आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे एका सहा वर्षीय मुलीचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत रविवारी आढळून आला. हैदराबाद येथील महिलेवर अत्याचार करून तिचा खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर संताप व्यक्त हाेत असताना नागपूरमध्ये ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये राेष व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेडिकल कॉलेजला पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच मुलीवर अत्याचार झाला की नाही हे सांगता येईल, अशी माहिती ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश आला यांनी दिली.
नीलम शांताराम धुर्वे (६) असे मृत चिमुकलीचे नाव होते. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. लिंगा या गावापासून जवळ पीडित मुलीच्या आजीचे घर आहे. मुलगी नेहमी आपल्या आजीकडे जायची. शुक्रवारी नेहमीप्रमाणे मुलगी सकाळी घरून निघाली. ती आजीकडे गेली असेल असे समजून घरच्यांनी शोध घेतला नाही.
आजीकडे गेल्याची शंका
मुलीचे वडील शांताराम यांनी सांगितले की, 'नीलम शुक्रवारपासून बेपत्ता होती. ती आजीकडे गेली असावी, असा आमचा समज होता. मात्र, शनिवारी ती आजीकडेही नसल्याचे लक्षात आल्यावर आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली. काल मी स्वतः पोलिसांसोबत मुलीचा शोध घेत होतो.' दरम्यान, शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गावाजवळील पाेलिसांना शेतात या मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला व मेडिकलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे गावात संतापाची लाट आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस लक्ष ठेवून आहेत.तसेच या भागात पाेलिस बंदाेबस्तही वाढवण्यात आला हाेता.
पोलिस ठाण्यावर मोर्चा; सीआयडी चाैकशीची मागणी
माझ्या मुलीला मारणाऱ्या आरोपीला अतिशय कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृत मुलीचे वडील शांताराम यांनी केली. कळमेश्वर परिसरात या घटनेचे संतप्त पडसाद उमटले आहेत. कळमेश्वर व आसपासच्या गावातील लोकांनी रविवारी सायंकाळी कळमेश्वर पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन हैदराबाद येथील घटनेप्रमाणे आरोपीचे एन्काउंटर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेचा सीआयडी तपास करण्यात यावा, अशीही काही नागरिकांनी मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.