आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात यंदा सरासरी 95 % पाऊस, डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेला अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तापमानवाढीमुळे राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शनिवारी वर्तविला. जून आणि जुलै महिन्यांत पावसाचा खंड पडण्याची शक्यता असून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल. शेतकऱ्यांनी कमी कालावधी आणि कमी पाणी लागेल, अशीच पिके घेणे योग्य ठरेल, असा सल्ला साबळे यांनी दिला. 


कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित हा अंदाज आहे. त्यानुसार राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.या वर्षी पावसाळ्याच्या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला आणि परभणी येथे पावसात मोठे खंड पडतील. दापोली, पाडेगाव आणि नागपूर भागातही खंडित वृष्टी राहील. 


कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहणार असल्याचे साबळे यांनी सांगितले. 
सरासरीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस होणार असल्याने नागरिकांनी पाण्याच्या काटकसरीवर भर देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येतील अशी मूग, मटकी, उडीद, तूर, मका, सोयाबीन ही पीके घ्यावीत. कापूस लागवडीचे क्षेत्र कमी करणे गरजेचे आहे, असा सल्ला साबळे यांनी दिला. धूळपेरणी उपयोगाची नाही. ६५ मिलीमीटर पावसाचा जमिनीत ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची जोखीम पत्करू नये. अन्यथा पावसाने उघडीप दिल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ शकेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवारमुळे आणि पाणी फाउंडेशनच्या कार्यामुळे राज्यातील अनेक विहिरींना पाणी आहे. मात्र, या पाण्याचा जपून वापर करावा. शेतीला पाणी देताना ठिबक सिंचन अवलंबल्यास पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही, असे साबळे यांनी सांगितले.


महाराष्ट्राचा सुमारे ४२ टक्के भाग हा कोरडवाहू शेतीचा आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत चांगले उत्पादन देणारी पिके घेणे, ही काळाची गरज आहे. पारंपरिक पीकपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. शिवाय कोकण विभागाप्रमाणे  पिकावर सर्वस्वी अवलंबून न राहता, पूरक उत्पन्नसाधने जोडणे गरजेचे आहे. - डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामानतज्ज्ञ


राज्यातील विभागनिहाय पावसाचा वर्तवण्यात आलेला सरासरी अंदाज
मराठवाडा - ९५ टक्के
कोकण - ९० टक्के
उत्तर महाराष्ट्र - ९७ टक्के
पश्चिम महाराष्ट्र - ९५ टक्के
विदर्भ - ९७ टटक्के