आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
दुष्काळ, नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना यंदा कापसापासून नफ्याची आशा होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बीटी टू या नवीन कपाशी वाणावर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले. कपाशीच्या पिकाला बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान दिले होते. त्यानुसार नगर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात सुमारे ५० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. जिल्ह्यात १ लाख ५४ हजार शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला होता. भरपाई मिळाली असली, तरी उत्पादन कमी झाले हे वास्तव आहे.
यंदा जिल्ह्यात ९५ हजार २९५ हेक्टर म्हणजे सरासरी ९०.३९ टक्के क्षेत्रावर कापसाच्या पिकाची लागवड झाली. पावसाने ३०-४० दिवसांची विश्रांती घेतल्यामुळे हे पीक सुकून चालले होते. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर पिकाने तग धरला असला, तरी यंदा कापूस उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली. गेल्या वर्षीही बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कापसाचे पीक हातचे गेले होते. यंदा पावसाचे उशिराने झालेले आगमन आणि बोंड अळीचा प्रादुर्भाव या दोन्ही कारणांमुळे कपाशी पिकाचे उत्पादन घटणार हे निश्चित आहे.
गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यात कापसाची प्रचंड लागवड झाली. यंदाही पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनीही पोटाला चिमटा देऊन कापसाची लागवड केली. पेरणी व लागवड क्षेत्राची माहिती दर आठवड्याला कृषी विभागाकडून शासनाला कळवली जाते. ऑक्टोबरमध्ये पाठवला जाणारा अहवाल हा अंतिम मानला जातो. त्याला अद्याप अवधी असला, तरी कपाशीवर आतापासूनच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याच्या सूचना आधीच शेतकऱ्यांना देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
कापूस उत्पादकांची अवस्था गेले दोन वर्षांपासून 'दैव देते अन् कर्म नेते' अशी झालेली आहे. पीक ऐन जोमात असताना बोंड अळीने हल्ला चढवला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास बोंडअळीने फस्त केला. त्यामुळे बोंड अळीने फस्त केलेल्या कापसाला नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. शेतकऱ्यांचा आक्रोश विधिमंडळातही व्यक्त झाला होता. त्यामुळे सरकारने प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अनुदान जाहीर करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामे केले होते.
कृषी विभागाला सूचना
कापसाचा पिकाला झालेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. फेरोमोन, ट्रॅप्स, प्रोफिनोफॉस व क्लिनॉलफॉस या कीटकनाशकांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात आहे. त्यासाठी ५० टक्क्यांचे अनुदान देखील दिले जात आहे. तसेच कापसाच्या पिकाला बोंडअळीपासून वाचवण्यासाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, यांच्यामार्फत कीडरोग नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना केलेल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.