हाउडी मोदी / इस्लामी दहशतवाद हा सर्वात मोठा धोका : ट्रम्प, आता निर्णायक लढाई लढू, ट्रम्पही सोबत : मोदी

ह्यूस्टनमध्ये ५० हजार लोक दाखल, जगभरात २०० कोटी लोकांनी पाहिला कार्यक्रम लाइव्ह 

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 23,2019 09:36:29 AM IST

ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेरिकेत ह्यूस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमात ५० हजार लोकांशी संवाद साधला. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत पाकचे नाव न घेता ते म्हणाले, आता दहशतवाद पोसणाऱ्यांविरुद्ध निर्णायक लढाईची वेळ आहे. ट्रम्पही सोबत आहेत. मोदींनी ट्रम्प यांना व ट्रम्प यांनी दहशतवादविरोधी लढाईसाठी स्टँडिंग ओव्हेशन दिले. कलम ३७० रद्दचा निर्णय घेणाऱ्या संसदेच्या सन्मानार्थ लोकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.


हाउडी मोदी प्रथमच मोदी-ट्रम्प यांचे सोबत भाषण, लक्ष्य इस्लामी दहशतवाद
मिस्टर ट्रम्प, तुम्ही २०१७ मध्ये तुमच्या कुटुंबीयांशी माझी ओळख करून दिली होती. आज मी माझ्या कुटुंबीयांचा परिचय करून देत आहे. (गर्दीकडे इशारा) अबकी बार ट्रम्प सरकार.' - नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत


मोदींनी अमेरिकेत आपल्या देशाशी संबंधित तीन गोष्टींवर लक्ष केले केंद्रित...
पाकिस्तानबद्दल...
मोदी म्हणाले- भारत जे करत आहे, त्यामुळे ज्यांना आपला देश सांभाळला जात नाही अशांना अडचण आहे. ९/११ असो की २६/११, त्याचे कट रचणारे कुठे आढळतात? आता त्यांच्या विरोधात निर्णायक लढाई होईल.
मोदींनी कवितेच्या दोन ओळी ऐकवल्या : वाे जाे मुश्किलाें का अंबार है, वही ताे मेरे हाैसलाें की मीनार है।


कलम ३७० बद्दल...
७० वर्षे जुन्या आव्हानाला निरोप दिला आहे. कलम ३७०, याने जम्मू-काश्मीरच्या लोकांना विकासापासून वंचित ठेवले होते. तेथे महिला, मुले, दलितांशी होत असलेला भेदभाव संपला आहे.
मोदींच्या उपस्थितीत मी सांगू इच्छितो, की इस्लामी दहशतवादाविरुद्ध आम्ही सोबत लढू. सीमेचे रक्षण महत्त्वाचे आहे. भारतासाठी सीमेची सुरक्षा सर्वोच्च आहे, हे आम्ही जाणून आहोत.' - डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्रपती, अमेरिका


५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेबद्दल...
भारत अाज आव्हानांना टाळत नाही, तर त्यांच्याशी झुंज देत आहे. भारताने ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी आता कंबर कसली आहे. भारताचा सरासरी विकास दर ७.५% राहिला आहे. आधी ए‌वढी सरासरी कधीही राहिली नव्हती.
आपली स्वप्नं एक, भविष्य उज्ज्वल, पुढील महिन्यात मी मुंबईत येऊ शकतो : ट्रम्प
ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांना जोडणाऱ्या सर्व गोष्टींचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी आणि मी आलो आहोत. दोन्ही देशांच्या राज्यघटना 'वी द पीपल' या एकाच शब्दापासून सुरू होतात. आमची स्वप्नं एक आहेत, भविष्य उज्ज्वल आहे. भारतात एनबीए बास्केटबॉल स्पर्धा होत आहे. ती पाहण्यासाठी मी पुढील महिन्यात मुंबईला येऊ शकतो.
नंतर मोदींनी ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचे निमंत्रणही दिले.


स्पर्शच्या शरीरात १३० जागी फ्रॅक्चर, राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची केली सुरुवात
१६ वर्षांच्या स्पर्श शहाला जन्मत:च ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा हा आजार आहे. शरीराची हाडे १३० ठिकाणी तुटलेली आहेत. कार्यक्रमाची सुरुवात स्पर्शने राष्ट्रगीताने केली. स्पर्श गायक आहेच, शिवाय प्रेरक वक्ताही आहे.

X
COMMENT