आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात दहावीच्या विद्यार्थिनीसह 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दहावीच्या विद्यार्थिनीसह एका तरुणाचा पाळधी येथे खड्ड्यात मृतदेह आढळल्याने शुक्रवारी खळबळ उडाली आहे. तरुण तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेला हाेता, तर विद्यार्थिनीला पळवून नेल्याबाबत गुरुवारी रात्री १२ वाजता तिच्या वडिलांनी पाळधी पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे दाेघांची हत्या करण्यात आल्याचा संशय तरुणाचे मित्र आणि तरुणीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. प्रिया ऊर्फ छकुली दत्तात्रय पाटील (१५, रा.माळीवाडा, पाळधी) आणि जयेश दत्तात्रय पाटील (१९, रा.नशिराबाद) अशी मृतांची नावे आहेत. प्रिया ही पाळधी येथील सरजूबाई नंदलाल झंवर विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत हाेती. पाळधी-चांदसर रस्त्यालगतच्या वीटभट्टीजवळील सुमारे सात ते आठ फूट खड्ड्यात एका रखवालदाराला हे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. प्रियाजवळ घड्याळ व शाळेची बॅग तर जयेशकडे माेबाइल आढळून आला. घटनास्थळी पाळधी येथील नागरिकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पाळधी दूरक्षेत्राचे एपीआय हनुमंतराव गायकवाड, सहायक फाैजदार नीलिमा हिवराळे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार मृतदेहाची आेळख पटवण्यासाठी पाेलिसांनी प्रियाच्या नातेवाइकांना घटनास्थळी बाेलावले. त्यानंतर ते मृतदेह प्रिया व जयेशचा असल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. 

  • मित्राची दुचाकी घेऊन आला हाेता पाळधीला

जयेश हा १ ऑक्टोबरला घरातून निघून गेला हाेता. त्याने अर्जुन संताेष महाजन या मित्राची स्कूटी आणली हाेती. पाळधी येथे जात असल्याचे त्याने मित्राला सांगितले हाेते. कुटुंबीयांना त्याबाबत माहिती नव्हती. त्यांनी त्याचा शाेध घेतला; परंतु ताे आढळला नाही. प्रिया हिची मावशी जयेश याच्या घराजवळ राहते. ती मावशीकडे येत हाेती. त्यातून दाेघांची ओळख झाली होती. गुरुवारी रात्री प्रियाचे नातेवाईक तिचा शाेध घेण्यासाठी नशिराबाद येथे आले हाेते. गुरुवारी पाळधी पाेलिसांनी जयेशच्या मित्रांना चाैकशीसाठी बाेलावले हाेते. त्यामुळे प्रिया ही जयेशसाेबत गेली असल्याची पाेलिसांना कल्पना हाेती.

  • ताे तर पट्टीचा पाेहणारा, बुडाला कसाॽ

जयेश हा पट्टीचा पाेहणारा हाेता. ताे विहिरी, धरणांमध्ये पाेहत हाेता. तर पाळधी येथे एवढ्या छाेट्या खड्ड्यात बुडालाच कसाॽ त्या दाेघांचा घातपात झाल्याचा संशय जयेशच्या मित्रांनी व्यक्त केला आहे. ताे नूतन मराठा महाविद्यालयात १२ वीला शिकत हाेता.  जयेश याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. 

  • शिकवणीला जात असल्याचे सांगून पडली घराबाहेर

प्रियाचे वडील दत्तात्रय राजाराम पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिकवणी वर्गाला जाते, तेथून परस्पर शाळेत जाते, असे आईला सांगून सकाळी ११ वाजता घराबाहेर पडली हाेती. ती घरी न परतल्याने दुपारी २.३० वाजता तिच्या आईने वडिलांना फाेन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाटील यांनी त्यांचा पुतण्याला दहिवदकर क्लासेसला प्रिया हिचा शाेध घेण्यासाठी पाठवले; परंतु दहिवदकरांनी ती क्लासेसला आलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याबाबत पाटील यांनी तक्रार दिली हाेती. त्यानंतर प्रिया हिचा पाेलिसांनी पद्मालय व इतर ठिकाणी शाेध घेतला; परंतु ती आढळून आली नाही.