आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : वीज ग्राहकांकडील थकबाकी राज्याच्या वित्तीय तुटीहून दुप्पट, निम्मे ग्राहक वीज बिलाचा भरणाच करत नाहीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यात एकूण २ कोटी ५४ लाख ८४, ४९६ वीज ग्राहक आहेत. त्यापैकी १ कोटी ३३ लाख ४८,९३४ म्हणजे तब्बल ५२.३८ टक्के ग्राहकांनी वीज बिलाचा भरणाच केलेला नाही. परिणामी वीज ग्राहकांकडे अडकलेली थकबाकी राज्याच्या वित्तीय तुटीच्या दुपटीपेक्षाही अधिक झाली आहे. राज्याच्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात एकूण संभाव्य वित्तीय तूट २०,२९२ कोटी ९४ लाखांवर जाईल, असे म्हटले असून वीज ग्राहकांकडील थकबाकी आताच ४८,५४० कोटी ५८ लाखांवर पोहोचली आहे. यातील निम्म्यापेक्षा अधिक थकबाकी प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातून आहे. 


पाणी, कोळसा, तेलाचा वापर करून वीजनिर्मिती होते. १ युनिट वीज एका ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सव्वासहा रुपये खर्च येतो. ग्राहकांना युनिटप्रमाणे दर आकारले जातात. कृषी ग्राहकांना स्वस्तात वीज दिली जाते. तरी बिलाचा वेळेत भरणा होत नाही. गतवर्षी मागणी व पुरवठ्याचे संतुलन बिघडून विभागीय आयुक्तालयात भारनियमनाची नामुष्की ओढवली होती.  यामुळे उद्रेक होऊन महावितरणचे कार्यालय फोडण्यात आले होते. राजकारणी रस्त्यावर उतरले होते. 

 

वीज बिल थकवण्याची कारणे
> महावितरणकडून वीज वितरणाचे काम जसे केले जाते तसे नियमित वीज बिलाची वसुली केली जात नाही.
> राजकारणी वीज बिल माफीची खोटी आश्वासने देत राहतात. त्यामुळे अनेक ग्राहक बिलांचा भरणा करत नाहीत.
> विशेषत: कृषिपंपांना अंदाजे अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केली जाते.
> नियमित बिल दिले जात नाही. अचूक रीडिंग न घेणे, १८% व्याज, विलंब शुल्क, अधिभार अशी एकूण रक्कम ग्राहकांच्या क्षमतेबाहेर जाते.

 

अंधारात राहण्याची वेळ येऊ शकते
एक सेकंद वीज खंडित होऊ नये अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त केली जाते. मात्र, वापरलेल्या विजेच्या रकमेचा भरणा करण्यात तेवढी तत्परता दाखवली जात नाही. परिणामी वीज सेवा अडचणीत आली आहे. ग्राहकांनी बिलाचा भरणा केला नाही तर सर्वांवर अंधारात राहण्याची वेळ दूर नाही. 
पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी

 

थकबाकीदार ग्राहकांची वर्गवारी
ग्राहक    संख्या     थकबाकी 
घरगुती     ५०६५३९२     ११३३.२९
व्यावसायिक    ४५६९१६    १०२२.२०
औद्योगिक    ६८८३४    १२१३.६१
पॉवरलूम    २८६५७    ७७२.८४
कृषी    ४०५३२४१    ३०१९८.६८
पाणीपुरवठा    ३८९००    १७०९.५७
स्ट्रीट लाइट    ८०१९५    ४१४५.४९
इतर    ५५३४६    ८१.८५
पीडी    ३५०१४५३    ८२६३.४२
एकूण    १३३४८९३४    ४८५४०.९७

 

थकबाकीची प्रादेशिक स्थिती 
> २२,५६४.५० कोटी : पश्चिम महाराष्ट्र 
> ४१९१.९१ कोटी : कोकण 
> ७०९१.२३ कोटी : विदर्भ 
> १४,६९३.३२ कोटी : मराठवाडा
 

बातम्या आणखी आहेत...