आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली ते दुबईपर्यंत राजकारण: रामलीला मैदानात भाजपचे अधिवेशन, यूएईमध्ये काँग्रेस अध्यक्षांचे आरोप 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या तीन महिन्यांपूर्वी तीन राज्यांतील सत्ता गमावल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी एकाच व्यासपीठावर एकजूट दाखवली. दिल्लीचे रामलीला मैदानावर शुक्रवारी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात झाली. दोनदिवसीय अधिवेशनाची सुरुवात अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणाने झाली. २०१९ ची निवडणूक एक प्रकारचे वैचारिक युद्ध आहे. ही दोन विचारसरणींतील लढाई आहे. २०१९ ची निवडणूक शतकानुशतके परिणाम करणारी ठरेल. म्हणूनच रालोआच्या ३५ पक्षांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकजूट दाखवली आहे, असा दावा शहा यांनी केला. विरोधकांकडे नेता नाही आणि नीतिमत्ताही उरलेली नाही. मराठे एक युद्ध हरले होते. त्यामुळे देशावर २०० वर्षांसाठी गुलामी आली होती. २०१९ ची स्थितीदेखील अशीच आहे. २०१४ मध्ये ६ राज्यांत भाजपची सरकारे होती. आज १६ राज्यांत आपले सरकार आहे. २०१९ मध्ये देशात मोदी सरकार पुन्हा यावे. मग भाजप केरळपर्यंत पोहोचेल आणि तेथेही सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

चिंतन : कमळ फुलणार... 
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे १२ हजार भाजप कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मोदी संमेलनाला दोन्ही दिवस हजर राहणार आहेत. मोदींसारखा नेता जगात कोणत्याही पक्षाकडे नाही. उत्तर प्रदेशातील महाआघाडी शुद्ध फसवणूक आहे. आगामी निवडणुकीत यूपीत ७३ ते ७४ जागी विजयी होईल. अयोध्येत लवकरात लवकर मंदिर व्हावे, असे भाजपला वाटते. यात दुमत नाही, असे अमित शहा यांनी सांगताच 'जय श्रीराम' चा जयघोष झाला. हे प्रकरण न्यायालयात आहे. प्रकरणाचा लवकर निपटारा व्हावा, असे आमचे प्रयत्न आहेत. काँग्रेस अडसर आणत आहे. कार्यकर्त्यांनी आश्वस्त राहावे. राममंदिरासाठी आम्ही कटिबद्ध आहाेत. 

 

कामांचा पाढा : मोदींचे ५ वर्षांत ५० पेक्षा जास्त ऐतिहासिक निर्णय 
शहा म्हणाले, मोदी सरकारने ५ वर्षांत ५० पेक्षा जास्त ऐतिहासिक निर्णय घेतले. साडेचार वर्षांत ९ कोटी शौचालये बांधली आणि ६० कोटी लोकांना बँक खाती सुरू करून दिली. तिहेरी तलाक, हजसाठी अनुदान, शीख दंगलपीडितांना न्याय मिळाला, आम्ही एनआरसी आणले. गत आठवड्यातच सरकारने दोन मोठे निर्णय घेतले. सामान्य लोकांना शिक्षण व रोजगारात १० टक्के आरक्षण दिले. ४० लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांना जीएसटी नोंदणी व करातून सूट दिली आहे. 
 
सत्ता आल्यास आंध्र प्रदेशला विशेष दर्जा : राहुल गांधी 
दुबई- आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळाल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दुबईतील भेटीदरम्यान शुक्रवारी दिले. राहुल गांधी दोनदिवसीय दुबई दौऱ्यावर आले असून शुक्रवारी त्यांनी कामगार वसाहतीमध्ये संवाद साधला. आमचे सरकार सत्तेवर आल्यास आंध्रमधील जनतेची इच्छा पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन राहुल यांनी दिले. आपण सर्व एकत्र येऊ व नरेंद्र मोदी यांच्याकडे आंध्रला हक्क देण्याची मागणी करू. हा आंध्र प्रदेशातील नागरिकांचा अधिकार आहे, असे राहुल यांनी सांगितले. दुबई ही जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी आहे. हे शहर सुंदर करण्यासाठी तुम्ही रक्ताचे पाणी केले. कष्ट घेतले. तुम्ही गरीब लोकांनाही मदत केली. त्यामुळेच तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे राहुल याप्रसंगी म्हणाले. 

 

मी लोकांचे प्रश्न ऐकणार, 'मन की बात' नाही 
मला लोकांचे प्रश्न ऐकणे महत्त्वाचे वाटते. तेच मी करणार आहे. मला 'मन की बात' मांडण्यात रस नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामोल्लेख न करता टोला लगावला. मी येथे तुमचे म्हणणे ऐकायला आलो आहे. मला काय वाटते, हे मला सांगायचे नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यापूर्वी राहुल गांधी यांनी दुबईतील उद्योजकांशी संवाद साधला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...