आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडापाडीच्या पुराव्यांचे पुस्तकच प्रदेशाध्यक्षांना दिले : एकनाथ खडसे, … म्हणून नावे जाहीर केली नाही

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जळगाव : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्वकियांनीच कशी पाडापाडी केली याचे सविस्तर पुरावे असलेले पुस्तकच प्रदेशाध्यक्षांकडे दिले असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी शनिवारी केला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खडसे, राेहिणी खडसे यांच्यात १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. खडसेंनी राेहिणींच्या पराभवाला कारणीभूत व्यक्तींचे पुरावे पाटील यांंना दिले. फाेटाे, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स व साेशल मीडिया पाेस्टवरील कमेंट्सचे पुस्तकच दिले. नावे जाहीर करा, या महाजनांच्या बातमीवरील ७६५ पैकी ७६० कमेंट्समध्ये लोकांनी दाेषींची नावे सांगितली आहेत. या सर्व कॉमेंट्स आपल्या बाजूने असल्याचा दावा खडसेंंनी या वेळी केला.

शनिवारी जळगावात भाजपची संघटनात्मक विभागीय बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावळ यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यात उपस्थित हाेते. स्वपक्षीयांनीच पंकजा मुंडे व रोहिणींचा पराभव घडवून आणल्याचा आरोप खडसेंनी केला होता. पुरावे असतील तर ते जाहीर करा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले होते.

'मी वेगळा विचार करावा अशी स्थिती निर्माण केली जातेय'

'मी वेगळा विचार करावा यासाठी पक्षात काही जणांकडून जाणीवपूर्वक अशी स्थिती निर्माण केली जाते आहे. विभागीय बैठक असूनही मला केवळ जळगाव जिल्ह्यापुरतेच बाेलावले. काेअर कमिटीतून काढून टाकत अपमानित केले आहे. काेणत्याही बैठकांना बाेलावले जात नाही. ज्या पक्षासाठी हयात घातली तेथे जाणीवपूर्वक डावलले जात असेल तर ताे माझ्यावर अन्यायच आहे, अशा शब्दांत खडसे यांनी व्यथा व्यक्त केली.

… म्हणून नावे जाहीर केली नाही : खडसे

महाजन यांच्या आव्हानाप्रमाणे आपण दोषींची नावे जाहीर करण्याची परवानगी प्रदेशाध्यक्षांना मागितली. परंतु हा पक्षशिस्तीचा विषय असल्याने त्यांनी ती नाकारली. हा विषय केंद्रीय पातळीवर नेऊन संबंधितांवर कारवाई करून न्याय देऊ, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिल्याचे खडसे म्हणाले.

…तर वेगळा विचार शक्य

खडसे म्हणाले, 'वारंवार डावलले जाणे, अपमान, बैठकांना न बाेलावणे, मी पक्ष साेडावा अशी स्थिती निर्माण करणे हे सर्व जाणीवपूर्वक घडवले जात आहे. कार्यकर्ते विचारतात हा अन्याय का सहन करायचा? मी चाळीस वर्षे घालून पक्ष वाढवला आहे. ताे पक्ष का साेडावा असे वाटते. परंतु असेच सुरू राहिले तर वेगळा विचार करावा लागेल.'

ओबीसींनी पक्ष उभारला

खडसे म्हणाले, 'माझ्यावरील अन्याय हा ओबीसी नेतृत्वावरील अन्याय असल्याचे मी कधीही म्हणालो नाही. या कार्यकर्त्यांच्या भावना असून त्या आजही आहेत. ओबीसी म्हणून पक्षाने मला खूप काही दिलं. मीही पक्षाला उभे ४० वर्षे दिली आणि सत्ता आली. ओबीसींना नेतृत्व दिले, पण ओबीसींनी पक्ष उभा केला हे पक्षाने विसरू नये.'

खडसेंना काेणतेही आव्हान दिले नाही : महाजन

एकनाथ खडसेंच्या आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा पंचनामा करून खडसेंनी पराभव करणाऱ्यांची नावे माहिती असतील तर पुराव्यानिशी जाहीर करावे, असे अाव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी दिले हाेते. मात्र बैठकीत त्यांनी यू टर्न घेत आपण खडसेंना असे काेणतेही आव्हान दिले नसल्याचा दावा केला.

गाेपीनाथरांवावर असाच अन्याय

३० वर्षे मी गाेपीनाथ मुंडेसाेबत राहिलोय. त्यांच्यावरही अन्यायाचे प्रसंग आले. स्पर्धेत येऊ नये म्हणून त्यांना त्रास दिला गेला. आता मला टार्गेट केले जात आहे. मी स्पर्धेत आहे म्हणून मला अशा पद्धतीने संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? मी दाेषी असेन तर कारवाई केलीच पाहिजे. जाणीवपूर्वक अन्याय केला जात असेल तर ते खपवून घेणारा मी नाही, असे खडसे म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...