आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातील सर्वात मोठी रात्र उजळून निघाली, अंधारावर मात करत लाखो रणरागिणी उतरल्या रस्त्यावर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राच्या २२ हून अधिक शहरांमध्ये महिलांचा नाइट वॉक

औरंगाबाद- 
वर्षातील सर्वात मोठी रात्र म्हणजे २२ डिसेंबर. या दिवशी राज्यातील २२ हून अधिक शहरांत लाखो महिलांनी उत्स्फूर्तपणे नाइट वॉक केला. दैनिक दिव्य मराठीच्या वतीने आयोजित या अभियानात पोलिस-प्रशासनासह अनेक महिला संघटनांनी सहभागी होत अत्याचारांविरुद्ध जनजागृती केली.


एरवी शुकशुकाट असणारा क्रांती चौक रविवारी रात्री महिला शक्तीच्या तेजाने तळपला. निमित्त होते ‘दिव्य मराठी’ अायोजित रातरागिणींच्या नाइट वाॅकचे. सुरक्षेच्या कारणास्तव रात्री घराबाहेर पडणे टाळणाऱ्या महिला वर्षातील सर्वात मोठ्या रात्रीवर चालून गेल्या. फ्लॅश मॉब, पोवाडे, आसमंत भेदणाऱ्या घोषणांनी रातरागिणींनी अंधारावर मात केली.   २२ डिसेंबर ही वर्षातली सर्वात मोठी रात्र असते. या दिवसाचे निमित्त साधून या नाइट वॉकचे आयोजन करण्यात आले होते.  ‘दिव्य मराठी’च्या “मौन सोडू, चला बोलू’ अभियानाचा हा पुढचा टप्पा रातरागिणींनी मोठ्या उत्साहात यशस्वी केला.  क्रांती चौक ते औरंगपुरा येथील सावित्रीबाई पुतळ्यादरम्यानच्या रस्त्यावर शेकडो रातरागिणी चालून गेल्या. नाइट वॉकची सुरुवात १० वाजता होणार असली तरी संध्याकाळी ८ वाजेपासूनच तिरंगा चौकातील ‘रातरागिणी मंचा’जवळ विविध वेशभूषेतील रातरागिणींनी क्रांती चौकात गर्दी करायला सुरुवात  केली.  वेगवेगळी कलापथके जोशपूर्ण वातावरणात सहभागी होत होती.   स्त्री स्वातंत्र्याचा संदेश देणारे फलक हातात घेऊन महिलांनी घोषणाबाजी सुरू करताच उत्साह संचारला.

सर्वसामान्य महिलांच्या हस्ते उद्घाटन : शहरातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सामान्य रातरागिणींच्या हस्ते ‘नाइट वॉक’चे उद्घाटन करण्यात आले. यात पहिली ऑटोरिक्षाचालक महिला अनिता पारपेल्ली, टीव्ही सेंटर येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या उषा घोरपडे, शेतकरी शांता बरसाले, चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आशा शिरसाट, मुक्त पत्रकार अश्विनी भोयर, शिवछत्रपती पुरस्कार विजेती बुद्धिबळपटू  साक्षी चितलांगे, निमलष्करी दलाच्या कॅप्टन ऋचिका जैन, महिला वाहक खापर्डे, स्काऊटप्रमुख रजनी यांचा समावेश होता. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, एसीपी नागनाथ कोडे, राज्य संपादक संजय आवटे, निवासी संपादक दीपक पटवे, आकाशवाणीच्या कार्यक्रमाधिकारी नम्रता फलके यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय माजी महापौर अनिता घोडेले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर नाइट वॉकला शुभेच्छा देण्यासाठी एकवटले हाेते. सुरुवातीला ‘अंधारावर चालून जाणार रातरागिणी’ या संकल्पनेमागील भूमिका ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर संजय आवटे यांनी स्पष्ट केली. विद्यापीठातील विद्यार्थिनी पल्लवी बोराडकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विविध कलागुणदर्शन- कार्यक्रमात शहीद भगतसिंग कलापथकच्या क्रांतिकारी शाहीर वसुधा कल्याणकर यांच्या पोवाड्याने जोश आणला. आरतीश्यामल जोशी दिग्दर्शित व्यावसायी महिलांच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या संवादाला दाद मिळाली. एमजीएमचे फिजिओथेरपी महाविद्यालय आणि विहान ग्रुपच्या दोन फ्लॅशमॉबने कार्यक्रमात रंगत आणली. सिल्लेखाना चौकात धर्मवीर संभाजी महाविद्यालयाचे शिक्षक विनायक राऊत यांच्या संघाने मल्लखांबवरील प्रात्यक्षिक सादर केले. रवी गाडेकर यांच्या लक्ष्मी मुलींच्या ढाेलपथकाने उद्घाटन समारंभात रंगत आणली. त्याशिवाय क्रीडा संचालक डॉ. उदय डोंगरे यांच्या विद्यार्थ्यांच्या तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनाही भरभरून दाद मिळाली. देवमुद्रा ग्रुपतर्फे शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण झाले. नाइट वाॅकसाठी सायकलिस्ट क्लबच्या डॉ. क्रांती व्यवहारे, डॉ.अजिता अन्नछत्रे, डॉ. गौरी, डॉ. गिरिजा कोकीळ, डॉ. दीप्ती भाले यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती.

काही महिला एकत्रितपणे यात सहभागी झाल्या, तर अनेक महिला एकट्याच अंधारावर मात करण्यासाठी सहभागी झाल्या. मशाल पेटवून या नाइट वॉकचे विविध शहरांत उद््घाटन झाले. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिला इतर महिलांसोबत या नाइट वॉकमध्ये सहभागी होत्या. मोठ्या शहरांमध्ये महिलांसाठी नाइट वॉक किंवा रात्री उशिरापर्यंत नोकरीच्या निमित्ताने काम करणे नवे नाही. मात्र, छोट्या शहरांच्या दृष्टीने हा अनोखा असा नाइट वॉक होता. विविध कलागुणांचे सादरीकरण, महिला सशक्तीकरणाचे बॅनर्स घेऊन विविध शहरांत १० हजारांपर्यंत महिलांनी हा नाइट वॉक केला.  गेल्या काही दिवसांत हैदराबादमध्ये व्हेटरनरी महिला डॉक्टरवरील अत्याचार व हत्या तसेच इतर घटनांमुळे निर्माण झालेल्या नकारात्मकतेला भेदून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी दिव्य मराठीच्या वतीने या नाइट वॉकचे आयोजन करण्यात आले होते.सर्व शहरांत उत्स्फूर्त प्रतिसाद : औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अकोला, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, मुंबई, बीड, जालना, उस्मानाबाद, माजलगाव, चाळीसगाव, धुळे, भुसावळ, मालेगाव, सिन्नर, यवतमाळ, बुलडाणा, देऊळगावराजासह २२ शहरांत रात्री १० पासून  नाइट वॉक झाला. दिव्य मराठीच्या पुढाकाराने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा संघटनांच्या माध्यमातून महिलांनी एकजूट दाखवली. राजकीय पक्षांच्या महिला पदाधिकारीही सहभागी होत्या.
 

बातम्या आणखी आहेत...