आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई/औरंगाबाद - राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग या महिन्याअखेेर रंगणार अशा बातम्या असताना या प्रयोगासाठी अद्याप केंद्र सरकारकडून आवश्यक परवाने मिळवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच कृत्रिम पाऊस कोठे पाडायचा याबाबत अद्याप ठरले नसल्याची माहिती राज्य आपत्कालीन विभागाने दिली. कृत्रिम पावसासाठी राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आपत्कालीन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत माहिती देताना सांगितले, सध्या फक्त निविदांचे काम झाले असून ख्याती वेदर मॉडिफिकेशन कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून काही परवाने घ्यावे लागतात. सध्या त्याचे काम सुरू असून हे परवाने लवकरात लवकर मिळावेत, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. कृत्रिम पाऊस कधी, कुठे पाडायचा याबाबत अजून काहीही योजना तयार झालेली नाही. पावसाची स्थिती, कुठल्या भागात पाऊस नाही वा कमी आहे याची माहिती घेऊन आणि हवामानशास्त्र विभागाने ढगांची माहिती दिल्यानंतरच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येतो. त्यामुळे आत्ताच तारीख व ठिकाणांची माहिती देणे योग्य ठरणार नाही.
असा पडतो कृत्रिम पाऊस
> 1. बाष्पयुक्त ढगांत विशिष्ट रसायनांची फवारणी केली जाते. यासाठी सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड, कोरडा बर्फ
(घनरूप कार्बन डायऑक्साइड) यांचा वापर करतात. आपल्याकडे सोडियम आयोडाइडचा वापर केला जातो.
> 2. यामुळे ढगातील बाष्पाची घनता वाढते. थेंब तयार होतो. त्याचा आकार वाढल्याने थेंब ढगातून खाली पडतो.
> 3. त्यानंतर त्या ढगातील बाष्प पावसाच्या रूपात जमिनीवर पडते.
> 1. विमानाने फवारणी करणे
डॉपलर रडारच्या मदतीने बाष्पयुक्त ढगांची माहिती मिळते. विमान रसायनासह (सिल्व्हर आयोडाइड) त्या ढगांत घुसते. तेथे रसायनांची फवारणी करते. हे रसायन ढगातील बाष्पकणांना चिकटते. त्यांचा
आकार वाढतो व पाऊस पडतो. औरंगाबादेत या पद्धतीचा वापर होण्याची शक्यता आहे.
> 2. रॉकेटने ढगात रसायन सोडणे
यात जमिनीवरून बाष्पयुक्त ढगांवर रसायनयुक्त रॉकेटचा मारा केला जातो. रॉकेटच्या ज्वलनामुळे रसायन ढगांतील बाष्पकणांवर चिकटते व पाऊस पडतो. नाशिक परिसरात २०१५ मध्ये या पद्धतीचा वापर झाला होता.
> 3. जमिनीवर रसायनाचे ज्वलन
या पद्धतीत बाष्पयुक्त ढगांच्या खाली जमिनीवर रसायनांचे ज्वलन केले जाते. रसायनाची वाफ ढगांतील बाष्पाला चिकटते. त्याची घनता वाढते व पाऊस पडतो. ही पद्धत क्वचित वापरतात.
महाराष्ट्राची आघाडी : २००३ व ०४ मध्ये दोन वेळा राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग
महाराष्ट्रात यापूर्वीही कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने हायड्रोलॉजी प्रकल्पात एक विभागही स्थापन केला होता. २००३-२००४मध्ये बारामती परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला. त्या वेळी एक ते सहा मिमी पाऊस पडला होता. त्या वेळी या प्रकल्पासाठी १२ कोटी रुपये खर्च आला होता. यंदा कृत्रिम पावसासाठी राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
> 2003 : बारामतीत रडार लावले
> 2004 : शेगाव व बारामतीत रडार
> 2015 : औरंगाबादेत रडार लावले नंतर काढले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.