आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाणेगाव-नांदेडा शिवारात तरुणाचा जखमी अवस्थेत मृतदेह आढळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - येथील घाणेगाव-नांदेडा शिवारात भारत निवृत्ती अल्हाड (२७, रा. सिरसेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद, हल्ली मुक्काम शीतलनगर, विटावा, ता. गंगापूर) हा तरुण बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मंगळवारी (३० ऑक्टोबर) दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भारतला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. भारतच्या शरीरावरील जखमा तसेच घटनास्थळावरून त्याच्या वस्तू चोरीला गेलेल्या असल्याने हा घातपात तर नाही? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील घाणेगाव-नांदेडा परिसरात तुकाराम कचरू गायके यांच्या मालकीची गट नंबर २११ मध्ये शेती आहे. तेथील रस्त्यावर संबंधित तरुण बराच वेळेपासून बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी ही माहिती गावातील पोलिस पाटलांना दिली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बेशुद्धावस्थेतील भारतला पोलिस व्हॅनमधून तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. 


शवविच्छेदनानंतर खरे कारण पुढे येणार 
प्रथमदर्शी हा अपघात भासत असला तरी घटनास्थळावरील वस्तू लंपास असणे तसेच मृताच्या शरीरावरील जखमा आदी संशयास्पद आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत तपासाला योग्य दिशा मिळणार नाही. डाॅक्टरांचा अहवाल आल्यावरच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 


अंगावर जखमा 
भारतच्या तोंडावर, डोक्यात तसेच हातावर जखमा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी भारतच्या कपड्यांची झडती घेतली असता त्यांना खिशात आधार कार्ड आढळून आले. त्यावरील नावावरून त्याची ओळख पटली. 


घटनास्थळावरून दुचाकी, मोबाइल लंपास 
पोलिसांच्या हाती लागलेल्या आधार कार्डच्या आधारे त्यांनी भारतच्या घरी संपर्क साधला. त्याच्या पत्नीला घटनास्थळी बोलावून ओळख पटवून घेतली. त्याचा मोबाइल व दुचाकी घटनास्थळी नसल्याची माहितीही तिनेच पोलिसांना दिली.

बातम्या आणखी आहेत...