maharashtra local / टेंभापुरी प्रकल्पातील विहिरीत २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला, तीन दिवसांपासून तरुण होता बेपत्ता

एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीतील कृष्णा कामगार म्हणून काम करत होता

दिव्य मराठी

Jul 21,2019 10:29:00 AM IST

वाळूज- वाळूज पाेलिस ठाणे हद्दीतील टेंभापुरी प्रकल्पात असलेल्या विहिरीमध्ये शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास कृष्णा अशाेक कानाडे (२८, रा. टेंभापुरी, ता. गंगापूर) यांचा मृतदेह अाढळून आला. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला कृष्णा शनिवारी विहिरीत आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात, याबाबतच्या चर्चेला नागरिकांमध्ये उधाण आले असून याबाबतची शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीतील कृष्णा कामगार म्हणून काम करत होता. गेल्या तीन दिवसांपासून तो गायब असल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, वाळूज पोलिसांत याबाबत तक्रार देण्यात आली नव्हती. दरम्यान, शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास टेंभापुरी प्रकल्पात असलेल्या विहिरीचे सिमेंट बांधकाम करताना खोदलेले चर बुजवण्यासाठी जेसीबी घेऊन गेलेल्या व्यक्तींना सदरील विहिरीमध्ये तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती टेंभापुरीचे पोलिस पाटील हनुमान ढोले यांना दिली. ढोले यांनी याबाबत वाळूज पोलिसांनी कळवले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार नारायण बुट्टे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल खंडागळे, पोलिस नाईक अभिमन्यू सानप, उल्हास भाले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलास पाचारण करण्यास आल्यानंतर पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांच्या साहाय्याने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या अंगझडती घेतली असता त्यांच्या पँटच्या खिशात असलेल्या मनी पॉकेटमध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड आढळून आल्याने सदरील व्यक्तीची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पाेलिसांनी मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदरील घटनेबाबत आत्महत्या की घातपात याविषयी माहिती समाेर येणार असल्याचे सहायक फाैजदार नारायण बुट्टे यांनी सांगितले. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.


तीन दिवसांपासून कृष्णा होता बेपत्ता
कृष्णाला शेतजमीन नसल्याने तो वाळूज एमआयडीसीमधील एका खासगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत हाेता. कृष्णाच्या घरी आई-वडील तसेच एक भाऊ आहे. तसेच कृष्णा विवाहित बसून त्यास साधारण ४ ते ५ वर्षांचा मुलगा आहे. तीन दिवसांपूर्वीपासून तो बेपत्ता असल्याने घरातील मंडळी कृष्णाचा शोध घेत होती. मात्र, याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती.

X