आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहीरीत आढळले माय-लेकीचे मृतदेह, जिंतूर तालुक्यातील माणकेश्वरची घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी सायंकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती

परभणी- जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर शिवारात एका शेतातील विहिरीत 25 वर्षीय विवाहिता व एक वर्षीय मुलीचा मृतदेह बुधवारी (दि.22) सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोघींची ओळख न पटल्याने त्यांचे मृतदेह जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत.


बुधवारी सायंकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. जिंतूर शहरातील गोविंद तोष्णीवाल यांची माणकेश्वर शिवारात गट क्रंमांक 210 मध्ये शेती असून या शेतामधील विहिरीवर बुधवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचा बटईदार काळूराम आडे हा पाण्याची मोटार चालू करावयास गेला असता त्यांना विहिरीतील पाण्यात लहान बाळाचे प्रेत तरंगत असल्याचे दिसून आले. त्याने याबाबतची माहिती गोविंद तोष्णीवाल यांना दिल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख अहमद व पोलिस जमादार सय्यद साजिद यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी पाण्यावर तरंगत असलेल्या बाळाचे प्रेत बाहेर काढले.

त्यावेळी त्यांना विहिरीशेजारी एक लेडीज चप्पल व एक साडी असलेली थैली आढळून आल्याने त्यांनी विहिरीतील पाण्यात शोध घेतला असता त्यांना पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचे प्रेत आढळून आले. दोन्ही प्रेताची ओळख न पटल्याने ते ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून गावातील महिला हरवली किंवा घरातून बाहेर गेली असल्यास त्यांनी जिंतूर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी केले. मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय, नातेवाईक पुढे आल्याशिवाय घटनेचे कारण सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...