आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या एका हातात बायबल तर दुसऱ्या हातात संविधान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : लोकशााही मूल्यांसाठी भूमिका घेणारा मी एक लेखक आहे. माझ्या एका हातात बायबल तर दुसऱ्या हातात भारतीय संविधान आहे. मला माझी स्वतंत्र मते आहेत. ती व्यक्त करण्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी डगमगणार नाही, असा स्पष्ट इशारा उस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यांना विरोध करणाऱ्या संघटनांना दिला.

मुंबई मराठी पत्रकार संघाने मंगळवारी दिब्रिटो यांच्याशी वार्तालाप आयोजित केला. या वेळी दिब्रिटो बोलत होते. दिब्रिटो म्हणाले, मी चळवळ्या लेखक आहे. अनेक आंदाेलने केली आहेत. संघर्षाची मला सवय आहे. आणीबाणीत मी तुरुंगात होतो. मी राजकारणी नाही, पण मला राजकीय मते आहेत. ती मी यापुढे मांडत राहणार, असे दिब्रिटो म्हणाले. हिंदू धर्म सहिष्णू आहे. मात्र, हिंदुत्वाचा अजेंडा चुकीचा आहे. ज्या हिंदू धर्मात अद्वैत तत्त्वज्ञान मांडले, त्या धर्मात शूद्रांना वाईट वागणूक कशी काय मिळू शकते, असा सवाल त्यांनी केला. तसेच धर्मग्रंथांची चिकित्सा आवश्यक आहे, असे सांगून ख्रिश्चन धर्माने चिकित्सा केल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटना बदलण्याचा गेली अनेक वर्षे घाट होता. पण, ते शक्य नाही झाले. आता काही संघटनांनी इतिहासाचे पुनर्लेखन हाती घेतले आहे, त्यात बहुआयामी सत्याची माती होणार आहे, असे सांगून विरोधी पक्षांशिवाय भारतीय लोकशाहीचे भवितव्य धोक्यात असल्याचे ते म्हणाले. शत्रूवर प्रेम करा, असे माझा प्रभू सांगतो. त्यामुळे माझ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा मला विरोध का होतो आहे, याविषयी मी आत्मचिंतन करेन, असे ते म्हणाले. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी दिब्रिटाे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आमिषे किंवा सक्ती करून धर्मांतर अत्यंत चुकीचेच
आपल्या देशात अनेक गटांना त्यांचे हक्क नाकारले गेले. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या अनेक चुली झाल्या. त्यात काही चूक नाही. राजकारण व धर्म भिन्न हवेत. जी मंडळी राजकारणात धर्माचा वापर शिडीसारखा करतात, ते त्या धर्माला हानी पोचवत असतात. भारतात ख्रिश्चन मंडळींकडे संशयाने पाहिले जाते. पण, ४०० वर्षांपूर्वी आम्ही हिंदूच होतो. अामिषे दाखवून किंवा सक्तीने धर्मांतर करणे चुकीचे आहे. मात्र, यात चर्चने सुधारणा केली. इतर कधी करणार, हा प्रश्न आहे. जिथे जिथे मानवी प्रतिष्ठा धुळीला मिळवली जाते, मानवी मूल्यांना पायदळी तुडवले जाते, तेथे उभे राहा, असे माझा प्रभू सांगतो.
 

बातम्या आणखी आहेत...