आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जालना- २०३० पर्यंत भारतातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहने धावावीत, असा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. यामुळे प्रदूषण विरहित गाड्या हा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. या वाहनांचा वापरही वाढत चालला. परंतु, चार्जिंग सेंटर नसल्याने अनेकदा चालकांची गैरसोय होते. याला पर्याय म्हणून शहरातील रवींद्र गायकवाड या तरुणाने जुन्या दुचाकीला १३ किलो वजनाची ४० एमीआरची बॅटरी व अल्टरनेटर सिस्टिम, १ हजार वॅटची माेटार बसवली. चाकांच्या वेगामुळे अल्टरनेटर सिस्टिममध्ये घर्षण होऊन बॅटरीच्या ऊर्जेवर चालणारी दुचाकी त्याने तयार केली. या दुचाकीवर स्वत: पंधरा दिवस सराव केल्यानंतर या नवनिर्मित दुचाकीवर तामिळनाडू येथे थ्री-डी डिझाइन करून अशा प्रकारच्या दुचाक्या रस्त्यांवर उतरवण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढवण्यासाठी सरकार पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चार्जिंग स्टेशन्स, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता, सर्व्हिस सेंटर्सची उपलब्धता, योग्य रस्ते या गोष्टी पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येत आहेत. दरम्यान, जालना शहरात सध्या दोन ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांचे शोरूम सुरू झाले आहेत. सध्या काही ठिकाणी चार्जिंग सेंटरही सुरू झाले. परंतु, अनेकदा चार्जिंग संपल्यानंतर वाहनचालकांची गैरसोय होण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर रवींद्र मोतीराम गायकवाड या तरुणाने जुन्या दुचाकीला अल्टरनेटर सिस्टिम बसवून पंधरा दिवस ही दुचाकी स्वत: चालवली. बॅटरीसह पेट्रोलवरही वापरण्यासही या दुचाकीचा वापर होण्यास मदत होणार आहे. बॅटरीवर चालणारी ही दुचाकी तयार करण्यासाठी रवींद्र गायकवाड यांच्यासह उमेश काळे, संजय जाधव, गजानन लोंढे, अतुल सेवलकर आदींनी परिश्रम घेतले.
अशी तयार होते ऊर्जा
रवींद्र गायकवाड या तरुणाने त्याच्या दुचाकीच्या सिटजवळ मागील बाजूस ४० एमीआरची बॅटरी बसवली. पुढच्या चाकाजवळ १००० वॅटची मोटार बसवली. यात दुचाकीत अल्टरनेटर सिस्टिम तयार होऊन जसजशी दुचाकीचा वेग वाढेल तसतसा चाकांजवळ बसवण्यात आलेल्या अल्टरनेटर डायनोमा व चाकांमध्ये घर्षण होऊन बॅटरीमध्ये वीज तयार होते. यातून बॅकअपसाठी ऊर्जा तयार होत आहे.
तामिळनाडूत होतेय प्रक्रिया
तरुणांनी तयार केलेल्या या दुचाकीला तामिळनाडू येथील दुचाकी, चारचाकी वाहने तयार करण्याच्या एका कंपनीत थ्री डी टेक्नॉलॉजीचा वापर करून दुचाकीला लावलेल्या बॅटरी, मोटार, अल्टरनेटर सिस्टिम ही त्या दुचाकीच्या बॉडीच्या आत कशी फिटिंग करता येईल, यासाठी थ्री-डी टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. तसेच कलरिंग, नव डिझायनिंगही केल्या जात आहेत.
न्यूट्रलमध्ये चालवावी लागते
अल्टरनेटर सिस्टिमचा वापर करून तयार करण्यात आलेली ही दुचाकी ज्यावेळी बॅटरीच्या ऊर्जेवर चालवावी लागते, त्या वेळेस ती केवळ न्यूट्रलमध्ये चालवावी लागते. जेवढे अॅक्सिलरेटर दिले तेवढा दुचाकीचा वेग वाढतो. यामुळे इलेक्ट्रिकवर असणाऱ्या दुचाकीस्वारांना आता चार्जिंगसाठी थांबण्याची गरज राहणार नाही.
चार्जिंगची गरज नाही
इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत चांगला छंद असल्यामुळे जुन्या दुचाकीही वापरात याव्यात या उद्देशाने बॅटरीचा वापर केला. तामिळनाडूतील कंपनीसह मुंबईच्या तज्ञांचीही यासाठी मदत मिळत आहे. यामुळे चार्जिंग करण्याचा ताणच राहणार नाही. रवींद्र गायकवाड, इलेक्ट्रिक दुचाकी तज्ञ, जालना.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.