ताकदीचं महत्व ओळखलं, अशा कितीतरी अनाम ‘निरक्षर’ आयांनी आपल्या मुलींना शाळेचा रस्ता दाखवला. ‘आपल्यावर जी वेळ आली, ती आपल्या पोरीवर येऊ नये’ म्हणून तिच्या मागे लागून तिला शिकवलं… पण ठराविक अंतर पार केल्यावर खांद्यावरची ओढणी, जेव्हा वाऱ्याशी खेळू लागते तेव्हा तिचं ऐकायचं की नाही, हे शेवटी त्या त्या मुलीलाच ठरवावं लागतं. आपापल्या गतीने का होईना, पण या ओढणीला आपल्या लढाईची साथीदार करून घेता येतं. कमला भसीन म्हणतात,
‘तेरे माथे पे ये आचल
बहुत ही खूब है लेकिन
तू इस आंचल का अगर
एक परचम बना लेती तो, अच्छा था!’


घराघरातून आणि गाव-समाजाकडून एकीकडे दोर आवळले जात असताना आज असे शेकडो ‘परचम’सुद्धा फडकत चाललेत वाऱ्यावर. ज्या नजरांनी विद्यापीठाची वाट अडवली, त्या सगळ्या अमानुष नजरांना बनारस हिंदू विद्यापीठाच्या मुलींनी एकत्रितपणे तोंड दिलं आणि आपला रस्ता मोकळा करून घेतला. लैंगिक शोषणाच्या विरोधातल्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, म्हणून रात्रंदिवस बीएचयूच्या मुली विद्यापीठाचं भव्य प्रवेशद्वार अडवून बसल्या होत्या. जामिया मिलीया विद्यापीठात मुलींच्या हॉस्टेलला कुलुपं घालणाऱ्या सनातनी प्रशासनाला तिथल्या मुलींनी असं तोंड दिलं, की शेवटी त्यांना ऐकण्याशिवाय पर्याय उरला नाही. या मुलींच्या जोशपूर्ण असहकाराने हिजाब आणि घुंगट लादत जाणाऱ्या कट्टर धर्मसत्तांच्या नाकी नऊ आणले. एकीकडे केरळमध्ये स्त्रियांसाठी सबरीमला मंदिराची प्रवेशद्वारं घट्ट बंद करण्याचा प्रयत्न सुरू असताना, या ‘विद्येच्या मंदिरां’ची दारं देशभरातल्या मुली मोठ्या हिमतीने उघडताहेत.


मी हा लेख मोठ्या ऐतिहासिक दिवसात लिहितेय. ३० जानेवारी हा रोहित वेमुलाचा जन्मदिवस. हैदराबाद विद्यापीठात शिकणारा हा कवीमनाचा विज्ञान संशोधक इथल्या व्यवस्थेमध्ये मारला गेला, त्याला तीन वर्षं झाली. मात्र त्याची आठवण आपल्या मनात जिवंत ठेवून त्याची लढाऊ आई राधिका वेमुला, रूढार्थाने ‘अशिक्षित’ असली तरी आज मोठ्या निकराने देशभर शिकणाऱ्या मुलामुलींना धाडसाने शिकायला शिकवते आहे. इथली सगळी बंधनं झुगारणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुलेंच्या शिक्षणाच्या वाटेवर तेलंगणामध्ये भेटलेल्या प्रणय आणि अमृताने गेल्या वर्षी ३० जानेवारीला लग्न केलं. अमृताच्या घरच्यांना हा दलित जावई सहन झाला नाही, सप्टेंबरमध्ये त्यांनी प्रणयचा खून घडवून आणला. आज रोहितच्या जन्मदिवशी अमृताला मुलगा झाला आहे आणि सावित्रीबाईंच्या हिंमतीने ती आपल्या बाळासोबत उद्याच्या मुक्त समाजाचं स्वप्न पाहतेय. तिच्या ओढणीचा फडकणारा परचम इथल्या मुलींना बंधनांमध्ये अडकवणाऱ्या सगळ्या नजरांना, जसं आव्हान देतो आहे, तसं तुम्हा आम्हालाही आवाहन करतो आहे, निर्भय होऊन इथल्या रात्रीला भेदत रस्ता तुडवण्याचं...

 

लेखिकेचा संपर्क : rahee.ananya@gmail.com
Twitter: @hum_rahee
(लेखिका नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. )

 

बातम्या आणखी आहेत...