आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू - कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारवर बंडखोर आमदारांमुळे संकट कायम आहे. काँग्रेसने भाजपवर आपले आमदार फोडल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा केली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर आमदार एम. टी. बी. नागराज यांची समजूत काढण्याची पक्षाच्या नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे दिसत आहे. बंगळुरू येथून रविवारी मुंबईला रवाना होण्याआधी पक्षासोबत राहू, असे संकेेत दिलेल्या नागराज यांनी मुंबईला पोहोचताच आपले वक्तव्य बदलले आहे. इतर बंडखोर आमदारांची भेट घेतल्यानंतर नागराज मुंबईत म्हणाले की, आमचे सहकारी आमदार के. सुधाकर राजीनामा मागे घेण्यास तयार झाले नाही. त्यामुळे मीही माझा राजीनामा परत घेणार नाही.
मुंबईत रविवारी १२ बंडखोर आमदार हजर होते. आधी सांगण्यात आले होते की, काँग्रेसच्या १३ आणि जेडीएसच्या ३ बंडखोर आमदारांपैकी १५ जण मुंबईत आहेत. सुधाकर हे दिल्लीत असल्याचे म्हटले जात आहे. नागराज मुंबईला रवाना झाल्यानंतर काँग्रेसचे संकटमोचक आमदार डी. के. शिवकुमार यांनी विश्वास व्यक्त केला होता की, नागराज आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईहून परततील आणि पक्षासोबत राहतील.
नागराज आणि सुधाकर यांनी एकाच वेळी १० जुलैला सभापती रमेशकुमार यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्याआधी शनिवारी नागराज यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर नागराज यांनी राजीनामा परत घेण्याचे संकेत दिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.